३
देवी
मराठीत देवी किंवा हिंदीत माता. शब्द वेगळे पण 'मातृ देवो भव' लक्षात घेतले तर वेगळेपणा नाहिसा हेतो. दोन्ही शब्द अगदी सेम टु सेमच म्हणा ना. तर अशा ह्या देवीने प्राचीन काळी हजारो वर्षे, आणि खास करून आता आताच्या काळात जवळजवळ अडीचशे वर्षे खूपच गाजवलीत. ही जगभर, घरोघरी असायची.
बंड्याला दोन तीन दिवस फ्लूसारखा ताप आला. थंडी वाजली, हुडहुडी भरली. डोके दुखले. पाठ दुखायला लागली. ओकारी, म्हणजे उलटी, झाली. दोन तीन दिवसांनी बरे वाटले. पण चौथ्या दिवशी पाठीवर, पोटावर, तोंडावर, हातावर बारीक पुरळ उठत आहे असे वाटले. त्या फुटकुळ्या दोन दिवसांनी बुजण्याऐवजी आणखीनच टुसटुसल्या, पसरट झाल्या, पाण्यानी भरल्यासारख्या दिसायला लागल्या. फुटून पाणी निघून गेले की मग ओसरतील असे वाटले. पण तसे न होता त्या पाण्याचाच रंग पिवळसर होत होत आता पू सारखा दिसू लागला. पूसारखा काय, पूच तो.
सारे जण 'देवी देवी' म्हणायला लागले. बंड्याला घाबरा़यला लागले. वैद्याला दाखवले. तेही 'देवी' म्हणाले. बंड्याला वेगळे ठेवा म्हणाले. खरे म्हणजे त्याला आता ताप वगैरे नव्हता. तरीपण त्याला झालेला रोग इतरांना होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी असे डाॅक्टर म्हणाले. पण बंड्याचे आईवडील काय जुमानतात? मुलांचा ताप आईबाबांना लागत नसतो असे ते म्हणायचे. आई आणि बाबा दोघेही आता उगाचच आपल्या चेहऱ्याला हात लावून बघायचे. त्यांना त्यांचे बालपण आठवले असावे. त्यांच्यावरही लहानपणी असाच देवीचा कोप झालेला होता. काय पाप केले होते ते देवच जाणे. खरे म्हणजे दोघांच्याही आईवडीलांनी, म्हणजे बंड्याच्या दोन्ही आजीआजोबांनी नंतर पापाचा उतारा व्हावा म्हणून भटजी म्हणाले ते सारे केले होते. पण याही पिढीत देवीचा कोप झालाच झाला. अगदी सोडत नाही ही. असो.
बंडूचे ते गुंजेएवढे आंगभर आलेले असंख्य फोड बरे होतांना दिसले. पू जणू जागच्या जागीच आटून गेला. खपल्या धरल्या. त्याही पडल्या. कडुनिंबाच्या पाण्याने बंडूला आंघोळ घालण्यात आली. चेहऱ्यावर, आंगभर त्या देवीचे गड्डे, व्रण मात्र देवीच्या कोपाची साक्ष म्हणून बंडूला जन्मभर वहन करावे लागतील. तेच त्याचे प्रायश्चित्त. गतजन्मीच्या पापांचे. पण जीव मात्र वाचला. बंडू बरा झाला. आईबाबांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण आता बेबीला अगदी तसाच ताप यायला लागला. आईबाबांनी देवाला नमस्कार केला व पुन्हा कंबर कसली. काहीही न बोलता. दोघेही अगदी बोक्कामुच्चु.
घरोघरी, देशोदेशी हीच कथा. देवीच्या कोपाला मानवजातीला फार मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागायचे. करणार काय? पापे करतांना लाज वाटत नाही. कोप होणारच. गतजन्मीचे असो, की या जन्मीचे. पाप ते पापच. प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये तर या रोगाला पापरोग असेच नाव आहे. जंबुद्वीपावरील मागासलेले भारतवर्षच नाही तर इतर देशांमधे सुद्धा देवीची लागण एक मोठीच समस्या होती. अठराव्या शतकात लोकसंख्येच्या जवळजवळ ६०-७० टक्के लोकांना देवीची लागण होऊन त्यातले अनुमाने २०-३० टक्के रोगी दगावत असत. देवीचा कोप. मानव काय करणार? काय करू शकणार?
देवी, म्हणजे small pox सर्वदूर पसरला होता. महासंहारक अशा ह्या रोगाने अठराव्या शतकात तर भयानक रूप धारण केले होते. रोगावर अनेक जमातीत अनेक समज पसरले होते. अनेक उपाय अनेक जण सुचवायचे, पण काही म्हणून काही चालेना. अनेक वदंताही पसरल्या होत्या. अनेक जनधारणा. पण रोगाला कारण बोक्कामुच्चु देवच होता यावर सर्वांचा विश्वास होता. रोगाची लागण झाली तर God's will, लागण होऊनही जीव वाचला तर God's gift.
