Tuesday, 11 October 2016


जीवन


म्हणजे पाणी बरें! पाण्यालाच हा पर्यायवाची शब्द. पण त्यातच तर पाण्याचे सारे मर्म दडलेले. पाण्याशिवाय जीवन, पाण्याशिवाय जीव, जीवसृष्टी अशक्य. पृथ्वी सोडून विश्वात आणखी कोठे जीव आहे का, असू शकतो का याचा शोध घेणे म्हणूनच तर 'तेथे पाणी आहे काय' याचा शोध होतो. पाणी नसेल तर जीवन नक्कीच नाही. पण पाणी असेल तर मात्र जीव आहेच असे नाही, पण असू शकतो. पाणी असेल तरच मग इतर जीवोपयोगी घटकांचा शोध सुरू होतो. Amino acids आहेत का, किंवा ते उत्पन्न होण्यासाठी आवश्यक अशी परिस्थिती व घटक आहेत का याचा शोध सुरू होतो. पाणी असणे ही जीवसृष्टीकरिता necessary condition आहे, sufficient condition नाही. पाणी नसेल तर तुमचा देव सुद्धा जीवनिर्मिती करू शकणार नाही. त्यालाही आधी पाण्याची निर्मिती करावी लागेल. ते करण्यासाठीच एखादा देव आधी निर्माण करावा लागेल. नंतर मग जीव बीव. म्हणूनच पाणी पाहून हात जोडावे. हात जोडून म्हणावे, ह्याला जीवन ऐसे नाव!

लहान मुलांना काहीतरी प्रश्न विचारून, बरोबर उत्तर दिले की शाब्बास म्हणून त्यांच्याशी सहज गट्टी जमवता येते. असेच एकदा एका शाळकरी मुलाला 'बाळ, तू रोज गाईचे दूध पितोस की म्हशीचे?' विचारले तर तो हासायलाच लागला. प्रश्नकर्ता अगदीच बुद्दू असा भाव चेहऱ्यावर झळकावीत तो उत्तरला 'छे, आम्ही नाही असे कोणा गाई म्हशीचे दूध पीत. मी तर डेअरीचे दूध पितो.'. घ्या आता. बसा बोंबलत. शहाणपणा दाखवायला सांगितले कुणी? खाशी जिरली. बरे असो. आज तसेच एखाद्या लहान मुलीला विचारले की पाणी कुठून येते, तर ती नळातून किंवा अॅक्वागार्डमधून म्हणेल. अगदी नक्की. काळच तसा आला आहे. सर्व ईश्वरनिर्मित आहे हे साधे सत्य आजच्या पिढीला माहीत नाही. 'कलियुग गं बाई, कलियुग!' म्हणावे व सोडून द्यावे झाले.

पण पाणी खरेच कुठून येते? नदीतून? की तलावातून? की ओढ्यातून? की ट्यूबवेलमधून? की समुद्रातून? की ढगातून? की स्वर्गातून?

आज शाळाशाळातून जलचक्र, म्हणजे water cycle शिकवितात म्हणून लहान मुलेही वरील एकही उत्तर बरोबर नाही म्हणतील व आपल्याला उत्साहाने नदी कशी सागराला मिळते, समुद्राच्या पाण्याची वाफ कशी होते, वाफ हलकी असल्यामुळे वर कशी जाते व थंड होऊन तिचा ढग कसा होतो, ढग डोंगराला अडून पाऊस कसा पडतो, पावसाचे पाणी वाहून नदीत कसे जाते, नदी वाहत वाहत कशी सागराला मिळते, हे साद्यंत वर्णन करून सांगतील. आपणही 'असे आहे का? अरेच्चा! मला माहीतच नव्हते, हुशार हो तुम्ही!' म्हणून त्यांचे कौतुक करू व मनातल्या मनात थोडे आणखी म्हातारे होऊ. हे विज्ञानाचे फॅड आल्यापासून जीवन कसे रुक्ष होऊन गेले आहे. आपला काळ किती सुंदर होता! हेच जलचक्र जरा वेगळ्याच संदर्भात मांडणारी ती शाळेत अभ्यासिलेली कविता किती सुंदर होती! तो काळसुद्धा पाण्यासारखाच वाहून गेला. पण पाऊस होऊन परत का येणार?

जीवन त्यांना कळले हो…
'मी'पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तिथे मिळाले हो
चराचराचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधूसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनि जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!

