Monday, 1 August 2016


इंद्रधनुष्य


इंद्रधनुष्य आकाशात दिसत असेल तर ते पाहायला जाणार नाही किंवा पाहिल्यावर इतरांनाही बघायला हाक मारून बोलावणार नाही असा विरळाच. इंद्रधनुष्य पाहायला तिकिट लागत नाही. किंवा ज्ञानासारखेच ते अनेकांनी पाहिले तर त्याचे सौंदर्य कमी होत नाही किंवा रंग फिके पडत नाहीत. आकाशातल्या अनेक चमत्कारांपैकी ते एक. अनादी काळापासून ऊनपावसाशी निगडित हा दैवी चमत्कार घडतो आहे आणि अनंत काळापर्यंत घडणार आहे. पण तो चमत्कार कोण घडवतो, तो बोक्कामुच्चु कोण हा प्रश्न दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत तरी अनुत्तरीतच होता. त्यामुळे त्या प्रश्नाचे डिफाॅल्ट उत्तर तेच होते, जे नेहमी असते. देवच त्याला कारणीभूत होता. तोच बोक्कामुच्चु होता. आपल्यामधे इंद्रधनुष्य तर देवराज इंद्राचे. कोणा ऐऱ्यागैऱ्याचे नाही. बोक्कामुच्चु इंद्रच होता.

श्रावणाचा महिना असावा, सकाळची किंवा संध्याकाळची वेळ असावी. नुकताच पाऊस पडून गेलेला असावा किंवा भुरभुर पडतही असावा आणि फुटक्या ढगातून सूर्य डोकावून पाहत असावा. असा रंगमंच तयार झाला की इंद्राने आपले धनुष्य बाहेर काढलेच समजा. उगवता सूर्य पूर्वेला असतांना इंद्रधनुष्य पश्चिम नभपटलावर, व मावळता सूर्य पश्चिमेला असेल तर इंद्रधनुष्य पूर्वेच्या पडद्यावर. उत्तरेला किंवा दक्षिणेला कधी इंद्रधनुष्य देवाने प्रदर्शनात ठेवल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. कमीतकमी जंबुद्वीपावर तसे कोणी पाहिल्याचा पुराणात तरी उल्लेख नाही. पृथ्वीच्या उत्तर आणि पूर्व धृवावर व त्याच्या आसपासच्या टापूवर असे दिसते असे म्हणतात. पण अशा वदंतेवर माझा विश्वास नाही. माझ्याकरिता सत्यप्रमाण म्हणजे पुराण. अगदी अल्टिमेट. पुराणातले ते सारे सत्य व पुराणबाह्य ते सारे असत्य. असो.

दिसायला सुंदर असते म्हणून इंद्रधनुष्याचा निर्माता दानव नसून देव आहे असे जगभर मानतात. इंद्रधनुष्य पाहू नये, ते अकल्याणकारी आहे असेही फारसे कोठे सांगितले वा सुचविले नाही. एक दोन धर्मात अपवाद असतील. देवनिर्मित गोष्ट मंगलच असायला हवी, नाही का? त्यामुळे ग्रहणासारखा इंद्रधनुष्याला विटाळ वगैरे नाही. ते कोणी राहूने की बिहूने घडविले असा त्यांच्यावर किटाळ पण नाही.

ना विटाळ
ना किटाळ
काय तरी विषय!
अगदी रटाळ

अगदी पवित्र गोमय असे हे देवनिर्मित इंद्रधनुष्य. असे निरुपद्रवी पण सुंदर, रंगीबेरंगी, हाती न येणारे असल्यामुळे कवींचे मात्र फारच आवडते. नर्सरी ऱ्हाईम्स असो की प्रसिद्ध निसर्गकवी, मराठी असो की अमराठी, हाती न येणाऱ्या या गोष्टीला कोणी सोडले नाही व शब्दात पकडण्याचा तरी नेहमीच प्रयत्न केला.

सात रंगो की सात परीयाँ
आसमान पर आई हैं
लाल संतरी और पीली ने
सुंदर घटा दिखाई हैं

नीली हरी और बैंगनी
सबके मन को भाई हैं
बरखा रानी के जाने पर
नील गगन पर छाई हैं

छान चाल लावावी, जमल्यास बोटांनी समोर जे दिसेल त्यावर ठेका धरून तबला वाजवावा, व वयाचे भान हरपून हे बालगीत म्हणावे. आपण थेट गेलेल्या बालपणात पुनश्च जाऊन पोहोचू. कमीतकमी आपल्याच एखाद्या नाती पणतीकडून हे गीत बोबड्या बोलात म्हणवून घ्यावे. निर्भेळ आनंद तो काय?