चेहऱ्यावरचे देवीचे व्रण ही एक नेहमीच्या पाहण्यातली बाब होती. शेतकरी, कामगार, मजूर तर विचारूच नका. इंग्लंडच्या अशाच एका शेतकरी, कामगार, मजुरांच्या वसाहतीत एडवर्ड जेन्नर (Edward Jenner) नावाचा एक युवक डाॅक्टरी शिकला. नंतर मोठ्या शहरी जाऊन, शल्यचिकित्सा शिकून तो तेथेच मोठा सर्जन होऊ शकला असता. पण त्याने तसे न करता आपल्या लहानशा गावीच सामान्य जनतेत राहण्याचे ठरवले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात देवीचा प्रकोप फारच वाढला होतो. जो तो पीडित. जो तो चेहरा खोदलेला. जेन्नर उपचार करायचा, बरेचदा यशही यायचे. पण नक्की रोग देणारा बोक्कामुच्चु कोण हेच माहीत नसल्यामुळे औषधयोजना काय व कशी करायची हाच मोठा प्रश्न होता. काहीतरी ठोकताळ्यावर इलाज चालायचा. बाकी यश देणे न देणे देवाच्या हाती. देवीचा उपचार देवच होता. असा तो काळ होता.
१८७७ च्या इंग्लंडला पसरलेल्या देवीच्या मोठ्या साथीत जेन्नर त्याच्या गावीच वैद्यकी करीत होता. त्याच्या ऐकण्यात आले की गावात देवीच्या व्रणांनी विद्रूप झालेल्या अनेक स्त्रिया असल्या तरी काही मात्र सुखरूप होत्या. जुना काळ होता तो. दीडशे वर्षांपूर्वीचा. स्त्रीचे सौंदर्य ही चर्चेची बाब असे. जनतेत अशी वदंता होती की कित्येक स्त्रिया देवीच्या व्रणांनी विद्रूप (असा शब्दप्रयोग करण्याबद्दल क्षमस्व!) झाल्या असल्या तरी गवळणी, म्हणजे milkmaids मात्र आपले सौंदर्य टिकवून असतात. त्यांना देवीची लागणच होत नाही. दंतकथा, वा गैरसमज म्हणा वाटल्यास. देवी काय परिचयपत्र पाहत असेल कोपण्याआधी? असेलही बा! त्यांचं बुककीपिंग फारच परफेक्ट असत. कोणत्याही धर्मातले ते देव असोत, चित्रगुप्त किंवा इतर धर्मातील त्याचे counterparts आपले काम अगदी चोख बजावतात.
जेन्नरला सुरुवातीला ही जनधारणा सत्य वाटेना. पण त्याच्याही लक्षात कालांतराने हे आले की रूढ लोकमतात काहीतरी तथ्य आहे. गाईंचे दूध काढणाऱ्यांवर देवी प्रसन्न असायची. त्यामुळे देवीच्या फटक्याने विद्रूप झालेल्या बहुसंख्य स्त्रियांमधे मिल्कमेड्स् नितळ त्वचेमुळे आपले सौंदर्य राखून असायच्या व अधिकच उठून दिसायच्या.
रोगाची लागण आणि प्रसार यांचा राहणीशी आणि भोवतालच्या एकंदरीत hygiene शी जवळचा संबंध आहे हे डाॅक्टर असल्यामुळे जेन्नरला चांगलेच माहीत होते. त्याने गवळणींचा त्या दृष्टीने अभ्यास केला. त्याला जे दिसले ते पाहून तो थक्कच झाला. देवीच्या रुग्णाच्या चेहऱ्यावर व आंगावर जश्या फुटकुळ्या येतात तशाच त्याला बऱ्याच गाईंच्या स्तनांवर दिसल्या. त्यातही पू असायचा. म्हणजे गाईंना सुद्धा देवी येतात की काय? त्याचाच संसर्ग दुधावाटे लोकांना होतो की काय? लोकांना दूध पिऊ नका असा सल्ला दिला तर देवीची साथ न पसरण्याला मदत होईल काय? गायच बोक्कामुच्चु आहे की काय? माणसांना होणारा small pox आणि गाईंना होणारा cow pox एकच की काय?
जेन्नर भारतवर्षात असता तरी त्याच्या निदर्शनास हेच आले असते. आपली गाय काय अन् इंग्रज गाय काय. गोमाता ती गोमाता. त्यांच्या व्याधी सारख्याच. देवी, माता आणि गोमाता यांचा हा असा जवळचा संबंध मात्र भारतवर्षात गदारोळ माजवून गेला असता. देवी आणि गाय यांचा असा उल्लेख कदापि खपवून घेतला गेला नसता.
