७
पुष्पक
लहान मूल पालथे पडून पुढे घुसायला शिकले की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. त्याला पहिल्यांदा गती येते, वेग येतो. पण त्याचा तो आनंद फार काळ टिकत नाही. त्याला इतक्या मेहनतीने थोडेसेच पुढे सरकणे आता आवडत नाही. आपला वेग आणखी वाढवण्याच्या नादात तो रांगू लागतो. पुन्हा चेहऱ्यावर आनंद उमटतो. पण फार काळ नाही. दिल मांगे मोर! मोर म्हणजे more. Peacock नाही. मराठीत स्पष्ट ठसठशीत उच्चार मोअर. असो. अधिक वेगाचा ध्यास बाळाला आईचा घोळ धरून उभे करतो, भिंत धरून पाऊल पाऊल पुढे जायला शिकवितो, हात सोडून पावले उचलणे शिकवितो, आधाराशिवाय चालायला शिकवतो, धावायला शिकवतो. तोच मग पुढे जाऊन Usain Bolt होतो. दहापेक्षा कमी सेकंदात १०० मिटर धावतो व जगज्जेता होतो.
अशी वैयक्तिक प्रगती इतरही प्राण्यात दिसते. पण सृष्टीमध्ये ८४ लक्ष योनींंमध्ये खरा वेगाचा ध्यास फक्त एकाच जीवाला, मानवाला. तेवढ्यासाठी तो वानराचा नर झाला. पुढचे दोन पाय उचलून मागच्या दोनावर उभा झाला व चतुष्पादाचा द्विपाद झाला. तेवढ्यासाठी तो घोड्यावर बसला, तेवढ्यासाठी त्याने चाकाचा शोध लावला. सायकल आली, स्कूटर आली, मोटर आली, विमान आले, अवकाशयान आले.
पण मानवाचा निर्माता देव? त्याचे काय? त्याचे असे नाही. देवांना गतीचे बंधन नाही. 'मारुततुल्य वेगं' म्हणजे वाऱ्याशी तुलना करता येईल असा वेग असणारा मारुती, म्हणजे हनुमान आपण दर शनिवारी, व साडेसाती असेल तर रोज स्मरतोच. वाऱ्याचा वेग फारच फार तर किती? मोठे चक्रीवादळ आले तरी तासाला दीडशे, दोनशे किलोमिटर एवढाच. उसेन बोल्टचा वेग दहा सेकंदाला १०० मिटर धरला तरी तो फारच फार तर एका तासाला ३६ कि.मी. जाईल. त्या मानाने श्रीरामदूत नक्कीच ५-६ पट ज्यास्त वेगवान. पण देवांनी मानवापेक्षा फक्त ५-६ पटच सरस असावे हे काही आपल्याला पटत नाही बुवा.
एखादी व्यक्ती किंवा एखादा प्रकल्प अगदीच हळूहळू पुढे जात असेल तर 'अगदीच मुंगीच्या पावलानी पुढे जातो' अशी आपण टिंगल करतो. बिचारी मुंगी. पण तिच्या शरीराच्या मानाने ती तशी चपळच नाही का? वेगवेगळ्या प्राण्यांचा वेग मोजण्याची एक फार छान वैज्ञानिक पद्धत आहे. ताशी किती कि. मी. किंवा सेकंदाला किती मिटर मोजण्याएवजी कापलेले अंतर त्या त्या प्राण्याच्या देहाच्या लांबीनुसार मोजणे अधिक योग्य आहे. प्राण्याची लांबी किंवा उंची समजा क्ष असेल तर एका सेकंदात तो असे किती क्ष पुढे जातो हे जर पाहिले तर प्राण्यात अधिक चपळ कोण हे ठरवता येईल. उदाहरणार्थ, समजा उसेन बोल्ट १० सेकंदात १०० मिटर धावत असेल, म्हणजे एका सेकंदात १० मिटर धावत असेल व त्याची उंची सहा फूट किंवा अंदाजे २ मिटर असेल तर एका सेकंदात तो ५ body lengths धावतो असे म्हणता येईल. म्हणजेच मानवाचा वेग ५ body lengths per second म्हणायला हरकत नाही. मग आता असाच मुंगीचा वेग पहा. म्हणजे आता मुंगी आणा, तिची लांबी मोजा, मग तिला सरळ रेषेत ठराविक अंतर धावायला लावा, stop watch घेऊन मग तिला तसे करायला किती वेळ लागतो ते पहा, मग काळ काम वेग गणित मांडून तिचा वेग काढा. सांगितली कोणी एवढी कटकट? तेवढच काम आहे का आपल्याला?
