४
पंचमहाभूते
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतांची नावे पाठ झाली की आपण अाध्यात्माच्या परीक्षेत पास झालो असे वाटायला लागते. सगळ्यांना नाही तरी बऱ्याच जणांना. मग ते आपले ज्ञान पाजळायला सुरुवात करतात. लेखक असतील तर लेखात ती नावे घुसवतात. वक्ते असतील तर भाषणात पंचमहाभूतांचा उल्लेख करून थोडा पाॅज घेतात व श्रोत्यांना टाळ्या वाजविण्याची संधी देतात. श्रोतेही अपेक्षाभंग करीत नाहीत व 'टाळ्याच हव्या ना, मग घ्या की' असा विचार करून कडकडाट करतात. थातुरमातुर कवी मंगलाष्टकात हीच पाच नावे घुसवून आपल्या आध्यात्मिक पातळीचे रुखवत मांडतात. उदाहरणार्थ:
पृथ्वी, आप नि तेज, वायु जमले, आकाश हा मांडव
धर्मी, शूर, सुहास्य, सुंदर असे आला तुम्ही पांडव
पाषाणी, जळि, काष्ठि आणि स्थळि ह्या वर्षावती अक्षता
थांबूनी जणु कालचक्र वदते, कुर्यात सदा मंगलम्
किंवा
पृथ्वी, आप नि तेज, वायु जमले आकाशिच्या मांंडवी
धर्माच्या समरात मूठ वळते सत्याग्रही पांडवी
द्रव्ये पाच मिळून धार धरता पंचामृतस्नान हो
पंचांचे मुखि आज न्याय अवघा, कुर्यात सदा मंगलम्
तेच ते पंचमहाभूतं खेळवत राहायचे आणि मंगलाष्टकांची फॅक्टरी चालवायची. पण कोण ही पाच महाभूते? काय त्यांचे कार्य? आपला त्यांच्याशी काय संबंध? असे प्रश्न विचारणे म्हणजे शिव शिव शिव!
पंचमहाभूतांची कल्पना जगभर पसरलेली आहे. भाषेनुसार शब्द वेगळे वेगळे एवढेच. देशानुसार, धर्मानुसार कल्पनेत थोडेफार बदलही आहेत. पण साऱ्या कल्पनात मूळ धारा तीच आहे हे सत्य डोकावल्याशिवाय राहत नाही.
इंग्रजीत या भूतांना elements म्हणतात. पंचमहाभूते म्हणजे five elements. विश्वाचे पाच मूल घटक. कुठलीही physical, म्हणजे भौतिक गोष्ट ज्या मूल तत्त्वांपासून बनते ती पाच तत्त्वे. खरे म्हणजे या भूतांपासून जी बनते तीच भौतिक गोष्ट. भौतिक हा शब्दच भूत धातूपासून आला. ती भौतिक गोष्ट मग तारा असो की आपल्या करंगळीचे नख. भौतिक विश्व बनविणारे हे पाच प्रकारचे जणू अणू, elements, atoms. कुठलीही अस्तित्त्व असलेली वस्तू बनविणारे हे पाच बोक्कामुच्चु. कुठलीही भौतिक, physical गोष्ट कशी बनते हे सांगणारी ही प्राचीन, सार्वभौम, सर्वमान्य Atomic Theory. आपण आजकाल उदजन (hydrogen), हीलीयम (Helium) वगैरे जे अणू सांगतो ते मूळ नसून हे पाच अणू विश्वव्याप्त भौतिकांचे मूळ घटक. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. Earth, Water, Fire, Air, Aether. पंचबोक्कामुच्चु.