नशिबाने जेन्नर विलायतेत होता. गाय ही त्याच्याकरिता उपयोगी नक्कीच होती, पण देवाचे रूप नव्हती. गाईचा pox मानवांमध्ये small pox पसरवतो हे जर सत्य असेल तर मग गवळणींना तर या रोगाची सगळ्यात आधीच लागण व्हायला हवी होती. पण सत्य अगदी उलटेच होते. हे कोडे उलगडायला वेळ लागला पण शेवटी जेन्नरला जवळजवळ खात्री पटली की देवी झालेल्या गाईंच्या संपर्कात सतत राहिल्यामुळेच गवळणींना देवीची लागण झाली नाही. त्यांना कदाचित गाईंच्या देवी रोगाचा (cow pox चा) संसर्ग झाला असेल. पण गाईंचा तो रोग मानवांना फारसा अपायकारक नाही. गौदोहन करणाऱ्या स्त्रिया त्यांच्याच कुटुंबात राहणाऱ्या बाकी साऱ्यांना देवीची (small pox ची) लागण झाली तरी स्वत: सुखरूप राहत असत. गाईंनी त्यांना जणू अनोखी प्रतिकारशक्ती प्रदान केली असावी.
आणखी विचार करता जेन्नरला एक ब्रेनवेव्ह आली. त्याला असे वाटले की अगदी कमी प्रमाणावर जर कोणाला मुद्दामून गायदेवीचा (म्हणजे cow pox हो!) संसर्ग करण्यात आला, जसा की गवळणींना होत असावा, तर त्या व्यक्तीला फारसा त्रास न होता मानवांच्या देवी रोगाविरुद्ध एक जबर प्रकिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे नंतर देवीच्या साथींमधे ती व्यक्ति रोगाची लागण टाळू शकेल. गायदेवीचा मानवांना फारसा त्रास होत नाही. त्यामुळे हे लसीकरण सहज साध्य होईल.
वैद्यकशास्त्राला वेगळे वळण देणारा हा विचार होता. जेन्नरला या कल्पनेचा प्रयोग करायचा होता. त्याने तसे सुचवून पाहिलेही. पण त्याची फक्त टिंगलच झाली. विरोधही झाला. धर्ममार्तंडांनी (ईसाई) मानवांना पशूंच्या रोगाचा संसर्ग करणे अयोग्य असा निर्णय दिला. त्याला प्रयोग करायची परवानगी मिळाली नाही.
पण जेन्नरला त्याचा होरा नक्की काम करेल असे वाटायचे. त्याने एक दिवस आपल्याच कंपाउंडरच्या ९-१० वर्षांच्या James Phipps नावाच्या मुलाला जाणूनबुजून गायदेवीचा संसर्ग करवला. मुलाच्या हाताच्या एका रक्तवाहिनीला थोडे खरवडून त्यावर गाईच्या देवीच्या फोडातला थोडा पू घासून टाकला. त्या मुलाला cow pox चा संसर्ग होऊन मामुली ताप आला पण फारसा त्रास न होता तो दोन दिवसात बरा झाला. नंतर काही दिवसांनी त्यालाच जेन्नरने मानवांच्या देवीचा तशाच प्रकारे संसर्ग करून पाहिला. पण आता मात्र त्याला संसर्ग व त्यामुळे अपाय झाला नाही. त्याला मानवी देवी आल्याच नाहीत. आता मात्र जेन्नरचे मत अधिकच प्रबळ झाले. जेन्नरने नंतर असेच प्रयोग आणखी १५-२० जणांवर केले. कारण Reproducibility, पुन:सिद्धता हा कुठल्याही वैज्ञानिक प्रयोगाचा महत्त्वाचा निकशच असतो. विज्ञानाला one-off चमत्कार चालत नाहीत. जेन्नरने तर आपल्या ११ महिन्याच्या मुलावरही आपल्या तंत्राचा प्रयोग केला. पूर्ण खात्री झाल्यावर त्याने आपले मत एका वैज्ञानिक लेखात मांडले. पण तत्कालीन डाॅक्टरांनी, व खास करून चर्चने त्याची दखल घेतली नाही. १७९० ची वगैरे ही गोष्ट. जेन्नर १८२३ मधे मृत्यू पावला. १८४० मधे, म्हणजे केवळ १६-१७ वर्षानंतर, त्याचा शोध लसीकरणासाठी वापरण्याची परवानगी सरकारतर्फे देण्यात आली व महाभयंकर देवीच्या रोगाविरुद्ध मानवजातीचे युद्ध सुरू झाले. त्यामुळे नंतर तब्बल १३७ वर्षांनी, १९७७ मधे देवीचे निर्मूलन झाले.
जेन्नर आपला शोध पेटंट करू शकला असता. पण त्या महामानवाने तसे केले नाही. त्यामुळे त्याच्या शोधाचा नंतर जगभर जो उपयोग करण्यात आला त्याचा त्याच्या कुटुंबियांना काहीही फायदा झाला नाही. पण त्याहूनही दु:खाची बाब ही की त्याच्या महान शोधाचा मानवजातीला होणारा असीम फायदा त्याला स्वत:ला पाहता आला नाही. धर्माच्या दलालांनी त्याच्या जीवन काळात तसे होऊ दिले नाही. कुठलाही धर्म असो, विज्ञानाला त्याचा प्रखर विरोध कायम असायचा, व आजही असतो. धर्माला पाखंड हवे. आजही स्टेम सेल रिसर्चला धर्मधुरीणांचा होकार नसतोच. पण आता त्यांना फारसे कोणी विचारत नाही, विज्ञान ब्राह्मणवादाला भीक घालत नाही म्हणून विज्ञान वेगाने पुढे जात आहे.