अगदीच हे सारे आपल्याला न जमले तर, बोटांनी किंवा हाताच्या थापेने तबला वगैरे वाजवायचा संकोच वाटत असेल तर, लिंकवर टिचकी तरी मारावी.

https://m.youtube.com/watch?v=11JUeYxL6Z8

तेवढे तरी करावेच. नाहीतर उगाच पुढे पश्चात्ताप होऊन कविता लिहावी लागेल.

बेरंग अश्या या आयुष्याला इंद्रधनुष्याची नेहमीच साथ
सात रंगाचे इंद्रधनुष्य आठवले की आठवतो लहानपणीचा तो काळ
पाउस पडल्या नंतरची फुललेली बहरलेली ती गुलाबाच्या फुलांची माळ

मनात मात्र प्रश्नांचे काहुर व्हायचे
कुणीतरी सांगावे असे वाटायचे
विचारला तर म्हणायचे कशाला उगी देतो त्रास
इतके प्रश्न विचारून काय परीक्षेत तू होणार पास?

आई मला सांगायची
देवानी काढलीय बघ सुंदर रांगोळी
आजी म्हणायची बाबारे
देवाला राग आलाय, आता राक्षसाच्या मरणाची पाळी

आजोबा म्हणायचे
देवाने उचललाय धनुष्य बाण
बाबा म्हणायचे दुसरं काम नाही का रे तुला
कानाखाली काढू का एक छान?

इन्द्रधनुष्या समवेत आयुष्य ही रंगत गेलं
परंतु मोठेपणी त्याच्या सोबत जगायचं मात्र राहून गेलं
बघता बघता दिवसही सरले, वर्षामागून वर्षे गेली
इंद्रधनुष्य आणि त्याची रंगत दर वेळेस चुकतच गेली

मना वाटते बालपणीचे दिवस ते फिरुनी परत यावे
ते मधुर सुंदर क्षण टिपायला स्मार्टफोनने मात्र सोबत असावे
नव्या उमेदीने जगण्यासाठी काढून टाकावी मरगळीची कात
बेरंग अश्या या आयुष्याला इंद्रधनुष्याची सप्तरंगी साथ

लहान थोरांना सारखेच आनंद देणारे निसर्गचित्र म्हणजे इंद्रधनुष्य. नवपरिणितांनाही नाव घेतांना हे हमखास उपयोगी पडते. आजकाल पूर्वीसारखे 'देवापाशी समई, समईची ज्योत' सारखे उखाणे चालत नाहीत. उखाण्यात सुद्धा टिंगल टवाळी पाहिजे.

'हे म्हणाले माग हवे ते,
मी म्हणाली इश्श ।
अमुकराव जरा बहिरेच बाई,
आणले इंद्रधनुष्य ।।'

हा व तत्सम उखाणे प्रसंग रंगवून जातात.

पण इंद्रधनुष्यावर कविता म्हटले की आपल्या बालकवींना मात्र तोड नाही बरें.

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे ।
क्षणात येती सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे ।
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय मांडिले नभोमंडपी कुणी भासे ।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।

लाजवाब! फक्त ठोंबरेच हे रचू शकतात. पण खरेच हे इंद्रधनुष्य आहे तरी काय? तोरण, फुलांची माळा की पृथ्वीवर उतरलेले आकाशीचे ग्रह? असे प्रश्न विचारायला कविह्रदयच हवे असेही नाही. अगदी निरस बोअरिंग मानवाला पण तो प्रश्न पडेलच. 'मला जे दिसते ते आहे तरी काय?' हा प्रश्न कोणालाही पडतोच. तो मानवाचा स्थायीभाव आहे. इंद्रधनुष्याच्या बाबतीतच बोलायचे झाले तर ते अनेकांकरिता अनेक गोष्टी आहे. अगदी चंद्रसूर्यग्रहणासारखीच ही गोष्ट आहे. जगभर इंद्रधनुष्य काय यावर अनेक समजुती पुरातन कालापासूनच, अगदी पाषाणयुगापासून आहेत.