चीनमध्येही पंचमहाभूतांची कल्पना आहे. जरा वेगळी. त्यांना पंचमहाभूते असे न म्हणता वू झिंग (Wu Xing) म्हणतात. पाचांची नावे पण त्यांच्या नाकासारखी नकटीच. पाच महाभूते म्हणजे मू (mu म्हणजे लाकूड, वृक्ष), हुओ (huo म्हणजे अग्नी), तू (tu म्हणजे पृथ्वी), जिन (jin म्हणजे metal, धातू) व शुई (shui म्हणजे जल, आप). ही कुठल्याही पदार्थाची, म्हणजे matter ची मूल भूते न मानता शक्तीची, म्हणजे एनर्जीची भिन्न रूपे ते लोक मानतात.
चीनी लोक या पंचशक्तींचे एक चक्र निर्माणाचे व एक चक्र विनाशाचे असते असेही मानतात. सुंदर कल्पना आहे. अगदी आपल्याच विष्णू व शिवासारखी.
निर्माणचक्र असे:
Wood feeds Fire,
Fire creates Earth (ash),
Earth bears Metal,
Metal collects Water,
Water nourishes Wood.
आणि विनाशचक्र असे:
Wood parts Earth,
Earth absorbs Water,
Water quenches Fire,
Fire melts Metal,
Metal chops Wood.
प्राचीन, अतिप्राचीन काळी जरी प्रवासाची साधने नसली तरी विचारांची देवाणघेवाण होतच असावी. मानव ही भटकी जमात असावी व सांगोवांगी विचार पसरत असावे. असे होताना ते थोडेफार बदलतही असावे, metamorphose होत असावे. पण तरी विचारांचे पोत तेच राहत असावे. काही का असेना, पंचमहाभूतांची कल्पना विश्वव्यापी होती. निर्माणाची आशा व संहाराची भीती मनामनात होती. साध्या भूताला आपण घाबरतो. बोबडी वळते. ही तर पंचमहाभूते.
हे पाच जण, हे पाच मूल घटक प्रत्येक दिसणाऱ्या, अस्तित्व असणाऱ्या गोष्टीमागे असल्यामुळे त्यांना बहुतेक सर्व धर्मात देवांचा दर्जा प्राप्त झाला. भूदेवी, जलदेवता, अग्निदेव वा सूर्यदेव, वरुणदेव त्यामुळे समजण्याजोगे आहेत. आकाश जरी देवरूप नसले तरी ते सर्व देवांचे निवासस्थान म्हणून देवतुल्यच. काहीही झाले की देवाचे आभार किंवा त्याकडे तक्रार, किवा याचना करायला भाविक आकाशाकडे पाहूनच हात जोडतो. असे हे पाच देवतुल्य, देवसम मूलभूत घटक. निर्मात्याच्या पंचपाळ्यातले पाच मसाले. पंचदेव म्हणा वाटल्यास. त्यांच्यापासून व त्यांच्यामुळेच सर्व काही. म्हणजे पुन्हा देवच सर्व निर्मितीचा बोक्कामुच्चु.
आपला देहही पंचमहाभूतांचाच बनलेला आहे म्हणतात. देहातील प्रत्येक महाभूताला शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ते शुद्ध करण्याचे बळ फक्त पंचगव्यात आहे असे म्हणतात. गाईबद्दल 'तृणं चरन्ती अमृतं क्षरन्ती' उगाच नाही काही सांगितले. कोणते गव्य आपल्या देहातल्या कोणत्या महाभूताला शुद्ध करतात तेही स्पष्ट सांगितले आहे. गोमय (म्हणजे सोप्या मराठीत गाईचे शेण) खाण्याने देहाच्या पृथ्वी महाभूताचे शुद्धीकरण होते. लोण्याने आप (म्हणजे जल) महाभूताचे, तुपाने तेज (म्हणजे अग्नी) महाभूताचे, गोमुत्राने वायू महाभूताचे, व दह्याने वा ताकाने आपल्या शरीरातील आकाश महाभूताचे शुद्धीकरण होते. म्हणून तर श्रावणीला (म्हणजे श्रावणातल्या पोर्णिमेला, म्हणजेच राखी पोर्णिमेला, म्हणजेच नारळी पोर्णिमेला) पंचगव्य प्राशन करतात लोक मंत्रोच्चारात. असे देहाचे शुद्धीकरण जे करीत नाहीत त्यांना मोक्षप्राप्ती नसते. सगळे कसे नीट पद्धतशीर आखून दिलेले. तरी पण मूर्ख लोक, नास्तिक लोक त्याचे पालन करीत नाहीत व नरकात जातात. असो. आपण काय करणार? किती सांगायचे त्यांना? शेवटी त्यांचे नशीब त्यांच्या सवे.