जगात लसीकरणाची हीच सुरुवात. जेन्नर हा लसीकरणाचा जनक मानला जातो. नंतर बरेच संशोधन झाले. बऱ्याच रोगांमागे देव, दानव, सटवी वगैरे नसून वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत हे कळले. त्याच बॅक्टेरियाचा किंचित प्रमाणात डोज देऊन कोणालाही तात्पुरते वा कायमचे त्या रोगापासून अभय देता येईल हे प्रयोगांती सिद्ध झाले. मुख्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती देण्याची ती पद्धत जगमान्य झाली. जेन्नर विन्नर ठरला. पण त्याला त्याच्या हयातीत बरेच कुत्सित बोल ऐकावे लागले. तो जिवंत असतांना तर तो व्यंगचित्रांचा विषयच झाला होता. त्याने गायदेवीची लस दिलेले लोक रस्त्यावरून सैरावैरा धावताना एका कार्टूनमधे दाखविले होते. त्या सर्व लोकांना गाईचे तोंड फुटले होते. व्यंगचित्रकाराचे खूप कौतुकच झाले असणार. टवाळा आवडे विनोद. जेन्नरच्या नशिबी मात्र टिंगलच लिहिली होती. तो चार्वाक होता ना!
कालांतराने देवीची लस तयार करण्यात आली. पण ती दुसऱ्या मानवाच्या फोडापासून तयार केली गेली नाही. मानवांकरिता देवीची लस गाईच्या देवीतून निर्माण करण्यात आली. त्यासाठी गाई पाळून त्यांना देवीचा रोग होईल, cow pox होईल अशी व्यवस्था करीत. तसे झाले की तिच्या फुटकुळ्यातून वैज्ञानिक बॅक्टेरिया, जंतु काढून माणसांसाठी लस तयार करीत. खरे पाहिले तर देवीची लस त्या दृष्टीने गव्य आहे. पंचगव्यात तिचा समावेश नाही ही गोष्ट वेगळी. अशा रातीने तयार झालेली लस मग जनतेला देण्यात येत असे.
शाळाशाळातून सर्व विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे अशा प्रकारे तयार झालेली देवीची लस टोचण्यात आली. डाव्या हातावर दोन ठिकाणी त्वचेला वरवर काटेरी चक्र फिरवून लस देत असत. मुलीमुले फारच घाबरत. प्रत्येक जण रांगेत सगळ्यात मागे उभे राहायचा प्रयत्न करी. मुले रडत. पण सरकारने कित्येक वर्षे हा सक्तीच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवला. नवजात मुलामुलींना पण दोन्ही दंडांवर ही लस द्यायचे. जन्मभर त्याची खूण राहायची. दोन्ही दंडांवर देवीच्या लसीचे दोन दोन व्रण असणारी शेवटची पिढी आता चाळीशीकडे वळली आहे.
लसीकरणामुळे शेवटी जगातूनच देवी रोगाचे निर्मूलन झाले. १९७७ मधे रोगाची बाधा झालेल्या सोमालियातील Ali Maow Maalin ला देवीचा शेवटचा रोगी मानतात. तेव्हा तो ह्या जीवघेण्या दुखण्यातून वाचला. आता आता ५-६ वर्षांपूर्वी तो मलेरियाने दगावला. मलेरिया निर्मूलन अजून व्हायचे आहे म्हणून. झाले असते तरी काय? तो गेलाच असता दुसऱ्या एखाद्या रोगाने. जायला काय, मूळव्याध सुद्धा पुरते. आज ना उद्या जायचेच आहे हो सर्वांना! म्हणून हरीनाम घ्या.