स्कँडिनेव्हिया, म्हणजे आजचे नाॅर्वे, डेन्मार्क व स्वीडन देश, येथील निवासी इंद्रधनुष्याला पृथ्वी व देवलोक (त्यांचे नाॅर्स धर्मातले देव) यातील जळता पूल मानतात. नाॅर्स धर्म हाही आपल्या हिंदु धर्माप्रमाणेच अतिप्राचीन धर्म. इंद्रधनुष्याला ते त्यांच्या भाषेत Bifrost (बीफ्रोस्ट) म्हणतात. त्यांना काय माहीत ते आपल्या इंद्राचे धनुष्य आहे म्हणून? त्यांचा हा पूल फक्त देव आणि युद्धात मृत्यु आलेले योद्धेच वापरू शकतात. धारातीर्थी पडणारेच फक्त देवांव्यतिरिक्त या पुलाने स्वर्गात (त्यांचा स्वर्ग, त्यांच्या देवांचा पत्ता. आपला नाही.) जाऊ येऊ शकतात. त्या काळीही योद्ध्यांना समाजात किती मान होता तेच यावरून दिसते. देवांचे सतत दानवांशी (त्यांचे दानव. आपले कश्यप व दनुचे पुत्र दानव नाहीत) युद्ध सुरू असते. दानवच बरेचदा जिंकतात. तसे झाले की ते हा पूल, बीफ्रोस्ट जाळून नष्ट करतात. देव मग पुन्हा तो बांधतात. म्हणून हा पूल नेहमीच आपल्याला दिसत नाही. कधीमधी दिसतो.

ईसाई, म्हणजे ख्रिश्चन, धर्माप्रमाणे इंद्रधनुष्य हे मानव व देवांमधले अॅग्रीमेंट Covenant) आहे. त्यानुसार देव पृथ्वीवर पूर न येऊ देण्याची हमी देतात. जोवर इंद्रधनुष्य आहे तोवर पूर येत नाही. पण ते जर नसेल, अॅग्रीमेंट जर नसेल, तर मग मात्र पूर येऊ शकतो.

Noah (नोहा) आणि Jehovah (जहोव्वा किंवा चहोव्वा) ची गोष्ट बायबलात आहे. Noah's Arc म्हणून ही गोष्ट प्रसिद्ध आहे. एका प्रलयात फक्त नोहा, त्याचे सात कुटुंबीय व काही प्राणी वाचले. ते वाचले कारण नोहाने जहोव्वाच्या सल्ल्याप्रमाणे एक कमानदार वाॅटरप्रूफ लाकडी घर बांधले व प्रलयात फक्त तेच तरंगले म्हणून वाचले. बाकी देवावर, म्हणजे जहोव्वावर, विश्वास न ठेवणारे सारे नामशेष झाले. नास्तिकांचे हेच होते साऱ्या धर्मात. व्हायला पण हवे. आजही नास्तिक मेल्याचा आस्तिकांना पोट्टातून आनंद असतो. प्रलयानंतरची प्रजा म्हणजे नोहाची संतान. पण त्यांना जेंव्हा पूर्वी झालेल्या सर्वनाशी प्रलयाची गोष्ट कळली व ते घाबरले, तेव्हा जहोव्वाने नोहाला आश्वासन दिले की पुन्हा मी असा प्रलयंकारी विनाश करणारा पूर येऊ देणार नाही. त्या आश्वासनाची आठवण, Reminder म्हणून जहोव्वाने इंद्रधनुष्य आकाशात उमटवले व अधूनमधून उमटवत असतो. मानव आणि देवांमधला तो करारनामा मधून मधून आकाशात दिसत असतो.

बरीचशी आपल्या मनू व मत्स्यावतारासारखी प्रलयाची ही गोष्ट त्यांच्या धर्मग्रंथात आहे. अशीच गोष्ट कापूसकोंड्याची गोष्ट म्हणूनही आजकाल वाचनात आहे.

http://goshtasangu.blogspot.in/2016/03/blog-post.html?m=1

वर पाहिल्याप्रमाणे त्यांच्या, म्हणजे ईसाई लोकांच्या देवाचा त्यांच्या मनूबरोबर, म्हणजे नोहाबरोबर झालेला करारनामा म्हणजे इंद्रधनुष्य. त्याचा मसुदा असा:

This is what God said: ‘I promise that never again will all people and animals be destroyed by a flood. I am putting my rainbow in the clouds. And when the rainbow appears, I will see it and remember this promise of mine.’