कोण बरे कवी? काय बरे नाव? बालकवी की काय? की भा. रा. तांबे? पण नाही. बा. भ. बोरकर की काय? हं, तेच ते. त्यांना कोण विसरेल? त्यांच्या 'तेथे कर माझे जुळती' ला कोण कसे विसरू शकेल? व्वा!

दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती,
तेथे कर माझे जुळती

क्या बात है! तोंडाला पाणी सुटते. पण गदिमांची जलचक्र नावाची कविताही काही कमी नाही बरें.

नदी सागरा मिळते
पुन्हा येईना बाहेर
जग म्हणते कसे गं,
नाही नदीला माहेर

काय सांगावे बापानो
तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराला जातेे
म्हणूनच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर
तरी आठवतो तिला
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन
नदी उडोनीया जाते
पंख वाऱ्याचे घेऊन

होउन पुन्हा लेकरू
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा

'सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर'. आता काय म्हणावे? बोलती बंद अशा ह्या कविता. त्या आठवल्या की आपले मन नदीसारखे वाहत जाते व स्मृतिसागराला जाऊन मिळते. असे झाले की मूळ विषय बाजूलाच राहतो. मूळ प्रश्न होता 'पाणी कुठून आले?'.

कोण कुठून आले, काय कसे झाले, हे कोणी केले, असे व तत्सम प्रश्न माणसाला तो माणूस झाल्यापासूनच भेडसावत असतात. प्रत्येक गोष्टीमागचा कर्ता करविता बोक्कामुच्चु त्याला शोधायचा असतो. पाण्याला कारणीभूत बोक्कामुच्चु कोण, पाऊस कोण पाडतो हे तर अत्यंत मूलभूत प्रश्न असावेत. कारण पाण्यामुळे जसे जीवन, तसेच पाण्याअभावी मृत्यु हे मानवाला अनुभवाने कळायला फार कठिण नसावे. पाऊस पाणी देतो हेही तो सुरुवातीपासूनच पाहतो. पाऊस आला नाही तर दुष्काळ! दुष्काळ म्हणजे जणू काळ. यमराज. पण म्हणून काही खूप पाऊस येऊन चालेल का? पूर म्हणजे ही यमराजच. चित भी मेरी, पट भी मेरी. मोठा पूर म्हणजे तर प्रलय. सर्वनाश. आज जर दुष्काळ इतके भयावह वाटतात, पूर अनेक बळी घेतात, तर पूर्वी काय होत असावे? पाण्यासाठी बिचारा मानव नदीकाठी वसत असे. आणि त्याच नदीला पूर आला की बळी जात असे. अशा ह्या जीवनदाई व जीवननेई पावसाचे मूळ काय, कोण तो वर्षा करणारा 'वार्षिक' हा अक्षरश: जीवन-मरणाचा प्रश्न. कोण तो बोक्कामुच्चु?

विज्ञान, तत्वज्ञान फारसे प्रगल्भ नसलेला प्राचीन काळ. पण पृथ्वीभोवती सूर्य फिरत नसून सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह फिरत असावे असे सूर्यमालेचे चित्र आपले याज्ञवल्क्य ऋषी मांडते झाले. इतर जागतिक शास्त्रज्ञांच्या तब्बल ५००-६०० वर्षे आधी. आज त्यांना त्याचे श्रेय मिळो न मिळो, पण विज्ञानाला जो वैचारिक कणा लागतो तो आपल्या पूर्वजांनी प्रदान केला यात संशय नाही. तसेच तत्त्वज्ञानाचे. उद्दालिकाचे तत्वज्ञान अति प्राचीन. आज आपण इतरांना नावे घेऊन श्रेय देतो, पण तत्वज्ञानाच्या इतिहासाचे अभ्यासक उद्दालक नाव उच्चारल्याशिवाय राहत नाहीत.

पुन्हा विषयांतर झाले असे वाटते. आपण पावसावर विचार करीत होतो. उद्दालक कुठून आले मधेच? ठीक आहे. चला मूळ मुद्द्याकडे.