पण आपण कशाला करायचं? वेडे वैज्ञानिक आहेत ना असले धंदे करायला. काम ना धंदा, हरी गोविंदा. आता हेच पहा ना.
https://m.youtube.com/watch?v=
एक फूट, म्हणजे १२ इंच, म्हणजे ३०० मिलींमिटर धावपट्टी पार करायला मुंगीला साधारण ४ सेकंद लागले. म्हणजे ती एका सेकंदाला ३ इंच, म्हणजे ७५ मिलिमिटर धावली. साखरेला लागणारी ती मुंगी साधारण दोन मिलीमिटर लांबीची. म्हणजे एका सेकंदात मुंगी ३७-३८ body lengths धावते. आपण फारच फार तर ५-६ बाॅडी लेंग्थ्स धावू. आपण म्हणजे आपण नाही बरे! आपण म्हणजे उसेन बोल्ट. म्हणजे ती 'साखरेचा रवा' खाणारी मुंगी आपल्यापेक्षा चपळ, आपल्यापेक्षा वेगवान. ती जर देहाने आपल्या एवढी असती तर सहज १५० कि.मी. तासाला चालली असती. म्हणजे वाऱ्याच्या वेगानी. म्हणजेच आपल्या वातात्मज रामदूतासारखीच ती वेगवान.
पण मग बाकीचे प्राणी? त्यावरही हे रिकामटेकडे वैज्ञानिक प्रयोग करतात की काय? सांगायला लाज वाटते, पण खरेच करतात. सर्वात तेज एक लहानसा कीडा आपल्या शरीराच्या ३२० पट अंतर एका सेकंदात पार करतो. म्हणजे उसेन बोल्टपेक्षा ५० पट अधिक वेगवान. मारा इथे टिचकी आणि वाचा.
http://voices.
तर हे असे आहे. कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी आपण फारच स्लो प्राणी आहोत. काय करावे? ठेविले अनंते तैसेची रहावे.
पण त्या अनंताचे मात्र तसे नाही. त्याचा वेग असीम. त्याच्यापाशी विमान आठवण मागे नेईल तेव्हापासून होते हे आपण जाणताच. ध्रुवबाळ, बाळ कसला, ध्रुवमहाराज, विमानानेच तर वर गेले. सत्ययुगातली गोष्ट. पुराणांवर विश्वास ठेवावा तर आजपासून लाखो करोडो वर्षे पूर्वीची. त्रेतायुगातही रावणापाशी विमान होते. आपलाच सावत्र भाऊ कुबेर याचे ते विमान त्याने कपटाने मिळविले होते हे तर आपण जाणतोच. चोट्टा कुठला! त्या कपटी रावणाचा वध करून, निस्पृहपणे सोन्याची लंका बिभीषणाच्या सुपूर्द करून श्रीराम सहकुटुंब सहपरिवार त्याच विमानात बसूनच तर अयोध्येला आले होते. त्या विमानाचे वर्णन सर्व पुराणात आहे.
संस्कृतात विमान शब्दाचा अर्थ भवन, राजवाडा असाही आहे. अर्थात् आकाशाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे वाहन असाही अर्थ आहेच. वाल्मिकी रामायणात रावणाच्या पुष्पक विमानाचे सविस्तर वर्णन आहे.