तर एकंदरीत इंद्रधनुष्य दिसणे म्हणजे महापूर येणार नाही याची देवदत्त ग्वाही असते. वरवर पाहता ही समजूत अशी तशीच वाटेल. पण त्यात एक मजेदार खोच आहे. इंद्रधनुष्य नेहमीच ढगातून सूर्य डोकावतांनाच दिसते. म्हणजे ते फक्त दिवसाच असू शकते. इंद्रधनुष्य फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसू शकते. म्हणजे दिवसाचाही बराच वेळ ते असू शकत नाही. इंद्रधनुष्य दिसायला नुकताच पाऊस येऊन गेलेला हवा की जेणेकरून हवेमध्ये अजूनही लहान लहान जलबिंदु तरंगत असावे. किंवा पाऊसच अगदी नाममात्र, भुरभुर येत असावा. मुसळधार पावसात, सरीवर सरी कोसळत असतांना इंद्रधनुष्य दिसत नाही. आणि इंद्रधनुष्य नसेल तर पूर न येण्याची हमी देणारे अॅग्रीमेंट देवांवर बाध्य नाही. विचार करा म्हणजे मजा कळेल. कसा बरोब्बर शब्दात पकडतो आपला देव आपल्यासारख्या गरीब मानवाला.

आॅस्ट्रेलियन आदिवासी जनजातींमधे इंद्रधनुष्य म्हणजे विश्वनिर्माता विशाल अनादी अनंत साप आहे. विष्णूच्या शेषासारखा. तोच सर्व जीवांचा निर्माता आहे. म्हणजेच इंद्रधनुष्य म्हणजे त्या आदिवासींचा ब्रह्मदेव. कोरड्या दिवसात तो जमिनीखालच्या जलाशयात वास करतो, त्यातले पाणी ओढून साठवून ठेवतो व नंतर त्याचाच जमिनीवर येऊन वर्षाव करतो. तो वर्षाव म्हणजेच पाऊस. म्हणून पावसाळ्यातच आपल्याला त्याचे दर्शन होते. खरेच God is great! तो कोणाचाही का असेना!

इंद्रधनुष्याची दोन बाजूची दोन टोके जिथे जमिनीला मिळतात तिथे सुवर्णमुद्रा भरलेले दोन बाजूला दोन हांडे असतात. तिथवर चालत जाऊन मनुष्य जेंव्हा ते हस्तगत करेल तेव्हा पृथ्वीवर सुबत्ताच सुबत्ता येईल व सारी रोगराई नष्ट होईल. इतके साधे काम. पण तो आळशी ढोण मानव त्या दृष्टीने प्रयत्नच करीत नाही. काय बिघडेल त्याचे जरा इंद्रधनुष्यापर्यंत चालत गेले आणि हांडे उकरून काढले तर? पण नाही. 'दे रे हरी, खाटल्यावरी' अशी अॅटिट्यूड.

चंद्रसूर्यग्रहणाइतक्याच जगभर अशा इंद्रधनुष्याबद्दल अनेक धारणा व्याप्त होत्या. वर फक्त त्यातल्या चिमूटभर सांगितल्या. इंद्रधनुष्याच्या प्रकटीकरणामागे ज्याचा त्याचा देव असतो. ते वेगवेगळ्या नावाचे, वेगवेगळ्या रूपाचे, वेगवेगळे देवच बोक्कामुच्चु असतात. पण नेहमीप्रमाणेच काही जणांच्या मनी संशय. देवाविषयी संशय. या संशयाने दोन हजार वर्षांपूर्वी मानवाला पोखरायला सुरुवात केली. त्याने विचार करायला सुरुवात केली. त्याला उत्तर मिळायला सुरुवात झाली.

Descartes, उच्चार करायला देकार्त किंवा देकार्ते. दोन्ही "S" मौन. देकार्त महान तत्वचिंतक, गणितज्ञ व शास्त्रज्ञ. बरेच विद्वान आपल्या आॅफिसमधे मोठ्या अभिमानाने एक वाक्य ठळकपणे लावतात: "Cogito ergo sum". ज्ञानावर संस्कृत व लॅटिन भाषेची छाप अतूट आहे. विज्ञानावर तशीच लॅटिनची. वरच्या प्रदर्शनी लॅटिन वाक्याचा अर्थ आहे 'I think, therefore I am'. 'मी' असण्याचे किती सुंदर प्रूफ. मी विचार करतो, म्हणजेच, किंवा म्हणूनच मी आहे. साध्यम् सिद्धम. विचार न करणारा मृतवत असतो. हे चिंतकांचे, मानवांचे सुप्रसिद्ध ब्रीदवाक्य देकार्त या गृहस्थांचेच.