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

पाऊस म्हटला की ही कविता आठवते. साधी सोपी कविता. पण एक नित्याची शोकांतिका. नांगरून, वखरून, पेरणी करून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला. पावसाच्या मान मान मिंता करीत, व्याकुळ होऊन त्याला 'ये रे ये रे पावसा' म्हणत. सारा अडीअडका पणाला लावलेला. सारे पैसे खर्चून पेरण्या केलेल्या. सारा पैसाच जणू पावसावर लावलेला. पाऊस आला तर पीक येणार. नाहीतर नुसता अंधार. पाऊस आला देखील. अंकुर फुटले, रोपटे वाढले, कणसे चांगली गुबगुबीत आली. पण आता कापणी होणार एवढ्यात पाऊस आला मोठ्ठा. पुरात सारे पीक उभ्याचे आडवे झाले. सारे कष्ट वाया गेले. सारा पैसा झाला खोटा.

जीव पिळवटणारी शोकांतिका. नाही समजली तर बाष्कळ nursery rhyme, बालकविता.

पावसावर मानवाचे जीवन पूर्णपणे अवलंबून होते, आहे व राहील. आज कमीत कमी काही सरकारी योजना, मोबदला, मदत तरी मिळते. पूर्वी काय? राजा असो वा रंक. अवर्षेची वा अतिवर्षेची झळ सर्वांनाच लागत असणार. दैवी कोप. आणखी काय! पर्जन्यदेव कोपले की कोपले. देवराज इंद्र कोपला की कोपला. सतत देव देव करणाऱ्या ऋषीमुनींनाही मग सूट नाही. आपल्या धौम्य ऋषींचेच घ्या की. काय तो पाऊस!

महाभारतकालीन ही गोष्ट आताआतापर्यंत घराघरात सांगण्यात ऐकण्यात येत असे. आजकालही कदाचित एकट दुकट घरी सांगत ऐकत असतील. आजकाल जसे JEE, म्हणजे Joint Entrance Examination देऊन IIT, म्हणजे Indian Institute of Technology मधे जायला सारे धडपडत असतात, व प्रवेश मिळाला की कृतकृत्य होतात तसेच तेव्हा पूर्व हिमालयातील ब्रह्मावर्तस्थित धौम्य ऋषींच्या आश्रमाचे होते. धौम्य ऋषींनी आपल्या पाल्याला (म्हणजे झाडपाल्याला नाही, आपण पालन पोषण केलेल्या आपल्या पाल्याला, म्हणजे मुलाला) शिष्य म्हणून स्वीकारले की आईबाप धन्य होत. मौंज करून, भिक्षावळ घालून सातव्या वर्षी बाळ ऋषींच्या आश्रमात टाकले की झाले. वेदविद्यापारंगत होऊनच तो सात आठ वर्षांनी परत घरी येत असे.

एका वेळची गोष्ट. धौम्य ऋषींनी जरा ज्यास्तच शिष्य घेतले होते. मुलींनी आश्रमात जाण्याचा तो काळ नव्हता. सारी मुलेच मुले. श्रीराम, किशोर, प्रमोद, शरद, विश्राम, विनोद, सुधीर, प्रदीप, आरुणी, अशोक ... अनेक नावे. खरे म्हणजे ही त्या काळची प्रचलित नावे. नंतर जुनी झाली. चलनातून गेली. पण पुन्हा काही काळाने फॅशनेबल झाली. पुन्हा फिरून येते तीच फॅशन. असो.

धौम्य ऋषी सारेच शिकवायचे. वेद, उपनिषद, शस्त्रविद्या, शेतकाम, पशुपालन सारे सारे. सारेच शिष्य काही सारखे प्रतिभावान नव्हते. प्रत्येकाची aptitude वेगळी, capability भिन्न, capacity अलग. प्रमोद सर्वात हुशार, पण आरुणी जेमतेमच. बाकी सारे अधेमधे कुठेतरी. पण गुरू आणि गुरुपत्नीला मात्र सारेच शिष्य सारखेच प्रिय. जणू त्यांची मुलेच. विद्याध्ययन आटोपले की धौम्य साऱ्याच शिष्यांना ज्याची त्याची योग्यता, कौशल्य, नैपुण्य पाहून नवे नाव द्यायचे. तीच त्यांची पदवी. तोच दीक्षांत समारंभ. आजच्या सारखे गाजावाजा करून convocation वगैरे प्रकार नव्हता. हे पुनर्नामकरण मात्र फार आवश्यक. पाण्याला त्याचे गुणधर्म व महत्त्व पाहून जीवन नाव दिल्यासारखे. नावावरून मग जगाला त्या व्यक्तीच्या गुणांची पारख होत असे. येताना जरी शिष्य प्रमोद व अरुण नाव घेऊन आले तरी जाताना अनुक्रमे सर्वज्ञानी व ठोंब्या नाव घेऊन जायचे. असो.