१९८० मधे जागतिक आरोग्य संस्थेने (WHO म्हणजे World Health Organization) देवीचे रोगनिर्मूलन झाल्याचे जाहीर केले व लसीकरणाची आवश्यकता नाही असे सांगितले. जगातील एक महानाशक साथीचा रोग काळाच्या पडद्याआड गेला. एक युग संपले. शाळाशाळातून दिसणारे लसीकरणाचे भीतिदायक दृष्य फक्त आठवणीत राहिले. आता देवीच्या रोगाचे बॅक्टेरिया फक्त प्रयोगशाळेच सांभाळून ठेवले आहेत. ते चोरून कोणी त्यांना प्रयोगशाळेच्या बंदिगृहातून काढून बाहेर सोडले तर पुन्हा भयानक विध्वंस होऊ शकतो. १९७८ मध्ये प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका संशोधिकेला त्याची खरेच बाधा झाली व ती दगावली. बाधा होण्याला आपण कारणीभूत आहो असे वाटून तिच्या सहयोग्याने आत्महत्या केली. देवीचा बॅक्टेरिया, महामहिम व्हॅरिओला, जिवंत बाँब आहे. पुढेमागे त्याचा जैविक आतंकवादात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जगभरच्या प्रयोगशाळात जपून ठेवण्यात आलेले व्हॅरिओलाचे सँपल्स सुद्धा नष्ट करावे असे अनेकांचे मत आहे. अमेरिका व रशिया तसे करायला तयारही झाले होते व २०११ मधे तसे करणार होते. पण माशी शिंकली. ती केव्हा कुठे शिंकेल ते देवालाच माहीत. पण त्यामुळे देवीचा बोक्कामुच्चु व्हॅरिओला अजूनही प्रयोगशाळात जिवंत आहे व Bio-terrorism करिता भविष्यात वापरात येण्याची शक्यता अजूनही पूर्णपणे नाकारता येत नाही. पुन्हा देवीचा कोप!
पण आजतरी देवी रोग घडवणारा तो बोक्कामुच्चु डब्बाबंद झाला आहे. आपल्या देवीवर आलेला आळ चुकीचा होता. तिने बिचारीने काहीच केले नव्हते. ती काही कोपत बीपत नव्हती. रोगाला आपण उगाचच देवी असे नाव दिले. लाखो मृत्यूंचे खापर विनाकारणच देवीच्या माथी फोडण्यात येत होते.
लसीकरण, म्हणजे vaccination, नंतर अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वापरण्यात आले. काॅलरा, टायफाॅईड, गोवर, कांजण्या, पोलिओ वगैरे वगैरे. देवीसारखेच आता पोलिओचेही निर्मूलन झाले आहे. पुढे आणखी कशाचे होईल. आता तर जन्म झाल्याबरोबर vaccination सुरू होते. नंतर बूस्टर डोजेस. नंतर दुसरा, मग तिसरा बूस्टर. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले. सरासरी ३५ वर्षे आयुर्मर्यादा असलेल्या आपल्या देशात तीच सरासरी आता साठच्या वर आहे.
जेन्नर हा लसीकरणाचा आद्य प्रवर्तक, जनक. त्याच्यामुळे किती जीव वाचले असतील याची गणतीच करायला नको. किती पुण्य मिळाले असेल त्याला! आपला सहधर्मीय असता तर नक्कीच स्वर्गात गेला असता (आपला नसल्यामुळे heaven ला गेला असेल.). जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त. पण त्यामुळे आपले किती नुकसान झाले असते? असे युगप्रवर्तक तर आपल्याला विपुल रोगराईंनी युक्त पृथ्वीवर हवे. वारंवार हवे. त्यांना तर हा फेरा कायमचा हवा. त्यांचे वर काय काम? तिथे न रोग ना व्याधी. नुसते गंधर्व आणि अप्सरा! काय हे?
Vaccination ह्या शब्दाचा जनकही जेन्नरच आहे. ह्या शब्दाचे मूळच vacca, म्हणजे लॅटिनमधे गाय असे आहे. गाईला cow pox झाला म्हणून जेन्नरला परीस मिळाला. त्याचा वापर करून त्याने वैद्यकीय चिकित्सेचा कायापालट केला. मानवाचा देवीसारख्या महाभयंकर साथीच्या रोगापासून बचाव केला. नवलाची गोष्ट म्हणजे गाईंना अजूनही देवीचा रोग ग्रासतो. कोंबड्यांनाही. मोरांनाही. Pox च्या बॅक्टेरियाच्याच त्या वेगवेगळ्या strains म्हणा ना. पण बॅक्टेरियाची मानवाला ग्रासणारी स्ट्रेन मात्र नामशेष झाली. फक्त नामच शेष राहिले त्या व्हॅरिओला बॅक्टेरियाचे. किती उपकार आपल्यावर त्या गोमातेचे. गाईला म्हणून तरी गोमाता म्हणावे. तिनेच जणू आपल्याला देवीमुक्त केले.
देवी निर्मूलन झाले. ते जागतिक पातळीवर जाहीरही करण्यात आले. पण त्या निर्मूलनात आपल्या नागपूरचा सिंहाचा वाटा होता हे आज फारसे कोणास माहीत नाही. भारतभर पुरेल एवढी लस नागपूरला उत्पादित होत असे. देवी (म्हणजे माता) निर्मूलनाचे केंद्रीय आॅफिस (म्हणजे कचेरी) नागपूरला होते. तीच कचेरी म्हणूनच 'माता कचेरी' म्हणून प्रसिद्ध होती. देवी ऐवजी माता हा हिंदी शब्द वापरण्यात आला कारण नागपूर मध्य प्रांताची राजधानी होती व भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. आता माता कचेरी हे फक्त नाव राहिले आहे कारण देवी निर्मूलन झाले आहे. आजही तेथे आरोग्य उपसंचालकांचे कार्यालय मात्र आहे. आजही नागपूरला माता कचेरी चौक आहे. परंतु त्याचा उद्गम कोणाला ठावे नाही. माता कचेरी नावामागचा इतिहास नागपूरकरांनी तरी अभिमानाने सांगावा असा आहे. माताकचेरीच्या आवारातच गाई पाळून, त्यांना देवीचा संसर्ग करून त्यापासून लस तयार केली जाई. आज तेथे गाई नाहीत, देवी नाही. नाव फक्त आहे.