"Dubito, ergo cogito, ergo sum" हेही त्यांचेच. "I doubt, therefore I think, therefore I am". मनात शंका येते, म्हणून मी विचार करतो, म्हणून मी आहे. ज्यांच्या मनात शंकाच नाही, ज्यांना सर्वज्ञान प्राप्त झाले आहे, ते मृतसमान. देकार्त असेही म्हणतो की "In order to seek truth, it is necessary once in the course of our life to doubt, as far as possible, of all things.". आस्तिकांनीसुद्धा देवाच्या अस्तित्त्वावर संशय घ्यावा. तसेच नास्तिकांनी त्याच्या अनस्तित्त्वावर. "Doubt is the origin of wisdom' हेही त्यांचेच वाक्य. देकार्तची सारीच वाक्ये सुभाषिते. संस्कृत नसून लॅटिन सुभाषिते एवढेच.

देकार्तचा उल्लेख करण्याचे कारण असे की या संशयी प्राण्याने इंद्रधनुष्यावर, कमीतकमीत त्याबद्दल असलेल्या धारणेवर सुद्धा संशय घेतला. देकार्तला जन्मभर संशयपिशाच्चाने ग्रासले होते. इंद्रधनुष्याचे मग काय घेता? १६३७ मध्ये त्याने इंद्रधनुष्याची पहेली सोडवली. बरीचशी. आपण सूर्याकडे पाठ करून उभे असतांना जर आपल्या नजरेसमोर असंख्य पावसाचे थेंब तरंगत असले तर त्याच्या दिशेने मागून येणारे सूर्यकिरण त्या पारदर्शक थेंबात शिरतात. शिरतांना ते थोडे वळतात, सरळ रेषेत जात नाहीत. हे वळण ते गुरुत्वाकर्षणानुळे नाही तर refraction (अपवर्तन) मुळे घेतात. प्रकाश हवेसारख्या तरल हलक्या मिडियम मधून पाण्यासारख्या जड म्हणजे अधिक घनता (density) असणाऱ्या पदार्थात शिरतांना वळतो, वाकतो, वेग कमी करतो व पुढे जातो. तोच किरण थेंबाच्या मागच्या पृष्ठभागापाशी पोहोचला की तिथून थेंबातल्या थेंबात परावर्तित, म्हणजे Reflect, होतो. तसे करून तो समोरच्या पृष्ठभागातून पुन्हा बाहेर निघून आपल्याकडे येतो. थेंबातून बाहेर निघून पुन्हा हवेत शिरतांना प्रत्येक किरण पुन्हा एकदा रिफ्रॅक्शनने वळतो. असा अपवर्तित-परावर्तित-अपवर्तित झालेला किरण आपल्या डोळ्यात शिरतो. तो मूळ किरणाला ४२ अंशाचा कोन करून असतो. काही किरण असेच थेंबात शिरून दोनदा आतल्या आत परावर्तित होऊन मग अपवर्तित होऊन आपल्या डोळ्यात शिरतात. ते मूळ किरणाच्या दिशेला ५१ अंशाचा कोन करून असतात. असे असंख्य किरण असंख्य थेंबातून अपवर्तित-परावर्तित-अपवर्तित होऊन आपल्याला दूर कमानीच्या आकाराचा प्रकाश असल्याचा भास देतात. ती कमान मूळ किरणाच्या दिशेला ४२ अंश कोन करून कंपासने काढलेल्या वर्तुळाचा भाग वाटते. तसेच अपवर्तित-परावर्तित-परावर्तित-अपवर्तित होणारे किरण ५१ अंशाचा कोन करून काढलेल्या वर्तुळाचा भाग दिसतात. अशा प्रकारे एकात एक दोन कमानी असतात. निरखून पहाल तर इंद्रधनुष्य दोन असतात. आतले इंद्रधनुष्य बाहेरच्यापेक्षा थोडे ज्यास्त स्पष्ट असते एवढेच. पण कधी कधी बाहेरचे इंद्रधनुष्य इतके फिक्कट असते की ते सहज दिसत नाही.