आश्रम पूर्णपणे स्वयंपूर्ण होता. आश्रमाला लागूनच शेती होती. सर्व धान्ये, फळे, भाज्या तेथेच होत. उदरभरणाला लागणारे काहीही बाहेरून आणावे लागत नसे. शेताला लागूनच एक ओढा वाहत असे. उन्हाळ्यात जेमतेम नालीसारखा, तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा. नदीतूनच शेतीला पाणी देता यावे म्हणून पाट काढले होते. नदीचे पाणी शेतात घुसू नये म्हणून शेतीकडच्या भागाला नदीला दगड मातीचा बांध घातला होता. तो फुटला तर मात्र पावसाळ्यात काही खरे नव्हते. आश्रम उंचावर असल्यामुळे वाचला असता, पण शेत मात्र पूर्ण जलमग्न झाले असते.

भाद्रपदातल्या पितृपक्षात एकदा खूप पाऊस आला. थांबण्याचे नाव घेईना. संध्याकाळ झाली, अंधार पडला तसे पावसाने अधिकच रौद्र रूप धारण केले. रात्र होता होता तर पाऊस चेकाळलाच. धौम्य ऋषी आश्रमातच फेऱ्या मारायला लागले. नदीचा काठ खचला तर सारे शेत बुडून जाईल हे त्यांना माहीत होते. त्यांनी, त्यांच्या पत्नीने व शिष्यांनी प्रेमाने लावलेले भाज्यांचे वाफे, तांदळाचे शेत होत्याचे नव्हते होईल यांची त्यांना भीती वाटली. शेवटी त्यांनी आरुणीला बोलावले व त्याला म्हणाले की नदीच्या काठाकाठाने जाऊन बघ कुठे पाण्याच्या ओघाने बांध खचायला आला आहे की काय. तसे असेल तर दगड मातीचे भरण टाकून तात्पुरते तरी पाणी थोपवून धर. सकाळ झाली की आपण सारेच मग डागडुजी करू. पाऊसही तोपर्यंत थांबेल.

गुरूची आज्ञा. नाही म्हणायचा प्रश्नच नाही. अभ्यासात तशी फारशी गती नसली तरी आरुणीला अशी कामे फार आवडत. लगेच फावडे घेऊन तो निघालाच व पाहता पाहता अंधारात गडप झाला. पाऊस संततधार सुरूच होता. धौम्य ऋषींच्या फेऱ्याही. आता तर त्यांना शेताबरोबर शिष्याचीही चिंता.

अंधारात चाचपडत चाचपडत आरुणी बांधाच्या काठाकाठाने जात होता. घोंगडी डोक्यावरून घेतले होते पण त्याचा काही उपयोग नव्हता. पाऊस इतका होता की आरुणी पूर्ण ओलाचिंब झाला होता. जाता जाता जेथे जेथे त्याला वाटले की पाणी बांधावरून किंवा बांध फोडून वाहील तेथे तेथे तो फावड्याने दगड माती टाकून फावड्याने व पायाने दाबून देत असे. धुम्मस आणला असता तर बरे झाले असते असे त्याला वाटले. आश्रमाच्या आंगणात तो बरेचदा धुम्मस करीत असे. पण तो किती जड असतो हे आठवून त्याला तशाही परिस्थितीत हसू आले. पुढे जाता जाता एका ठिकाणी त्याला पाणी बांध चिरतांना दिसले. आरुणीने लगेच कंबर कसून दगडमातीचे भरण टाकायला सुरुवात केली. पण पाण्याचा जोर इतका की एक फावडे माती टाकावी तर दोन फावडे वाहून जात असे. पाहता पाहता वीतभर दरार हातभर झाली. एखादा मोठा दगड तिथे रुजवला तर पाणी थांबले असते. पण तो एकट्याने कसा उचलायचा? आश्रमही दूर राहिला होता. हाका करून काही होणार नव्हते. आता तर हातभर दरार अधिकच मोठी झाली. क्षणभर विचार करून आरुणी स्वतःच तेथे जाऊन आडवा झाला. त्याने आपल्या अंगानेच पाणी अडविले. शरीराचाच बांध केला. पाणी अडले देखील.