पण नुसती देहाची शुद्धी करूनच भागेल का? देहातील त्या पंचमहाभूतांवर संस्कार पण झाले पाहिजेत. त्याकरिता पंचतत्त्वाचे अध्ययन, पठन नित्य हवे. ही पंचतत्त्वे कोणती? तर वेद, पुराण, उपनिषद, स्मृति व श्रुति. म्हणून कीर्तन, पुराण, भागवत सप्ताह, भटजी वगैरे वगैरे महत्त्वाचे. हे आध्यात्मिक अंग ज्याला नसेल तो म्हणजे, त्याचं म्हणजे, आता काय सांगावं?
एक प्रश्न असाही पडतो की सर्व काही पाचच कसे? पंचमहाभूते, पंचगव्य, पंचतत्त्व, पंचपाळे, पंचेंद्रिय, हाताला पाच बोटे, ब्रह्मदेवाला पाच तोंडे (कालभैरवाने एक छाटण्या आधी). संशोधनाचा विषय आहे.
चार्वाकापूर्वी सर्व काही देवनिर्मित असेच चित्र रंगविण्यात आले. केवढा भार देवावर? जे काही होते, आहे व होणार आहे त्याला तोच जबाबदार. बरे तो पुढे येऊन 'नाही हो! मी असे काहीच केले नाही! मला का वेठीस धरता?' किंवा 'तर मग? मीच सर्व काही केले, करतो, करणार.' असे म्हणणार नाही. कारण तो पडला बोक्कामुच्चु! तो सत्य जाणून घेण्यात मानवाला पुढे येऊन मदत करणार नाही. 'Nature is not obliged to reveal its secrets to mankind' असे एक सुंदर वाक्य ऐकल्याचे आठवते. Nature ऐवजी God असा शब्द घातला की निसर्गगूढ जाणून घेण्याच्या मानवाच्या मूळ जिज्ञासू वृत्तीमुळे त्याला कोणाच्याही मदतीशिवाय किती मोठा पहाड चढायचा आहे हे समजणे शक्य आहे. तो पर्वत पादाक्रांत होईल की नाही याचा केवळ अंदाज लावता येईल. पण मानवाला प्राचीन कालापासूनच विज्ञानाचे, विचारबुद्धीचे शस्त्र मिळाले आहे. विज्ञानाला 'तू माझा सांगाती' म्हणून मानव तो पहाड कर्मठतेने चढतोच आहे.
पर्वत जे चढत नाहीत त्यांना दुरून पर्वतशिखर दिसते. पण जे पर्वतारोहण करण्यासाठी त्याच्या पायथ्याजवळ येतात त्यांना शिखर दिसत नाही. ते नक्की आहे हे फक्त माहीत असते. वर वर गेले तर आपण वा आपल्या पायवाटेनी मागाहून येणारे कोणीतरी कधीतरी शिखरावर पोहोचतीलच पोहोचतील एवढा अदम्य विश्वास व विज्ञानाची शिदोरी घेऊन हा पथिक निघतो. थोडे का होईना वर जातो, वाटेवर आपल्या पाउलखुणा पद्धतशीर उमटवतो, जेणेकरून मागून येणाऱ्यांचे कार्य सुकर होईल, आणि आपले कार्य आटोपून 'नाही चिरा, नाही पणती' असा पंचमहाभूतात विलीन होतो. अशा अनेक पथिकांची शृंखला चार्वाकाने सुरू केली व मागून येणारे त्याचे वंशज मुंग्यांसारखे त्याच शिखराकडे मार्गक्रमण करीत आहेत. कोणत्याही महान कार्याला कोणीतरी, कुठेतरी, कधीतरी सुरुवात करावीच लागते. ती चार्वाकाने केली. खरे म्हणजे त्या आधीच केशकंबलीने केली. खरे म्हणजे त्याआधीच कोणीतरी केली असेल. जिज्ञासा हे बुद्धिदान असलेल्या मानवाचे अविच्छेद्य लक्षण आहे. त्यामुळे सत्याचा हा शोध अतिप्राचीन काळीच मानवाने सुरू केला असावा असे म्हणायला काही हरकत नाही. पंचमहाभूते हा त्याच मार्गावरचा एक महत्त्वाचा 'मील का पत्थर' आहे.
एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या एका पर्वतारोहीला कुणीतरी विचारले 'But why do you have to conquer Everest?'. त्याचे उत्तर फार मार्मिक होते: 'Because it is there.'. हीच विज्ञानमार्गाच्या पथिकांचीही वृत्ती असते. असावी.
पंचमहाभूतांच्या कल्पनेचे मूळ reductionism, म्हणजेच विश्लेषणवाद हे आहे. प्रत्येक गोष्ट ही काही मूल घटक, elementary particles पासून बनली असावी असा कयास व कटाक्ष त्यामागे आहे. स्वयंपाकासारखेच ते आहे. तिखट, मीठ, गूळ, साखर, तेल, गहू, तांदूळ दिले तर कोणीही सुग्रण कितीतरी निरनिराळे पदार्थ करून खाऊ घालेल. शहाजहानला आग्ऱ्याला कैदेत ठेवल्यावर उदार होऊन त्याच्या मुलाने (म्हणजे आपला औरंगजेब हो) त्याला विचारले म्हणतात की 'पापाजान, हम आपको कोई भी एक अनाज साल भर दे सकते है । आप बताईये जो आपको अच्छा लगे ।'. शहाजहान ने हरबरा, म्हणजे चणा निवडला म्हणतात. वऱ्हाडी लोकांना त्याचा हा निर्णय पटेल. कारण आता शहाजहान चून (आजकाल ज्याला बेसन म्हणतात ते), गोळा, भरडा, कढी, भजे, थापी वड्या, छोले, वडे, लाडू, वड्या, बुंदी, चकल्या, शेव ... काय काय खाऊ शकेल. रोज खारे गोड, रोज मेजवानी. सांगायचे तात्पर्य हे की अनेक पदार्थांमागे हरबरा हे एक मूल तत्व असते. आचाऱ्याचे एक महाभूत.
हीच विचारांची कडी पुढे नेली तर सर्व भौतिक, physical गोष्टी किंवा पदार्थामागे काही मोजकी मूलद्रव्ये असली पाहिजे हा विचार तर्कशास्त्रसंमत दिसतो. कुठल्याही गोष्टीचे जर विभाजन करीत गेलो, reduction करीत गेलो तर शेवटी काही अशी द्रव्ये आढळतील की जी विभाजित होत नाहीत, ती मूलद्रव्ये कोणती असावी, तर जी सर्वत्र दिसतात ती. जमीन, पाणी, अग्नी, हवा व आकाश.
हेच ते reductionism किंवा हाच तो विश्लेषणवाद. अतिप्राचीन काळी मानव प्रत्येक निर्मित गोष्ट पंचमहाभूतांपासून बनलेली असते या निष्कर्षाप्रत पोहोचला. अचाट व अफाट प्रतिभेचा तो धनी. नंतर ह्या पंचमहाभूतांना देवांचा दर्जा देणे वगैरे आक्षेपार्ह वा भूषणास्पद मानणे, न मानणे यावर या निष्कर्षाचे महत्त्व अवलंबून नाही. नंतरचा आस्थेचा, श्रद्धेचा, पूजेचा भाग दुर्लक्षित करायला हवा. तो एक वेगळा बिझिनेस होता यावर आता बरेचसे एकमत आहे. पण मूळ सिद्धान्त, विश्वात अगणित विविधता असली तरी त्यामागे काही मोजके घटकच असले पाहिजे हा विचार, पूर्णतया विज्ञाननिष्ठ होता व आहे. ते पाच आहेत, की पन्नास हा मात्र संशोधनाचा विषय होता, आहे व राहणार आहे. त्या अंतिम सत्याच्या पर्वतशिखराकडे मानवाची कूच सुरू आहे. सुरुवात पंचमहाभूतांपासून झाली. पंचमहाभूतांची कल्पना हा त्या पर्वताचा base camp म्हणा ना.