पण मग सात रंग कुठून आले? फक्त दोन तेजस्वी कमानी दिसायला हव्या होत्या. ते गूढ उकलायला काही देकार्त सतराव्या शतकात येईपर्यंत वाट पहावी लागली नव्हती. सूर्यप्रकाश कमीककमी तीन रंगाचा तरी बनलेला आहे हे २४०० वर्षांपूर्वीच, म्हणजे देकार्त पेक्षा २००० वर्षांपूर्वीच आलेल्या एका गृहस्थांना माहीत होते. नाव अॅरिस्टाॅटल. महा बुद्धिमान. त्यांनी लोलक (प्रिझम) वापरून प्रकाशाचे पृथ:करण केले होते. त्याही आधीच्या प्राचीन ग्रंथांमधे सूर्यप्रकाश सात रंगांचा बनलेला आहे असा उल्लेख आहे. आपल्या पुराणातल्या सूर्याच्या एकचाकी रथाचे सात घोडेही कदाचित याकडे अंगुलीनिर्देश करीत असावेत.

आणखी एका धर्मात सूर्य हा सात आरे (spokes) असलेल्या चाकासारखा आहे असे सांगितले आहे. हे सात स्पोक्स् सात रंगाचे आहेत. पण सूर्याचे चाक वेगाने फिरते व हे रंग सरमिसळ होऊन आपल्याला पांढरा प्रकाश दिसतो असे सुचविले आहे. हाच सूर्य, म्हणजे हेच चाक पावसात फिरतांना त्याचा वेग कमी होतो व म्हणून आपल्याला ते सात रंग इंद्रधनुष्य म्हणून दिसतात असे सुचविले आहे. सत्य जाणून घ्यायची मानवाची तगमग, इंद्रधनुष्य समजून घ्यायची त्याची ही ओढ त्याच्या मानवत्त्वाचे अविभाज्य अंग आहे.

शोध कोणी एक व्यक्ती लावत नाही. पिढ्यान पिढ्या खपतात सत्य कळायला. इंद्रधनुष्य काय हे कळायला अडीच हजार वर्ष लागले. कमीतकमी ७०-८० पिढ्या. आता शेवटी इंद्रधनुष्याचे पूर्ण चित्र स्पष्ट करण्याचे श्रेय न्यूटनला जाते. पण न्यूटन स्वत:च म्हणतो की दिग्गज शास्त्रज्ञांच्या खांद्यावर उभे राहून त्याने सत्य पाहिले. किती नम्रता! काय तो विनय!

वैज्ञानिक शोध म्हणजे दहीहंडीचा खेळ. मजल्यावर मजले, मजल्यावर मजले उभे केले की सर्वात वरचा तो लहानसा गोविंदा दहीहंडी फोडतो. त्याचे कौतुक होते. पण तो तिथवर पोहोचायला खाली कित्येक खांदे खपले असतात. न्यूटनला हे पक्के माहीत होते. तो प्रामाणिकही होता. म्हणून इंद्रधनुष्याचा प्रश्न त्याने पूर्णतया धसास नेल्यानंतर एका समकालीन वैज्ञानिकाने (Hooke) लिहिलेल्या खाजगी पत्राच्या फेब्रुवारी १६७६ मधे दिलेल्या उत्तरात तो म्हणतो:

"What Descartes did was a good step. You have added much several ways, & especially in taking ye colours of thin plates into philosophical consideration. If I have seen further it is by standing on ye shoulders of Giants."

इतका विनयशील तो होता म्हणून तर निसर्गाने गुरुत्त्वाकर्षण, चंद्रसूर्यग्रहण, इंद्रधनुष्य वगैरे आपली सारी गुपिते त्याच्या कानात कुजबुजली नसतील? याज्ञवल्क्य, अॅरिस्टाॅटल, बोस, देकार्त, न्यूटन हे सारे देवदूतच तर नसतील? विश्वात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टीत देवाचाच हात आहे असा जो खोटा आळ त्याच्यावर नेहमी घेण्यात येतो त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्या देवानेच तर त्यांची योजना केली नसेल? बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्था स्थापन होण्यातही देवाचाच तर हात नसेल?

कोण जाणे! मनात संशय तर येतोच येतो. संशय आहे म्हणून विचार आहे. विचार आहे म्हणजेच जीव आहे. विचारशक्ती नसलेला मानव मृतप्राय.