देवीचा रोग खरे म्हणजे पुराणांइतकाच पुरातन. इजिप्तमधे इसवी सनापूर्वी ११५७ मध्ये, म्हणजे आजपासून ३१७३ वर्षांपूर्वी मरण पावलेल्या Pharaoh Rameses V, म्हणजे त्या नावाचा पाचवा राजा, याच्या ममीवर (रसायने वापरून सुरक्षित ठेवलेले मृत शरीर) देवीचे व्रण स्पष्ट दिसतात असे म्हणतात. देवीचा रोग अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वीपासून होता असे संशोधकांचे मत आहे.
हा रोग इतका लागट आणि मारक की त्याचा जैविक अस्त्र (biological weapon) म्हणूनही वापर करण्यात आल्याचे दाखले आहेत. उदा:
"Smallpox was also used as a biological weapon by the British. In 1763, Sir Jeffrey Amherst, the Commander-in-Chief of the British forces in North America, wrote to Colonel Henry Bouquet: "Could it not be contrived to send smallpox among these disaffected tribes of Indians?" They did and it decimated the Native American population."
आतंकवाद हा नवा आहे असे आपण समजतो. पण जैविक आतंकवादाचा (bio terrorism चा) इतिहासातला हा दाखला वाचला की अंगावर शहारे येतात. १९६० च्या आसपास देवीमुळे दर वर्षी पाच लाख लोक मृत्युमुखी पडत असत. पुन्हा मानवाने त्या रोगाचा अस्त्र म्हणून उपयोग केला तर?
इतक्या पुरातन रोगावर इलाज शोधायचे प्रयत्न पण तितकेच पुरातन असावे. १७२१ मधे तुर्कस्थानात विलायतेच्या राजदूताची पत्नी असाच एक इलाज तिथल्याच स्त्रियांकडून शिकून आली. हा इलाज रोगापेक्षाही भयंकर वाटेल असा आहे. निरोगी व्यक्तीला काही दिवस उपाशी ठेवून, नंतर त्याचे सुईने टोचून बरेच रक्त काढून टाकीत. नंतर त्याच्या एखाद्या रक्तवाहिनीला थोडे खरवडून त्यावर एखाद्या देवीच्या रोगाची सौम्य लागण झालेल्या रोग्याच्या फोडातील पू चोपडून देत. अशा तऱ्हेने त्याला मुद्दामून संसर्ग करवून इतर तशाच रोग्यांबरोबर डांबून ठेवत. तो बरेचदा दगावतही असे. बरा झालाच तर मात्र तो उरलेल्या आयुष्यभर देवीपासून मुक्त होत असे. जेन्नरवरही लहानपणी असा प्रयोग झाला होता अशी त्याने आठवण लिहून ठेवली आहे. तसे म्हटले तर हा लसीकरणाचाच Primitive प्रकार. रोगाचा इलाज रोग. काट्याने काटा काढणे. पण यात निरोगी व्यक्तीला प्रत्यक्षात तोच रोग होत असे.
तुर्कस्थानातून विलायतेला देवीच्या इलाजाची ही पद्धत आणणारीचे नाव Lady Mary Wortley Montagu असे होते. ती कवयित्रीही होती. कविता करण्याची साथही तशी फार जुनी. आजकाल तर जंतू स्वत:च कविता करतात म्हणे. असो. Small pox कसा रोग्याचे आयुष्य उध्वस्त करतो यावर तिची Flavia शीर्षकाची कविता आहे. प्रसिद्ध आहे. कवितेची नायिका Flavia ही एक सौंदर्यवती मुलगी होती. पण तिला देवीने ग्रासले.
The wretched FLAVIA on her couch reclin'd,
Thus breath'd the anguish of a wounded mind;
A glass revers'd in her right hand she bore,
For now she shun'd the face she sought before.
How am I chang'd ! alas ! how am I grown
A frightful spectre, to myself unknown!
Where's my Complexion? where the radiant Bloom,
That promis'd happiness for Years to come?
Then with what pleasure I this face survey'd!
To look once more, my visits oft delay'd!
Charm'd with the view, a fresher red would rise,
And a new life shot sparkling from my eyes!
Ah! faithless glass, my wonted bloom restore;
Alas! I rave, that bloom is now no more!
The greatest good the GODS on men bestow,
Ev'n youth itself, to me is useless now.
There was a time, (oh! that I could forget!)
When opera-tickets pour'd before my feet;
And at the ring, where brightest beauties shine,
The earliest cherries of the spring were mine.