ततो ददर्शोच्छ्रितमेघरूपं
मनोहरं काञ्चनचारुरूपम्
रक्षोधिपस्यात्मबलानुरूपं
गृहोत्तमं ह्यप्रतिरूपरूपम्
हनुमानाला दिसलेल्या रावणाच्या विमानाचे हे वर्णन आहे. रावणाच्या शक्तीला अनुरूप असे हे उत्तम व अनुपम विमान मेघांप्रमाणे उंच व सुवर्णासारखे सुंदर कांतीचे असलेले होते.
महीतले स्वर्गमिव प्रकीर्णं
श्रिया ज्वलन्तं बहुरत्नकीर्णम् ।
नानातरूणां कुसुमावकीर्णं
गिरेरिवाग्रं रजसाऽवकीर्णम्
तेजोमय सुवर्णकांतीचे हे रत्नजडित विमान नाना तऱ्हेच्या फुलांनी व त्यांच्या परागांनी आच्छादित पर्वतशिखरासारखे शोभिवंत दिसत होते.
नारीप्रवेकैरिव दीप्यमानं
तडिद्भिरम्भोधरमर्च्यमानम् ।
हंसप्रवेकैरिव वाह्यमानं
श्रिया युतं खे सुकृतां विमानम्
यथा नगाग्रं बहुधातुचित्रं
यथा नभश्च ग्रहचन्द्रचित्रम् ।
ददर्श युक्तीकृतचारुमेघ
चित्रं विमानं बहुरत्नचित्रम्
वगैरे वगैरे. आपण सारे संस्कृत जाणतोच, त्यामुळे शब्दश: अर्थ सांगावा न लगे.
विमानाचे उड्डाण करण्याचे व parking चे स्थान, म्हणजे विमानतळ कसे होते तेही वर्णन आहे.
मही कृता पर्वतराजिपूर्णा
शैलाः कृता वृक्षवितानपूर्णाः ।
वृक्षाः कृताः पुष्पवितानपूर्णाः
पुष्पं कृतं केसरपत्रपूर्णम् ॥ ९ ॥
विमानतळही सोने आणि रत्न वापरून केलेल्या कृत्रिम पर्वतमालांनी सजवले होते. वृक्ष, फुले यांचेही वर्णन आहे.
कृतानि वेश्मानि च पाण्डुराणि
तथा सुपुष्पाण्यपि पुष्कराणि ।
पुनश्च पद्मानि सकेसराणि
वनानि चित्राणि सरोवराणि ॥ १० ॥
विमानात श्वेत भुवने, सुंदर फुलांनी सुशोभित पुष्करिणी होत्या. केसरयुक्त कमळे, तसेच अद्वितीय वने आणि सरोवरे त्यात होती.
पुष्पाह्वयं नाम विराजमानं
रत्नप्रभाभिश्च विघूर्णमानम् ।
वेश्मोत्तमानामपि चोच्चमानं
महाकपिस्तत्र महाविमानम्
असे ते पुष्पक विमान पाहून हनुमंत आऽऽ वासून बघत राहिलेत यात नवल ते काय? आणखीही वर्णन आहे. पुष्पक विमान जितके प्रवासी त्यात येतील तितके आपोआप मोठे होत असे. Housefull असा प्रकार त्यात नाही. कोणीही या, कितीही या, हे विमान adjust करू शकत असे. क्या बात है. विश्वकर्माच्या तंत्रज्ञानाला तोड नाही. अजूनही अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण बोईंग, एअरबसच्या क्षुल्लक विमानांनी प्रवास करणारे आपण ते ऐकून जळून खाक होऊ म्हणून आवरते घेणे भाग आहे. वाचायचेच असेल तर वाचा बुवा. जळून पापड होईल तुमचा. आपल्याला काय!
http://satsangdhara.net/vara/
पण रावणाजवळ एकच विमान होते का? नाही. अनेक होती. चक्क १२० विमानांचा ताफा होता व लंकेतच ६ विमानतळे होती. त्यांची नावे सुद्धा आहेत. नकाशे आहेत. पूर्ण recorded history बरें. तुम्ही काय विश्वास ठेवाल म्हणा!
https://bharathgyanblog.