Dubito, ergo cogito, ergo sum. अगदी खरे आहे देकार्त साहेब तुमचे म्हणणे.

पण अजूनही, ज्ञान असूनही ते सर्वांपर्यंत पोहोचत नाही. इंद्रधनुष्याचे रहस्य चुकीच्या स्वरूपात सांगितले जाते. शोध घेतला तर इंद्रधनुष्य कां दिसते हे सांगणारी अनेक पुस्तके, व्हिडिओज दिसतात. पण बहुतांश अजूनही चुकीची माहिती देतात. अर्धसत्याचाच बोलबाला असतो. उदाहरणार्थ:

https://m.youtube.com/watch?v=mGY9jV11FuU

अगदी चूक विश्लेषण आहे हे इंद्रधनुष्याचे. ज्ञानाचा अपभ्रंश. वैज्ञानिक सत्य इतकेही सोपे करायला नको की ते असत्य वा अर्धसत्य होईल. विज्ञान म्हणजे काही पुराण नव्हे. बरेच शोधले म्हणजे एखादा व्हिडिओ सापडतो जो सत्याला टच करतो. उदाहरणार्थ:

https://m.youtube.com/watch?v=xkDhQGXqwCM

पण अजूनही, एक गोष्ट मात्र कित्येकांना अचंबित करते. सूर्य जर गोल, जलबिंदू जर गोल, सूर्यकिरण जर त्यात सर्वत्र शिरून अपवर्तित-परावर्तित-अपवर्तित होऊन माझ्या डोळ्यात शिरतात, माझे बुबुळही जर गोल, तर इंद्रधनुष्य गोलाचा वरचा तुकडाच कां? ते धनुष्य कां? Rainbow बो कां? ते वर्तुळाकृती कां नाही?

खरे म्हणजे ते वर्तुळाकृती दिसू शकते. फक्त आपण इतके उंचावर उभे असून ते पाहायला हवे की जिथून क्षितिज जमिनाला खूप खोलावर मिळतांना दिसेल. आपण एका उंचच उंच पर्वताच्या सुळक्यावर असायला हवे. तेंव्हाच नेमकी संध्याकाळ हवी. पाऊस पडून गेलेला हवा. हवेत जलबिंदू तरंगत असायला हवे. व मागे सूर्य ढगातून मिस्किल हासत असायला हवा. इतके सारे जुळून आले की समोर पूर्ण सप्तरंगी गोलाकार दिसेल.  कदाचित दोन. आतल्या गोलाचे रंग आतून बाहेर येतांना VIBGYOR क्रमाने असतील तर बाह्य गोलाचे रंग तसेच आतून बाहेर येतांना उलट्या क्रमाने, म्हणजे ROYGBIV असतील. दोन सप्तरंगी वर्तुळातील भाग अगदी काळा असेल.

पण मग ते धनुष्य नाही. ती तर प्रेशरकुकरची रिंग झाली. बांगडी. इंद्रकंकण. त्याला प्रत्यंचा कुठे लावायची? विद्युल्लतेचा बाण कसा सोडायचा?

खोटे वाटेल कदाचित. पण गोलाकार, पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्य पाहायला फार दूर जायला नको. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सह्याद्रीच्या सर्वात उंच साल्हेर किल्ल्यावरून काही जणांनी असे इंद्रधनुष्य पाहिले आहे.

http://sagarshivade07.blogspot.in/2013/10/blog-post_26.html?m=1

जुन्या दस्तऐवजातही तशी नोंद आहे. अशा गोल इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असेही नाव आहे. दधिचींच्या अस्थींपासून तयार केलेले हे वज्र पाहायला मात्र वर सांगितलेले सगळे योग जुळून यायला हवे. कपिलाषष्ठीचा योग. पण विज्ञानाला आता त्याचे भुस्कुट नाही. कारण इंद्रवज्र सुद्धा सूर्याचेच असंख्य जलबिंदूनी सूर्यकिरणांचे अपवर्तन-परावर्तन-अपवर्तन किंवा अपवर्तन-परावर्तन-परावर्तन-अपवर्तन करून दाखविलेले प्रतिबिंब आहे. न इंद्र, न धनुष्य, न वज्र. केवळ प्रकाशाचा खेळ. निव्वळ माया.