विज्ञानयुगात महाभूतांवर खूप संशोधन झाले. ती पाच नसून अनेक आहेत हे कळायला लागले. आजपासून १०० वर्षांपूर्वीपर्यंत शंभराहून ज्यास्त भूतांचा शोध लागला होता. शंभराहून ज्यास्त elements चा, मूलधातूंचा शोध लागला होता. पूर्ण यादी इतरत्र उपलब्ध आहे. पण काही नावे दिली तर ही नवी भूते कोण हे कळेल. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विश्वातील जवळ जवळ २०-२५ महाभूतांचा, म्हणजे elements चा शोध लागलेला असावा. त्यांचे नाव मात्र भूत नसून 'अणू', Atom झाले होते. इंग्रजीत मात्र elements च टिकून राहिले. हे अणूच विशिष्ट प्रमाणात एकत्र येऊन रेणू, म्हणजे molecules तयार होतात. उदाहरणार्थ, पाणी, म्हणजे 'आप' नावाचे तोपर्यंत पंचमहाभूतातले एक असलेले भूत, भूत नसून उदजनाचे दोन अणू व प्राणवायूचा एक अणू मिळून तयार झालेला रेणू आहे हे विज्ञानाने सिद्ध झाले. तसेच हवा म्हणजे दोन प्राणवायूचे अणू मिळून तयार झालेला प्राणवायूचा रेणू व नत्रवायूचे दोन अणू मिळून तयार झालेला नत्रवायूचा रेणू यांचे मिश्रण आहे हे सिद्ध झाले. पुढे हवेतच या व्यतिरिक्त अॅरगाॅन, क्रिप्टाॅन, क्झेनाॅन, निआॅन व हीलियम वायूही आहेत हे सिद्ध झाले. म्हणजे 'वायू' हे महाभूत नाही हे कळले. त्याचेही घटक आहेत. तसेच पृथ्वीचे म्हणजे मातीचे. वाळू म्हणजे सिलिकाॅनचे दोन व प्राणवायूचा एक अणू मिळून तयार झालेला सिलिकाॅन डायआॅक्साईड नावाचा रेणू आहे. तसेच मातीत ठिकाणपरत्त्वे कधी लोह धातूचे प्राणवायूबरोबर तयार होणारे फेरस वा फेरीक आॅक्साईड, कधी मँगनीज डायआॅक्साईड, कधी अॅलुमिनियम व आॅक्सीजन मिळून झालेला अॅलुमिना तर कुठे असेच इतर धातूंचे आॅक्साईड्स्. माती म्हणजे तर elements चा खजिना. सोने, चांदी, सारे सारे त्याच मातीत. पृथ्वी हे मग महाभूत न राहता अनेक प्रकारच्या रेणूंचा खजिनाच झाला. पृथ्वी, आप आणि वायू ही पंचमहाभूतातली तीन महाभूते आता भूते राहिली नाहीत. पण ती स्वत:च इतर विविध भूतांपासून, अणूरेणूंपासून बनली आहेत हे सिद्ध झाले. आकाश म्हणजे तर काही नाहीच. शून्य, nothing, zilch. राहता राहिले अग्नि महाभूत. ते तर पदार्थच आता मानल्या जात नाही. ती फक्त शक्ति, energy.