तसे म्हटले तर chartered विमानांची प्रथा सुद्धा सत्ययुगापासून आहे. ध्रुवमहाराजही विमानात बसूनच वैकुंठाला गेले होते. आता विमान निघणार एवढ्यात त्यांनी आई सुनीता शिवाय मी येणार नाही असा हट्ट धरला. तेव्हा त्यांना थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या आईला घेऊन take off करून आकाशात आधीच पुढे गेलेले दुसरे विमान दाखविण्यात आले तेव्हा कुठे ते विमानात बसायला तयार झाले. पुराणातच असे सांगितले आहे. Air travel देवांसाठी अगदी काॅमन होता. मनुपुत्र मानव मात्र तेव्हाही सेकंदाला २-३ body lengths वेगानेच पायीपायी जात असे. काय हे!
जितके भव्य विमानाचे वर्णन, तितकेच गोड विमानप्रवासाचे वर्णन. पेवंदी संस्कृतपेक्षा आपल्या गावरानी भाषेत वाचाल तर तोंड पण गोड होईल.
सीता रघुपति मिलन बहोरी
सुरन्ह कीन्ह अस्तुति कर जोरी
पुन्हि पुष्पक चढि कपित समेता
अवध चले प्रभु कृपा निकेता
संस्कृतपेक्षा तर नक्कीच सोपे आहे. नाही का? रामचरितमानस वाचाल तर लंका ते अयोध्या प्रवास, मार्गात पुष्पक विमान कोठे कोठे उतरले, विमानातून जातांना रामाने सीतेला काय काय दाखविले, सारे सारे आहे. लंकेला येताना रामाचा जो मार्ग होता तोच त्याने विमानाने जाताना पण घेतला. भारद्वाज ऋषींच्या आश्रमापाशी विमान उतरवून, त्यांचा आशिर्वाद घेऊनच सीतापती राम सहकुटुंब, सहपरिवार अयोध्येला पोहोचले. शंकेला काही कारण नसावे.
भारद्वाज ऋषी म्हणजे सप्तर्षीतलेच एक बरे. त्यांच्याच नावाने वैमानिक शास्त्र म्हणून एक ग्रंथ आहे. त्यांनीच लिहिलेल्या 'समग्र' नामक महाग्रंथातलाच तो एक भाग आहे असे म्हणतात. समग्र म्हणजे ज्ञानाचा encyclopaedia म्हणायला हरकत नाही. वैमानिक शास्त्र ग्रंथात विमानाचा पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्यांनी सांगितलेला आहे. हे ज्ञान त्यांचे नसून त्यांच्याही पूर्वीपासूनच उपलब्ध होते असे ते म्हणतात असेही पुस्तकात आहे. हे प्राचीन ज्ञान विसाव्या शतकात तत्कालीन मद्रास प्रांतातील (आताचा तामिलनाडू) कोणी सुब्बराय शास्त्री नावाच्या जेंटलमनला वीसाव्या शतकात सापडले व त्यांनी ते लिहून काढले. त्यांना ते सापडले कसे हा प्रश्न आहे म्हणा. पण असे फाजिल प्रश्न आपण कां विचारावे? त्यांचेच हस्तलिखित वापरून ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी विसाव्या शतकात १९५८ मधे बृहद विमानशास्त्र हा ग्रंथ छापला. नंतर मूळ वैमानिक शास्त्र हा ग्रंथ जोसेर (Josyer) नामक एका इंग्रजी गृहस्थांनी इंग्रजीत भाषांतरीत करून १९७३ साली प्रसिद्ध केला. खरे नाही ना वाटत? पण ही पुस्तके आहेत. संस्कृत येत असेल तर वाचू शकता आपण. नाहीतर सोप्पे पडेल असे इंग्रजी भाषांतर आहेच की (http://upload.vedpuran.net/