Witness, O Lilly; and thou, Motteux, tell
How much Japan these eyes have made ye sell.
With what contempt ye you saw me oft despise
The humble offer of the raffled prize;
For at the raffle still the prize I bore,
With scorn rejected, or with triumph wore!
Now beauty's fled, and presents are no more!
For me the Patriot has the house forsook,
And left debates to catch a passing look:
For me the Soldier has soft verses writ;
For me the Beau has aim'd to be a Wit.
For me the Wit to nonsense was betray'd;
The Gamester has for me his dun delay'd,
And overseen the card, I would have play'd.
The bold and haughty by success made vain,
Aw'd by my eyes has trembled to complain:
The bashful 'squire touch'd by a wish unknown,
Has dar'd to speak with spirit not his own;
Fir'd by one wish, all did alike adore ;
Now beauty's fled, and lovers are no more!
As round the room I turn my weeping eyes,
New unaffected scenes of sorrow rise!
Far from my sight that killing picture bear,
The face disfigure, and the canvas tear!
That picture which with pride I us'd to show,
The lost resemblance but upbraids me now.
And thou, my toilette! where I oft have sat,
While hours unheeded pass'd in deep debate,
How curls should fall, or where a patch to place:
If blue or scarlet best became my face;
Now on some happier nymph thy aid bestow;
On fairer heads, ye useless jewels glow!
No borrow'd lustre can my charms restore;
Beauty is fled, and dress is now no more!
Ye meaner beauties, I permit ye shine;
Go, triumph in the hearts that once were mine;
But midst your triumphs with confusion know,
'Tis to my ruin all your arms ye owe.
Would pitying Heav'n restore my wonted mien,
Ye still might move unthought-of and unseen.
But oh ! how vain, how wretched is the boast
Of beauty faded, and of empire lost!
What now is left but weeping, to deplore
My beauty fled, and empire now no more!
Ye, cruel Chymists, what with-held your aid!
Could no pomatums save a trembling maid?
How false and trifling is that art you boast;
No art can give me back my beauty lost.
In tears, surrounded by my friends I lay,
Mask'd o'er and trembled at the sight of day;
MIRMILLO came my fortune to deplore,
(A golden headed cane, well carv'd he bore)
Cordials, he cried, my spirits must restore:
Beauty is fled, and spirit is no more!
GALEN, the grave; officious SQUIRT was there,
With fruitless grief and unavailing care:
MACHAON too, the great MACHAON, known
By his red cloak and his superior frown;
And why, he cry'd, this grief and this despair?
You shall again be well, again be fair;
Believe my oath; (with that an oath he swore)
False was his oath; my beauty is no more!
Cease, hapless maid, no more thy tale pursue,
Forsake mankind, and bid the world adieu!
Monarchs and beauties rule with equal sway;
All strive to serve, and glory to obey:
Alike unpitied when depos'd they grow;
Men mock the idol of their former vow.
Adieu! ye parks! — in some obscure recess,
Where gentle streams will weep at my distress,
Where no false friend will in my grief take part,
And mourn my ruin with a joyful heart;
There let me live in some deserted place,
There hide in shades this lost inglorious face.
Ye, operas, circles, I no more must view!
My toilette, patches, all the world adieu!
देवी व इतर भयंकर साथीचे रोग केवळ अंधविश्वासामुळे व धर्माचार्यांच्या स्वार्थामुळे जुन्याकाळी अधिकच बोकाळले. धर्ममार्तंडांनी तर रोगाचा पद्धतशीर गैरफायदाही घेतला. रोगाला दैवी कोपाशी जोडून त्याचा उतारा म्हणून पीडित जनतेकडून नवस सायास, पूजा पाती करवून दान दक्षिणा उकळली. देवाचेही नाम बदनाम केले, जनतेलाही मृत्यूच्या खाईत लोटले व स्वत:चे पोट भरले. या रोगांचा इतिहास वाचला तर स्वार्थ, भोळा विश्वास, अंधश्रद्धा आणि अवास्तव भाविकता व आस्तिकता काय करू शकते हे कळते. असो. या रोगांच्या साथी गेल्या खऱ्या. पण आस्तिकतेची व अंधश्रद्धेची साथ अजूनही जोरावर आहे. लहानपणीच जाणीवपूर्वक या रोगांची लागण केली जाते. म्हातारपणी काही उद्योग राहिला नाही की चांगले चांगले सुशिक्षीत लोक टाळ कुटून, कीर्तन करून त्या रोगांची भोळ्याभाबड्या बायाबापड्यात लागण करतात. त्यांना खतपाणी देतात. दक्षिणाही उकळतात. असो.
अंधश्रद्धेच्या साथीचे निर्मूलन लसीकरणाने होणार नाही. कारण हा रोग बॅक्टेरियामुळे होत नाही. हा मनोरोग आहे. हे लोक मनोरुग्ण आहेत. हे रोग इतर जनावरांना होत नाही. आपण कधी कुत्र्यामांजरांना पूजापाती करतांना पाहतो का? हे देवा, मला आज एक लठ्ठमुठ्ठ उंदीर दे, मी अमुक करीन असे मांजर म्हणते का? फक्त मनुष्यप्राण्यालाच हा रोग होतो. त्याचे व्रण मानवी मेंदूवर पडतात असे म्हणतात.