हे सर्व शोध लागले आणि पंचमहाभूतांची कल्पना पंचमहाभूतातच विलीन झाली. अर्थात त्यांना देण्यात आलेले देवरूप आस्तिकांच्या मनातून गेले नाही. ती भूते त्यांच्या डोक्यात घर करून राहिली. त्याला इलाज नाही.
शंभर वर्षापूर्वीपर्यंत पंचमहाभूतांची जागा या मूल धातूंनी, elementsनी घेतली. हे मूलपदार्थ आहेत अशी त्यांना मान्यता मिळाली. हे atoms indivisible आहेत असे ठरले. पण यांना कोणी देव मानले नाही कारण काळ बदलला होता. पण हेच विश्वाचे बोक्कामुच्चू आहेत हे मात्र सर्वमान्य झाले.
मूल धातू अच्छेद्य आहेत, अणू अविभाज्य आहेत हे सत्य जवळ जवळ जगमान्य झाले खरे. पण चार्वाक कुठले मानायला तयार? त्यांना तर अणूत घुसून तो कसा बनला हे पाहायचे होते. प्रत्येक निर्मित गोष्टीला निर्माता असलाच पाहिजे हा अट्टाहास काही नवा नाही. हा आस्तिकांचा अट्टाहास त्यांच्यावरच कसा उलटवण्यात आला ही गोष्ट फार मजेशीर आहे. वनस्पती, प्राणी, जीव, जंतू, चल, अचल, सजीव, निर्जीव आपल्याला दिसते, जाणवते. त्यांचा निर्माता कोणीतरी हवाच. पण ते इतके काही विविध व अफाट आहेत की तो निर्माता अति महान, सर्वशक्तिमान असलाच पाहिजे. तोच तो देव. हे आस्तिकांचे देवाच्या अस्तित्त्वाचे 'प्रूफ' असते. त्यांना पटते. पण एकदा एका फाजील चार्वाकाने तेच त्यांच्यावर उलटवले. त्यांचेच प्रमेय वापरून तो म्हणाला की म्हणजे तुमच्या देवांचाही निर्माता असायला हवा. तो कोण आहे? तर्कशास्त्रात याला self reference म्हणतात. तुमचेच प्रमेय तुमच्याच प्रमेयावर वापरणे. यावर मग आस्तिकांकडे उत्तर नसते. मग ते 'जाऊ दे नं. तुम्हाला नाही समजणार ते. ते समजण्यासाठी पण अधिकारी व्यक्ती हवी.' असे म्हणत कशीबशी आपली सुटका करून घेतात. आपण हारलो हे माहीत असले तरी चेहऱ्यावर लटका विजयाचा भाव आणतात व हसून वेळ मारून नेतात. आस्तिक नास्तिक दोघेही खुष. तेरी भी चुप. मेरी भी चुप. असो.
तर शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीपर्यंत अणू अभेद्य होता. Elementary Particle होता. अणू कसा बनतो हे मानवाकरिता गूढ होते. पंचमहाभूतांची जागा त्यावेळी साधारण नव्वद शंभर अणूंच्या यादीने घेतली होती. त्यातले बरेच अणू मानवाला सृष्टीत आढळलेही. Dmitri Mendeleev नावाच्या वैज्ञानिकाने त्याचे वर्गीकरण करून त्यांना एका तक्त्यात छान बसायला जागा दिल्या. १८६९ साली त्याने आपला पहिला Periodic Table प्रसिद्ध केला.
पण एवढ्याने झाले नाही. आणखीही काही अणू असावे असा कयास होता. अणूचेही घटक असावे असाही एक कयास होता. शिखर अजून पुढेच होते व तेथवर अजून पोहोचायचे राहिले होते. पुढे पायवाट नव्हती. त्या मार्गाने तोवर कोणी गेला नव्हता.