प्रहर, दोन प्रहर तसेच गेले असावेत. पाऊसही आता बराच कमी झाला होता. पण नदीच्या पाण्याला जोर होताच.  आरुणीला उठणे शक्य नव्हते. पाणी शेतात घुसले असते. पाणी ओसरेपर्यंत तसेच आडवे होऊन पडून राहणे भाग होते. बोट बोट पाणी ओसरत होते पण नदीला तशी फारशी घाई नव्हती.

इकडे पाऊस थांबला, पहाट झाली तरी आरुणी परतला नाही म्हणून धौम्य ऋषींना खूप चिंता वाटत होती. मनात भलते सलते विचार येऊ लागले. शेवटी प्रात:संध्या वगैरे न करताच सारी शिष्य सेना घेऊन ते निघाले.

आरुणी कुठे दिसेना. शेतात पाणी साठले होते. पण पीक तग धरून होते. फारशी नासाडी झाली नव्हती. पाणी ओसरले, ऊन पडले की पुन्हा रोपे मान वर करणार होती. आणि पाणी ओसरतही होते.

पण आरुणी कुठे दिसत नव्हता. शेवटी धौम्य व शिष्य थोड्या थोड्या अंतरावर जाऊन त्याला हाका मारायला लागले. कुठूनतरी तोंडाला पट्टी लावून मुसक्या बांधल्यावर जसे कोणी गुदमरून 'हूँ हूँ' आवाज काढेल तसा आवाज आला. धौम्य आवाजाच्या दिशेने धावले. पाहतात तर काय आरुणी एखाद्या लांब चिखलाने माखलेल्या शीळेसारखा बांधाचाच भाग बनून आडवा पडलेला त्यांना दिसला. तोंड उघडणेही त्याला शक्य नव्हते. धौम्य काय झाले असेल ते समजले. सर्व शिष्यांना त्यांनी तयार होऊन हाती दगड माती घेऊन उभे राहण्यास सांगितले. आरुणी उठल्याबरोबर उघडे पडणारे बांधाचे खिंडार लगोलग बुजवा असे त्यांना समजावून त्यांनी आरुणीला हात देऊन उठवले व घट्ट उराशी कवटाळले. सद्गदीत होऊन ते म्हणाले 'खरा शिष्य आरुणी, उद्दालक आरुणी'.

हाच तो उद्दालक. अडीच हजार वर्षांपूर्वी झालेले हेच ते उद्दालक ऋषी. बृहदारण्यक व छांदोग्य उपनिषदात ज्यांचे तत्त्वज्ञान आहे तेच उद्दालक ऋषी. आद्य तत्त्वज्ञानी म्हणून ज्यांची ओळख तेच उद्दालक ऋषी. अन्न, जल, अग्नी हे तीन मूळ तत्त्व आहेत असे प्रतिपादणारे उद्दालक ऋषी. डोळ्यांनाही दिसणार नाही असे असंख्य अणू एकत्र येऊनच आपल्याला दिसेल अशी मोठ्या आकाराची कुठलीही वस्तू तयार होते असे सुचविणारे उद्दालक ऋषी. Indian Atomism, भारतीय अणुवादाचे प्रवर्तक उद्दालक ऋषी. पाश्चात्य जगात कुणी थेल्सला (Thales) तर कुणी अॅरिस्टाॅटलला तर कुणी काँफ्यूशियसला आद्य तत्त्वज्ञानाचा जनक मानतात. आपण मात्र अभिमानाने उद्दालक आरुणीला कां मानू नये?

शिवा नः सन्तु वार्षिकीः, अर्थात् पावसाचे पाणी आम्हाला सुख देवो अशी प्रार्थना करणारे उद्दालक ऋषी. ते दु:खही देऊ शकते हे अनुभवाने समजलेले उद्दालक ऋषी. धौम्यांच्या एका वराने क्षणात सर्वज्ञानी झालेले उद्दालक ऋषी. विद्वत्ता आणि ज्ञान यातला फरक समजणारे व ते आपला पुत्र श्वेतकेतु याला समजावून सांगणारे उद्दालक ऋषी. आपल्या उद्दालक नावानेच पाण्याशी निगडित असणारे उद्दालक ऋषी.

आरुणीची ही गोष्ट शालेय पुस्तकात पुराणातून आली होती. आता नसते. आता आश्रमही नसतात, धौम्यही नसतात, आरुणीही नसतात. कोचिंग क्लासेसचा हा जमाना.