https://m.youtube.com/watch?v=
संस्कृतमधले आहे म्हणजे खरे असलेच पाहिजे. नाही का? इंग्रजीत पण आहे म्हणजे authentic. नाही का? पण नाही. काही चार्वाकांना ते पटत नाही. ते या सर्व माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहतात. त्यावर लेख लिहितात. वैज्ञानिक दृष्टीने पाहता असे पारा (Mercury) भरलेले विमान उडणेच शक्य नाही असे म्हणतात. आपल्याच देशातल्या बंगलोरच्या Indian Institute of Science मधील अेरोनाॅटिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पाच वैज्ञानिकांनी संशोधन केले व लेख लिहिला. हा लेख लिहिणारे कोणी निनावी नाहीत. त्यांना नावे आहेत. प्राध्यापक मुकुंद, देशपांडे, नागेंद्र, प्रभू आणि गोविंदराजू. देशपांडे सोडले तर चांगले देवाची नावे असलेले हे शास्त्रज्ञ हो! हे वैज्ञानिक हा संस्कृत ग्रंथ प्राचीन साहित्य नसून आता आता लिहिलेला असावा व प्राचीन म्हणून खपवला असावा असे म्हणतात. त्यातले संस्कृत आधुनिक असून प्राचीन काळी प्रचलित असलेल्या संस्कृतशी मेळ खात नाही असे म्हणतात. काय म्हणावे आता! कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ! आणखी काय? जळलं मेलं लक्षण! दळिद्री मेले! जन्मदरिद्री!
पण या नवीन-प्राचीन ग्रंथाने खरेच जगभर खळबळ माजवली. जगभरचे वैज्ञानिक भारतात प्राचीन काळी विमाने व विमानशास्त्र होते का यावर अभ्यासपूर्ण मते द्यायला लागले. त्यातील बऱ्याच कल्पना विचार करायला लावतील, पटतील अशा आहेत असे काही जण म्हणतात. पण एकंदरीत हा सर्व प्रकार बोगस आहे असे बहुतांश वैज्ञानिकांचे मत आहे. खरे खोटे कोण जाणे. पण ग्रंथलेखकाचे कौतुक करावे लागेल. मस्त!
काहीही असले तरी आमच्या देशात पूर्वीपासूनच विमाने होती असे भाविक मानतातच. मानोत पण. पण भाविकही आज ज्या विमानांनी प्रवास करतात ती मात्र भारद्वाजांच्या टेक्नाॅलाॅजीवर आधारीत नाहीत. पुष्पक विमानासमोर आपल्या विमानांना विमान म्हणतानाही लाज वाटावी इतके आजचे विमान क्षुल्लक. खेळण्यातल्या विमानांसारखे. बाव्हला-बाव्हलीच्या (की भावला-भावली, की बाहुला-बाहुली?) लग्नाइतकेच लटके. किंवा लहानपणी मुले घर घर खेळतात तसे. पुष्पक पाहून चकित होणाऱ्या हनुमानाला आजचे विमान दिसले तर तो आऽऽ वासून नाही, ईऽऽ वासून पाहील. तुच्छ! गलिच्छ! खरे म्हणजे आपल्या आजच्या विमानांना विमान म्हणूच नये. तसे केले तर तो पुष्पक, त्रिपुर, शकुन, रुक्म इत्यादि वैदिक विमानांचा अपमान होईल. आपले मानवी विमान म्हणजे फारच फार तर उडनखटोला. 'आज मी उडनखटोल्याने दिल्लीला जात आहे. उडनखटोल्याने गेले की वेळ वाचतो हो' असे म्हणावे आपण बापड्यांनी. कशी वाटली idea?