या मानसिक रोगाचे निर्मूलनही होईलच होईल. एखादा जेन्नर येईलच येईल. विज्ञानजन्य प्रगती या रोगावर अँटिबायोटिकाचे काम करेलच करेल. गुण यायला वेळ लागेल एवढेच.
प्रत्येक वैज्ञानिक शोधामागे काही ना काही controversy, विवाद असतोच असतो. नक्की शोध कोणी लावला हे सांगणे बरेचदा कठिण असते. एक मत असेही आहे की प्रत्येक शोधाकरिता पूरक अशी पार्श्वभूमी तयार व्हावी लागते. ती झाली की कोणीतरी निमित्त होतो व तो शोध लागतो. न्यूटन ऐवजी बंडूच्या डोक्यावर झाडाचे फळ पडले असते तर त्याने सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असता. तो आज Sir Bandu म्हणून प्रसिद्ध असता. असे असल्यामुळेच एकच शोध एकाच वेळी स्वतंत्र रित्या वेगवेगळे लोक लावू शकतात. विज्ञानात असे अनेक दाखले आहेत. तसेच देवीचे झाले का? आपला पण कोणी जेन्नर होता का? आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमधे पण देवीच्या इलाजावर काही भाष्य आहे का? सुश्रुतसंहितेत, चरकसंहितेत काही उल्लेख आहे का? धन्वंतरीने काही लिहून ठेवले आहे का?
हाही एक संशोधनाचा विषय आहे. तुटक तुटक धागे जुळत आहेत. राजसिंहसुधासमग्रहणम् नामक ग्रंथात मसूरिकाचिकित्सा नामक अध्याय आहे असे म्हणतात. राजसिंह, देवीसिंह हे सतराव्या शतकातील बुंदेलवंशाचे राजे. मसूरिका म्हणजे संस्कृत भाषेतील देवीच्या रोगाचे नाव आहे. संचारिचुण्डिका असेही नाव आहे संस्कृतमधे. बाकी संस्कृतमधे नावे खूपच भारदस्त असतात. साध्या बंडूला बांडीवसेन म्हणतात म्हणे. असो. John Bentley (मृत्यु १८२४) ने केलेल्या पुरातन संस्कृत ग्रंथांच्या संशोधनाचा आढावा Aufrecht नामक अभ्यासकाने घेतला व त्यातील काही श्लोकांचे काहीसे तुटक तुटक इंग्रजी भाषांतर असे दिले आहे.
.....There are plukes (grantha, knot, lump) on the breasts of cows, with discharge.
One should collect the pus from them, and protect it carefully.
Preceded by the illnesses of Śītalā, having placed on the surface (pratīka?) of a child,
with a small knife a wound like the wound of a mosquito,
having made it enter into the blood, with the pus itself,
and with the bloods on a little brush, the wise person to what is cured.
The very best physician fearlessly approaches (m-? upaiti) on the child ......
'गाईला येणाऱ्या देवीच्या फोडातील पू मुलाच्या हातावर रक्तापर्यंत पोहोचेल अशी जखम करून लावावा' असे काहीसे देवी रोगाच्या चिकित्सेबद्दल सांगितले आहे. देवीच्या उपचारावर आपल्या समाजातील pre-Jennerian claim वर बरेच संशोधन आहे. चिकित्सकांनी वाचावे.
http://cikitsa.blogspot.in/
http://cikitsa.blogspot.in/
हे विवरण तर, खरे असो की खोटे, vaccination सारखे झाले. पण मग? पुन्हा आपल्या आचार्यांनी धर्मसभेत त्याविरुद्ध निर्णय दिला होता की काय? तो ग्रंथच इंद्रायणीत बुडवायला सांगितला की काय? जलदिव्य करायला सांगितले की काय? हा रोग देवीचा कोप आहे व तो मंत्रोच्चारानेच बरा होतो असे ठासून सांगितले की काय? मंत्रोच्चार करण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांनाच आहे असे सांगून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून भारतवर्षाला व ओघाने जगाला नंतर काही शतकांनी येणाऱ्या जेन्नरची वाट पाहायले लावले की काय? आणि तोवर आपला धर्मरक्षणाचा व्यवसाय सुरूच ठेवला की काय?
पण असे प्रश्न विचारणारे आपण कोण? आपल्याला तो अधिकार दिला कोणी? आपण म्हणजे पिपीलिका, मुंगी. आपण काही विहंग नाही काही. उगाच असे प्रश्न विचारले तर धर्मसभा आपली 'पिपीलिका चुंबति चंद्रमंडलम्' म्हणून टिंगल करेल. लहान तोंडी मोठा घास घ्या कशाला?
___________________
No comments:
Post a Comment