शिष्यावर प्रसन्न होऊन धौम्य ऋषींनी उद्दालकाला सर्वज्ञानी व तत्त्वज्ञानी बनविले असे म्हणतात. आरुणीची गोष्ट सांगण्याचे कारण पाण्याच्या जीवदाई व जीवघेई गुणांचे त्यात वर्णन आहे. आपला जीव गेला तरी चालेल पण पाण्याची विनाशक छाया आश्रमावर पडू नये म्हणून सर्वस्वाचे बलिदान करायला तयार असणाऱ्या शिष्याचे त्यात वर्णन आहे. नव्हत्याचे होते करणारे व होत्याचे नव्हते करू शकणारे तत्त्व म्हणजे पाणी, जल, जीवन, उद, उदक. बोलोऽऽ श्री उद्दालक आरुणी की जय.

देवासारखीच पाण्याची भीती व देवासारखाच पाण्यावर विश्वास मनामनात होता. कधी पावेल, कधी कोपेल हे बड्याबड्यांना सांगता येऊ नये असा पाऊस एक देव होता. पाऊस 'तो' होता. वरून, आकाशातून, म्हणजेच स्वर्गातून येणारा म्हणून तो स्वर्गीय होता. इतका महत्त्वाचा देव की तो नक्कीच देवांचा राजा होता. सारेच कसे जुळून आले. म्हणून पाऊस इंद्रदेव होता. पुराणातल्या कथा त्याचे proof देत होत्या. पूजा केली नाही म्हणून गोकुळवासी गवळ्यांवर नाही का तो कोपला होता? त्यानेच सर्वनाशी पाऊस पाडला म्हणून बालकृष्णाने नाही का गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून सर्वांचे रक्षण केले होते? त्या घटनेचा उल्लेख पुराणातच नाही तर आजच्या भुक्कड कवितांमधेही असतोच की नाही? (http://balved.blogspot.in/2015/10/blog-post_17.html?m=1)

गोल गोल लाल लाल
मधे फुगलेला गाल
पिटुकल्या डबीमधे
असे टिकली
फुलझड्या, भुईनळे
अनार, आकाशबाण
लडी, बाँब गर्दीमधे
बघा रुसली

गोबरे गोबरे गाल
ठुमक ठुमक चाल
बुटकी आनंदी बघा
हिरमुसली
छोट्या छोट्या हातामधे
टिकलीला घेऊन ती
तिची समजूत आता
काढू लागली

आपण दोघी लहान
दिसायला छान छान
माझी आवडती तू गं
कां तू रुसली?
लहान जरी आपण
काम आपले महान
सांगते तुला मी आता
गोष्ट आपली

वरुणास राग येता
यमुनेस पूर येता
साऱ्या गावामधे कोण
पुढे आला?
गावामधे किती थोर
तरी लहानसे पोर
फक्त एक बाल कृष्ण
पुढे धजला

दहा दहा बोटांमधे
गोवर्धन उचलण्या
फक्त छोटी करांगळी
कामी आली
लहानशा मुलाने गं
लहानशा बोटाने गं
जगामधे लहानांची
कीर्ती केली

दिवाळीच्या फराळात
िचवड्याच्या कढईत
मिठाची चिमूट बघ
किती मोलाची
श्रीखंडाच्या वाडग्यात
कोजागिरीच्या दुधात
रंग स्वादाची चिमूट
केशराची

माझी आई बघ आली
जरीचा शालू नेसली
सोन्याचे दागिने घाली
आज दिवाळी
काय बरे कमी आहे?
काहीतरी उणे आहे
काहीतरी घाईमधे
ती विसरली

आनंदी डोके खाजवी
नाही नेहमीची आई
आज ही कां अशी मज
दिसे वेगळी
आई पुनः आई दिसे
दिवाळीची लक्ष्मी भासे
लाल टिकली लावता
कोऱ्या कपाळी

टिकलीचा राग गेला
बालचंद्र उगवला
त्याला ओवाळण्याची हो
वेळ झाली
दगडावर ठेवूनीया
वर दगड मारता
छोटूशी टिकली आता
फट्ट फुटली

किती म्हणून किती पुरावे द्यावे? पण तुम्ही काय मानाल म्हणा! जाऊ द्या. पावसाच्या कथा आपल्या पुराणातच नाहीत तर जगभरातील mythology पावसाच्या गोष्टींनी भरलेली आहे. सर्वत्र पाऊस देणारी शक्ती supernatural आहे असाच पुरातन काळापासून समज आहे. विश्वास ठेवा वा न ठेवा.