१८९७ मधे J J Thomson त्या दृष्टीने एक प्रयोग करीत होता. एका निर्वात परीक्षण नलिकेतून cathodic rays जातात,म्हणजे काहीतरी जाते, व तेच अणूचे काही भाग असावे असे त्याला वाटले. एका लेखात त्याने तसे लिहिलेही. आणखी काही वैज्ञानिकांनी पडताळा घेऊन पाहिला. JJ नेही आणखी प्रयोग करून आपली खात्री करून घेतली. खुंट हालवून पाहणे हे वैज्ञानिकांना फार आवश्यक वाटते. 'मला असा दृष्टांत झाला' असे म्हणून चालत नाही. कोणी विश्वासही ठेवत नाही. पण JJचा कयास खरा ठरला व कॅथाॅडिक rays म्हणजे लहानशा पण असंख्य इलेक्ट्राॅन्स् चा प्रवाह ठरला. अणुविच्छेद झाला. पुढचे शिखर दिसू लागले. नवी महाभूते दिसू लागली.
पण अणू तर न्यूट्रल असतो. मग ऋणविद्युतधारी इलेक्ट्राॅन्स् आहेत म्हणजे धन विद्युत असलेलेही आणखी कोणी त्या अणूत असायला हवे. १९११ मधे Ernest Rutherford ने प्रयोगांती प्रोटाॅन्सचा शोध लावला. इलेक्ट्राॅन व प्रोटान यांचे वजन किती ते ठरले. प्रोटाॅन फार वजनी. इलेक्ट्राॅनपेक्षा १८६० पट भारी. दोघांवर किती चार्ज असतो ते ठरले. विज्ञानाला सर्व दुवे सांधावे लागतात. गप्पा चालत नाहीत. १९३२ मध्ये James Chadwick ने न्यूट्राॅन्सचा शोध लावला. तीस बत्तीस वर्षात अणू कसा बनतो ते चित्र स्पष्ट झाले.
पाहता पाहता सर्व अणु ऋण विद्युत असलेल इलेक्ट्राॅन्स, धनविद्युत असलेले प्रोटाॅन्स, न्यूट्रल न्यूट्राॅन्स यांनी बनलेला असतो हे सिद्ध झाले. प्रोटाॅन्स आणि न्यूट्राॅन्स अणूच्या केंद्रभागी असून इलेक्ट्राॅन्स त्यांच्याभोवती फिरत असतात हे कळले. जणू सूर्यमालाच. अणूमध्ये जितके प्रोटाॅन्स असतात तितकेच इलेक्ट्राॅन्स् असतात व म्हणून त्यावर एकूण चार्ज शून्य असतो हे कळले. Electrons वेगवेगळ्या कवचात (shell) फिरतात हे कळले. हे अगदी कांद्याला असतात तसे थर. प्रत्येक कवचात इलेक्ट्राॅन्स वेगवेगळ्या कक्षेत (orbits) फिरतात हे कळले. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कवचात (टरफलात म्हणा वाटल्यास) ज्यास्तीत ज्यास्त २, ८, १८, ३२ इलेक्ट्राॅन्स असतात हे कळले. एकूण अणू किती असू शकतात याचा हिशोब कळला. उलगडा होत गेला. शिखर सर झाले असे वाटले. एकूण ११८ elements असू शकतात हे सिद्ध झाले. त्यांना नावेही देण्यात आली. काही सृष्टीत सापडतात. काही प्रयोगशाळेत तयार होता. हे सर्व ज्ञान पाठ्यपुस्तकात आले. Mendeleev चा तक्ता, periodic table सुधरवण्यात आला. त्याने ते ११८ अणू पद्धतशीर एका साच्यात बसविले. तो साचा त्याच्याच नावाने Mendeleev Periodic Table म्हणून आजही प्रसिद्ध आहे. 'मेंडिलीव्हस्य नूतन महाभूताय पिरिआॅडिक टेबलाय नम:' म्हणावे असे याचे महत्त्व. आपल्याला संस्कृत येत नसले म्हणून काय झाले? मंत्रासारखे काही तरी आपल्या तोंडातून नित्य झरत असले की झाले. लोकांवर आपल्या विद्वत्तेची छाप पडते. असो.