वाऱ्यासारखेच मन फार स्वैर असते. भावला भावलीच्या लग्नावरून भुलाबाईच्या गाण्यांची आठवण झाली. देवीचे नवरात्र बसले की घरोघरी हे सुरू होत असत. कुठे कुठे त्याला भोंडल्याची गाणी पण म्हणतात. त्यातल्या एका गाण्यात असलेली माहेरच्या वैद्याची व सासरच्या वैद्याची तुलना खूप मस्त आहे. आपला देश, आपली संस्कृती म्हणजे माहेर व पाश्चात्य देश, पाश्चात्य संस्कृती म्हणजे सासर मानले तर या गाण्यात असलेला जाज्वल्य देशाभिमान, स्वसंस्कृतीचा गर्व स्पष्ट जाणवेल. माहेरचा वैद्य म्हणजे पुष्पक विमान व सासरचा वैद्य म्हणजे आजकालचे बोइंग किंवा एअरबसचे विमान असे रूपक लक्षात घेतले तर या भुलाबाईच्या गाण्यात खूप मजा येईल. आपले ते सोने, दुसऱ्याचे ते शेण. आपला तो सोनू, दुसऱ्याचं ते कार्ट. कुठे 'आमचे' दैवी पुष्पक विमान आणि कुठे 'तुमच्या' राईट बंधूंनी शोध लावलेला मानवी उडनखटोला.
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटकातुटका
डोक्याला पागोटं फाटकंतुटकं
हातात काठी जळकं लाकूड
कपाळाला टीळा शेणाचा
तोंडात विडा पादरा कीडा
कसा बाई दिसतो भिकाऱ्यावाणी
बाई भिकाऱ्यावाणी
आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटं भरजरी
हातात काठी चंदनाची
कपाळाला टीळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
कसा बाई दिसतो राजावाणी
बाई राजावाणी
अगदी असाच, किंवा याहीपेक्षा प्रखर अभिमान आपल्याला आपल्या पुष्पक विमानाचा, वेदकालीन aeronautical science चा आहे. सत्ययुगात, त्रेतायुगातच काय, आता आता कलियुगात संत तुकारामांना सदेह स्वर्गात न्यायला ते पुष्पक विमान आले होते. हो किनई? हो नं!
पण शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारद्वाजांच्या त्या विमानशास्त्राचा काही उल्लेख नाही. विमानाचा शोध लावणारे बोक्कामुच्चु भारद्वाज ऋषी आणि ते कारखान्यात तयार करणारी बोक्कामुच्चु विश्वकर्मांची कंपनी यांचा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पाठ्यक्रमात कुठेही नामोल्लेख नाही. मानवी मनात पूर्वापार व्यापलेले विमान प्रत्यक्षात उतरविण्याचे श्रेय राईट बंधूंना जाते असे शाळेत आपल्या गळी उतरवतात. जमीन आणि पाण्यावर प्रवास करू शकणाऱ्या मानवाला, स्वत:चा पायांचा वेग फारच फार तर ३५ किमी तासाला असूनही चाकाचा शोध लावून स्वत:चा वेग वाढवणाऱ्या मानवाला पक्षांसारखे उडायचा नेहमीच ध्यास होता. आणि कधीतरी आपण उडूच अशी जिद्द होती. जिद्द तेथे यश!
पक्षी उडती आकाशी अन् पतंगही जाई
वादळ येता जमिनीचा पाला पाचोळाही
जमिनीवरती, समुद्रावरी जरी तुझा संचार
आकाशाचे दार न उघडे, मनी कष्ट रे फार
पक्षांचा तुज हेवा वाटे, तुला कां न पंख
सर्व साध्य, पण उडता ये ना, असह्य हा डंख
एके दिवशी नभात घेईन उंच उंच झेप
तुझी अस्मिता जणू फुंकते पाञ्चजन्य शंख
निरीक्षण सदा पक्षांच्या पंखांचे तू करिशी
तसेच घडवून, स्वतःस लावून, धावत तू जाशी
पडशी, उठशी, पुनः धावशी, हार न तुज मान्य
बुद्धी, युक्ती, चिकाटी तुझी, धन्य धन्य धन्य!