वैज्ञानिकांनाही कथा आवडतात. अफाट कल्पनाशक्तीचे त्यांनाही भरपूर कौतुक असते. पण प्रत्येक गोष्टीमागे देव असतो हा दैवी सिद्धांत त्यांच्या प्रकृतीला पटत नाही. म्हणून मग देव नाही तर कोण आहे याचा शोध ते सतत घेत असतात. पाऊस पाडणारा बोक्कामुच्चु कोण हे ते शोधूनच काढतात. दुष्काळ पाडणे, पूर आणणे, संहार करणे अशा गंभीर आरोपातून ते इंद्रदेवांना बाइज्जत बरी करतात. जलचक्र शोधून काढतात व ते सर्वांच्या गळी उतरवतातच उतरवतात.

आतातर विज्ञान इतके प्रगत झाले आहे की पाऊस येणार की नाही येणार, आला तर केव्हा येणार, कुठे येणार, किती येणार याचा बऱ्यापैकी अंदाज बांधल्या जाऊ शकतो. धौम्य ऋषींना आता पाऊस येणार हे आधीच कळू शकते व ते आवश्यक ती काळजी घेऊ शकतात. आरुणीला आता काळ्या रात्री देहाचा अडसर करून नदीला थोपवावे लागत नाही. तरी पण शेवटी निसर्ग आहे. अधून मधून आपल्याला नमवणारच. त्याच्यापुढे मानव म्हणजे दरिया में खसखस. त्याचा काय टिकाव लागणार?

पावसाशी मानवी जीवन इतके निगडित आहे की पावसावर खूप संशोधन झाले, होत आहे व होत राहणार. El Nino, Al Nina याचा पावसावर कसा फरक पडतो हे विज्ञान आता सांगते. प्रशांत महासागराच्या (pacific ocean) विषुववृत्तीय पट्ट्यावर वाहणारे व्यापारी वारे (trade winds) महासागराच्या पृष्ठभागावर गरम व थंड पाण्याचे थर दर काही वर्षांनी कसे निर्माण करतात आणि त्यामुळे चातुर्मासातला आपल्याकडचा मोसमी पाऊसच कमी ज्यास्त होत नाही तर साऱ्या जगाचे हवामानच पिसाळते हे कळायला लागले. नास्तिकपणा बोकाळला खरे, पण पावसाचे, व एकंदरीतच हवामानाचे चंचल मन मानवाला कळायला लागले. पूर येण्या आधीच पुराची सूचना मिळायला लागली. जीव व वित्त हानी थोडीफार कमी करता आली. आता आता तर जागतिक हवामानातील बदल, climate change हे आपल्या अस्तित्त्वावरच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहे. हा प्रश्नही आपणच निर्माण केला आहे व त्याचे उत्तरही आपल्यालाच शोधायचे आहे. आपल्याला भेडसावणाऱ्या ह्या प्रश्नावर जागतिक पातळीवर विचारविमर्श सुरू आहे. काहीतरी तोडगा निघेल. नाहीतर प्रलय अटळ आहे. 'वाचव रे देवा!' असे म्हणून किंवा विष्णुसहस्रनामाच्या जपाने हा प्रश्न सुटणार नाही.

पण काहीही झाले तरी, विज्ञान कितीही प्रगत झाले तरी पाऊस योग्य प्रमाणात पाडणे, न पाडणे, हवा तेथे पाडणे हे मानवाला जमले नाही, जमणार नाही. थोड्याफार प्रमाणात ढगांमध्ये जाऊन मीठ किंवा अन्य क्षार टाकून कृत्रिम पाऊस पाडता आला आहे. तरी पण अफाट प्रमाणावर दरवर्षी होणारी ही पाण्याची उलाढाल आजही मानवाला अचंबित करते, व करीत राहणार. जलचक्राला, विज्ञाननिष्ठ बोक्कामुच्चूला तो आदराने व भीतीने मनोमन नमन करीतच राहणार. आपल्यासारखे कथाप्रेमी El Nino व Al Nina यूट्यूबवर पाहणारच पाहणार.

https://m.youtube.com/watch?v=WPA-KpldDVc

जुन्या कपोलकल्पित कल्पना कितीही सुंदर असल्या तरी आता शाळकरी मुलेही त्या मानत नाहीत. पण कल्पनाविलास म्हणून त्या नक्कीच वाचनीय आहेत. त्या पुराणकथा, लोककथा जरूर वाचाव्या. Mythological tales about rain किंवा folk tales of rain अशी string देऊन सर्च केले तर पावसाच्या गोष्टींचा, पावसाबद्दल पुराणकालीन समजुतींचा खजिना गावेल. पहा करून वेळ असेल तर. एक भजन कमी करा वाटल्यास.