आज शाळाशाळातून periodic table चे व Atomic Theory चे अध्ययन होते. आता atomic theory मधे पंचमहाभूते म्हणजे पाच एलिमेंट्स नाहीत. ११८ आहेत. हे ११८ अणू श्री ११८ महाभूते ठरली. इलेक्ट्रान, प्रोटाॅन, न्यूट्राॅन हे या महाभूतांना घडविणारे महामहाभूते ठरले. जुनी पंचमहाभूते व त्यांचे अधिष्ठाते देव जुन्या देवघरातच राहिले. आणि आस्तिकांच्या जुनाट डोक्यात.
जुने पाच बोक्कामुच्चु जाऊन नवे ११८ बोक्कामुच्चु आले. पण हे मात्र खरेच आहेत हे आपण सिद्ध करू शकतो. ते conjecture नाहीत. ते देशपरत्त्वे, धर्मपरत्त्वे वेगळे नाहीत. पण त्यामुळेच की काय, त्यांना देवाचा दर्जा मिळाला नाही. उदजनाचे नवरात्र, रेडियम पंचमी, सोडियम पौर्णिमा वगैरेंचा सण साजरा होत नाही. सत्याला देवदर्जा देण्याची काय गरज? जे आहे ते आहे.
पण सत्याचे शिखर खरेच पादाक्रांत झाले का? की आणखीही काही elementary particles आहेत? संशोधन सुरू आहे. नवे बोक्कामुच्चु प्रकाशात येत आहेत. फोटाॅन हा प्रकाशाचा elementary particle असा शोध लागला. Quantum पार्टिकल्स उजेडात आले. आपल्या सत्येंद्रनाथ बोसांनी पण या संशोधनाच्या वादळात खूप मोलाचे काम केले. फोटाॅन सारखे quantum particles त्यांच्या नावाने बोसाॅन (Boson) म्हणून प्रसिद्ध झाले. बाकीचे दुसरा वैज्ञानिक Fermi च्या नावाने फर्मीआॅन म्हणून ओळखल्या जाऊ लागले. नव्या Atomic Theory ने खरोखर जुन्या धारणा व सारे विचारविश्वच बदलले.
आता सर्वच स्पष्ट झाले असले तरी इतके क्लिष्ट झाले आहे की काही विचारू नका. आधी किती सोप्पे होते. फक्त पंचमहाभूते. पंचाईतच नको. हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकी. त्यांची देवात गणना झाल्यामुळे नावे लक्षात ठेवायलाही सोपे. त्यांना मूर्तीत पकडणे शक्य. पूजारतीने प्रसन्न करणे शक्य. ही नवी ११८ भूते आणि बोसाॅन, फर्मिआॅन वगैरे मंडळी मात्र काही म्हणजे काही ऐकायला तयार नाहीत. काही केल्या प्रसन्न होत नाहीत.
काय करावे? देव सोडून ह्या वैज्ञानिकांना हात जोडावे. या ११८ महाभूतांची नावे घ्यावी. हेच खरे विश्वव्यापी बोक्कामुच्चू. त्यांचे स्मरण करावे. Mendeleev च्या Periodic Table ची विज्ञानाच्या देवघरात तसबीर लावावी आणि पुढच्या लिंकवर दिलेली त्यांची आरती म्हणावी. म्हणतांना टाळ कुटायला हरकत नाही. आरती करून बुद्धीचे दान मागावे. नक्की मिळेल.
https://m.youtube.com/watch?v=
करून पहा. निसर्गाचे गूढ कळेल. श्रावणीला पंचगव्य प्राशन न करता देहशुद्धी होईल. वेद, पुराण, उपनिषद, स्मृती, श्रुती या पंचतत्त्वांचे अध्ययन न करता मोक्ष मिळेल. नवी महाभूते खरेच प्रसन्न होतील. भेटायला येतील. स्वत:ची ओळख करून देतील. गाढ आलिंगन देतील. पहा आलीच नवी महाभूते ....
https://m.youtube.com/watch?v=
_____________________
No comments:
Post a Comment