गरम हवेचे फुगे बांधुनी तू आता उडशी
पंखांना तू पंखे लावून नभी झेप घेशी
पंखहीन तू प्राणी, लावून बुद्धीचे पंख
जमीन, जल आणि आकाशाचा स्वामी होशी
सीमा नाही नभास, कळले नभी झेप घेता
अंतहीन आकाशाचा तुज ध्यास लागला अता
चंद्र रोजचा आकाशी तुज देई आव्हान
खगोलात उडणारा पक्षी तूच, नसे अन्य
मानवचंद्र कवितेतील हे शब्द. वाचा पूर्ण कविता वाटल्यास.
http://balved.blogspot.in/
आधी गरम हवेचे फुगे हाती घेऊन आकाशात भ्रमण करणे जमले आणि मानवाचा आनंद अक्षरश: गगनात मावेनासा झाला. पण फुग्याची गती व दिशा बरीचशी हवेवर अवलंबून होती. स्वचलित स्वनियंत्रित (powered and controlled) विमान मानवाला हवे होते. गती व दिशा यावर विजय मिळवायचा अथक प्रयत्न वैज्ञानिकांचा सुरूच होता. शेवटी राईट बंधूंना यश आले आणि मानव वैमानिक झाला. पहिले मानवी विमान अस्तित्वात आले.
क्षुल्लक राईट बंधूंचा थोडासा उल्लेख येथे करणे वावगे होणार नाही. राईट म्हणजे Right की Write? Write down the right answer. काय ही भाषा? आंग्ल म्हणजे काय चांग्ल, नी काय वांग्ल? असो. भाषेची टिंगल नको.
तर हे राईट बंधू म्हणजे विल्बर (Wilber) आणि आॅरविल (Orville) Wright बंधू. विल्बर म्हणजे आॅरविलाग्रज, आॅरविलचा मोठा भाऊ. फार मोठा नाही. तीन चार वर्षं मोठा. यांच्या इतके प्रसिद्ध बंधुद्वय नाही. रामलक्ष्मण, रावणकुंभकर्ण आहेत म्हणा. पण कलियुगात तरी यांच्यासारखे हेच. लहानपणीच त्यांच्या पिताश्रींनी दिलेले एक खेळणे दोघांचे खूप आवडते. ते म्हणजे खेळण्यातले उडणारे, हेलिकाॅप्टरसारखे दिसणारे एक विमान. थोडे मोठे झाल्यावर दोघे सायकलचे दुकान चालवीत. पंक्चर काढणे, हवा भरून देणे, पडलेली चेन चढवून देणे, overhauling (मराठीत ओव्हरआॅयलिंग बरें) करून देणे वगैरे वगैरे. पण मनात नेहमी powered, controlled उडणारे यंत्र करायचा ध्यास. डोळ्यासमोर आकाशात उडणारे पक्षी. दोघेही बंधू अव्वल दर्जाचे मेकॅनिक. काय ब्रह्मदेवाने त्यांच्या भाळी लिहिले होते ते तोच जाणे. पण १९०३ मधे दोघांनी स्वत: तयार केलेले विमान उडवून दाखविले. बलून नाही, विमान. वाहतुकीच्या साधनात त्या एका शोधाने अभूतपूर्व बदल घडवून आणला. माणूस पक्षी झाला. द्विज द्विज झाला. मानवाला अक्षरश: पंख फुटले.