आकाशात काळ्याकुट्ट विशाल आकाराच्या मदमत्त हत्तींचा कळप केवळ खेळ म्हणून स्वर्गातील पाणी सोंडेत भरून जमिनीवर टाकतात. त्यालाच आपण पाऊस पडणे म्हणतो. पण त्यांना केव्हा थांबावे हे कळत नाही. लहान मुलाला जसे 'आता पुरे, आता बालाची झोपीची वेळ झाली नं' असे म्हटले तरी त्याला खेळ थांबवावेसे वाटत नाही तसेच. शेवटी मग प्रलय होऊ नये म्हणून शुभ्र ऐरावतावर बसून इंद्रदेवांना यावे लागते, विद्युल्लता सोडून काळ्या हत्तींना तितर बितर करावे लागते. तेव्हा कोठे पाऊस थांबतो. काळे हत्ती जातात. निळे आकाश दिसू लागते. जपून पाहाल तर त्यामागे इंद्राचा तो शुभ्र हत्तीही आपल्याला दिसतो. काय ते सुंदर दृश्य! भाविकांना, आस्तिकांना तर ऐरावतावर आरूढ खुद्द इंद्रही दिसतो. श्रद्धेने काही जण हात पण जोडतात. नास्तिकांना, चार्वाकांना, चांडाळांना इंद्र सोडा, साधा त्याचा ऐरावत पण दिसत नाही. त्यांना फक्त काळे ढग ओसरतांना दिसतात व निळ्या आकाशात उंचावर पांढरे आवर्ती ढग दिसतात. त्यांना दृष्टीच नसते. हत्तींना ढग समजतात. हा हंत!

आतातर समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन, ती वर जाऊन, थंड होऊन, पुन्हा द्रवीभूत (condense) होऊनच ढग होतात एवढेच नाही, तर झाडांची पाने, गवताचे पाते हेही पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात वातावरणात पाठवतात व ढग तयार होतात हे कळले आहे. जमिनीतले पाणी वृक्षाची मुळे, गवताची मुळे ओढून घेतात व आपल्या पानांद्वारे पुन्हा वातावरणात बाष्परूपात पाठवतात. पानेच वातावरणातील कर्ब-द्वी-प्राणिद (carbon dioxide) शोषून प्राणवायू वातावरणात सोडतात हे आपण सारेच जाणतो, मानतो. पण एका कर्ब-द्वी-प्राणिदाचा रेणू (molecule) शोषतांना ८-१० पाण्याचे रेणू वृक्ष वातावरणात पाठवतो हे फारसे शालेय पुस्तकात सुद्धा सांगत नाहीत. वृक्ष सुद्धा ढगनिर्मिती करतात, वृक्ष सुद्धा पाऊस पाडतात, वृक्ष सुद्धा जलचक्रात सहभागी होतात. म्हणून तर वृक्ष वाचवा, वृक्षारोपण करा सांगतात. म्हणून तर Rain Forest, वर्षारण्य हा प्रकार असतो. वर्षारण्यात वृक्ष स्वत:च ढगांचा कारखाना चालवतात व त्या ढगांकडून स्वत:वरच पाऊस पाडून घेतात. हे त्यांचे स्वत:पुरते जलचक्र अद्भुत आहे.

साऱ्या गोष्टींचा बोक्कामुच्चू देवच आहे असे न मानणाऱ्यांच्या सतत वाढणाऱ्या जमातीमुळे, बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्थेमुळे, कितीतरी गोष्टींमागचा खरा बोक्कामुच्चु मानवाला कळला. वृक्ष पाणी कसे ओढतात, साधारण १०० मिटरपेक्षा उंच वृक्ष कां नसतात यामागचे अदेव विज्ञान (godless science) इतके सुंदर आहे की 'सुंदर विज्ञान, उभे बुद्धीवरी' अशी आरती ओठातून सहज यावी. पहा येते का?

http://www.science4all.org/article/the-amazing-physics-of-water-in-trees/

ईडा पीडा टळो
दसऱ्याच्या दिवशी अज्ञानाचा रावण जळो

विजयादशमी
२०१६
_____________________

No comments:

Post a Comment