पण मग आपल्या पुराणातल्या कथा? जंतुकवीने त्या कथांवर आधारित नेमके इंद्रवज्रा वृत्तात केलेले हे कथन? हा सारा कल्पनाविलासच की काय? इंद्रधनुष्याचा बोक्कामुच्चु म्हणजे देव नाहीच की काय?

आकाशि घेवोनि देवे धनुष्या
घेई करी बाण विद्युल्लता
सोडूनी घे वेध वृत्रासुराचा
तो हो धराशायी एका क्षणी

दैत्यासि पाहोनि आचार्य शुक्र
सांगे नको भीति त्वां मृत्युची
मृत्यूहुनी थोर संजीवनी ही
राहो नभी सप्तरंगी धनू

क्रोधीत होवोनि देवेंद्र आता
दधीची ऋषींची करी याचना
अस्थीतुनी साधुनि इंद्रवज्रा
मारीन मी क्रूर वृत्रासुरा

हो देहत्यागा ऋषी सज्ज आता
हवी त्यांसही दैत्यमुक्ता धरा
घेवोनि राजा करी इंद्रवज्रा
नभी सोडतो सप्तरंगी पहा

क्षणी होतसे चूर तो वृत्र दैत्य
पुन्हा येतसे वज्र इंद्राकडे
ते अस्त्र हो नित्य शक्ती तयाची
कधी वज्र नाही यशा वंचित

पुढे अंजनीपुत्र त्रेतायुगात
जसा झेप घेई नभी अद्भुत
तया बालकासी हवा सूर्य हाती
पुन्हा क्रोध देवनृपा येतसे

पुन्हा सोडता वज्र आकाशमार्गे
करी घाव ते बालका हनुवटी
परी घाव भारी करी इंद्र गर्वा
असे शस्त्र ते हो दुधारी जणू

अजूनी धनू वज्र येता नभात
करी बालवृद्धास आकर्षित
असे सप्तरंगी ढगामाजि येता
कडाडे जणू विश्व आनंदित

आपली आपली श्रद्धा आहे. देवदत्त मेंदूचा आध्यात्माच्या पाकात मुरवणी मुरब्बा घालायचा की तो वापरायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

थोडक्यात सांगायचे तर इंद्रधनुष्य, इंद्रवज्र हे सूर्याचे असंख्य जलबिंदूत पडलेले प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंबाइतकेच सत्य आहे. इंद्रधनुष्याचे दर्शन देणारा बोक्कामुच्चु देव वगैरे नाही. जलबिंदू व सूर्यकिरण परावर्तन व अपवर्तनाच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला इंद्रधनुष्याचा भास करवितात. तेच खरे बोक्कामुच्चु. बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्थेने हे चित्र स्पष्ट करण्यात आपले काम नित्याप्रमाणे चोख बजावले आहे. इंद्रधनुष्य हे मृगजळासारखे आहे, माया आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. इंद्रधनुष्य वापरून, त्याची प्रत्यंचा ताणून, नेम घेऊन विद्युल्लतेचे बाण सोडून ढगांना फोडण्याच्या आरोपातून आपले इंद्रदेव बाइज्जत बरी झाले आहेत. दधीचीला प्राण त्यागायला लावून, त्याच्या हाडांपासून इंद्रवज्र तयार करून त्या अस्त्राने शत्रूचा नायनाट करण्याच्या आरोपातूनही इंद्रदेव निर्दोष सुटले. लहानगा हनुमान जन्मताच सूर्य गिळायला येतो व सूर्याला गिळू पाहणाऱ्या राहूला त्रास देतो हे पाहून त्यावर वज्र टाकून त्याच्या हनुवटीला इजा करायचा इंद्रावर होणारा आरोप पण धादांत खोटा ठरला. देवांवरील हे सर्व आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला मानवाला वेळ लागला. पण शेवटी त्याने देवांना न्याय मिळवूनच दिला. विनाकारणच देवराज इंद्रावर बालंट आले होते. पण शेवटी सत्यमेव जयतेच जयते. अज्ञानाची अंधारी रात्र सरून ज्ञानसूर्य उगवलाच. विज्ञानाचे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आलेच आले.

ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्माऽमृतं गमय।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

विज्ञानाला, आणि खरे म्हणजे स्वत:लाच, मानवजातीने केलेली कळकळीची विनवणी म्हणून हा शांतिमंत्र अगदी चपखल लागू पडतो.

_____________________

No comments:

Post a Comment