पहिले विमान आकाशात उडले तेव्हा १८६७ मधे जन्मलेला विल्बर जेमतेम ३५ वर्षांचा होता. १८७१ मधे जन्मलेला विल्बरानुज आॅरविल फक्त ३२ वर्षांचा होता. विल्बरच्या भाळी एवढे यश लिहिणाऱ्या ब्रह्मदेवाने त्याच्या ललाटी आयुष्य मात्र फारसे लिहिले नव्हते. १९१२ मधेच तो निजधामास गेला. जेमतेम ४५ वर्षांचा होता. तेथे गेल्यावर पुष्पक, त्रिपुर, शकुन, रुक्म वगैरे स्वर्गीय विमानांच्या ताफ्याचा in-charge झाला असे म्हणतात. पण नक्की माहीत नाही बरें. तिकडली बित्तंबातमी असणाऱ्यांना विचारा. तेच अधिकारी लोक काय ते सांगू शकतील. पण ते लोक कुठे सापडतील? GPS चा जमाना आहे. त्यांचे अक्षांश रेखांश (Latitude Longitude) दिले की झाले.
Latitude : 20.7059345
Longitude : 77.0219019
शोधा म्हणजे सापडेल. एखादी अॅप (App) शोधावी लागेल नक्की ठिकाण कळायला. पण असो. आॅरविलला मात्र बरेच आयुष्य लाभले. पण शेवटी तोही १९४८ला गचकलाच.
ते पहिले मानवी विमान एक ठिणगी होती. वणवा पेटायला पुरेशी. आता तर काय? मानवी विमाने आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जातात. Supersonic Jets प्रत्यक्षात असतात, उडतात. लोकांना इकडून तिकडे वाहून नेतात. आवाजाचा वेग सेकंदाला साधारण ३०० मीटर. म्हणजे मिनिटाला १८ किमी. म्हणजे तासाला १०८० किमी. त्याहूनही वेगाने जाणारी विमाने, म्हणजेच सुपरसाॅनिक विमाने असतात. धावपट्टी सुटली की वेग वाढवता वाढवता अशा विमानांनी आवाजाचा वेग घेतला की sonic boom होतो. गडगडाट होऊन हवेत इतके शक्तिशाली कंपन होते की खाली घरांच्या खिडक्यांचे काच फुटू शकतात. मारुततुल्य वेगाचेच अफाट कौतुक असणारा मानव आता ध्वनितुल्य वेगाने प्रवास करू शकतो.
पण तो वेग तरी त्याचे समाधान करू शकला का? नाही. हा मानव, हा कीडा कधीच समाधानी नव्हता, नाही व नसेल. विमानांवर संशोधन करणारा मानव aeronautical engineering वरून aerospace engineering कडे वळला. पृथ्वी सोडून अवकाशात, भूगोलातून खगोलात जायला लागला. चंद्रावर पोहोचला. मंगळ ग्रहावर त्याने अवकाशयान पाठवले. त्या यानाचा वेग ताशी लाख किलोमिटरच्या आसपास होता. बृहस्पतीपर्यंत जाणारा शोधग्रह, म्हणजे Juno नावाचा Jupitor probe ताशी २६५००० किमी वेगाने गेला व त्यातच विलीन झाला. अगदी ३-४ महिन्यापूर्वी. तो गेला पण गिनीज (Guineas) जागतिक विक्रमांच्या पुस्तकात शिरला. आता तर ताशी ४००००० किमी पर्यंत वेग घेऊ शकणारे अवकाशयान दृष्टीच्या टप्प्यात येत आहे. एकदम नवे तंत्रज्ञान (https://m.youtube.com/watch?
पण हे वेगाचे आव्हान मानवापुढे ठेवणारा, वेगवान होण्याला प्रवृत्त करणारा, मनासारखा चपळ, वाऱ्यासारखा वेगवान, जितेंद्रिय, ज्ञानी, बुद्धिमान, पवनसुत, वानरश्रेष्ठ, श्रीरामदूत विसरून कसे चालेल? कोण विसरेल?
मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
_____________________
No comments:
Post a Comment