Monday, 31 October 2016


पुष्पक


लहान मूल पालथे पडून पुढे घुसायला शिकले की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. त्याला पहिल्यांदा गती येते, वेग येतो. पण त्याचा तो आनंद फार काळ टिकत नाही. त्याला इतक्या मेहनतीने थोडेसेच पुढे सरकणे आता आवडत नाही. आपला वेग आणखी वाढवण्याच्या नादात तो रांगू लागतो. पुन्हा चेहऱ्यावर आनंद उमटतो. पण फार काळ नाही. दिल मांगे मोर! मोर म्हणजे more. Peacock नाही. मराठीत स्पष्ट ठसठशीत उच्चार मोअर. असो. अधिक वेगाचा ध्यास बाळाला आईचा घोळ धरून उभे करतो, भिंत धरून पाऊल पाऊल पुढे जायला शिकवितो, हात सोडून पावले उचलणे शिकवितो, आधाराशिवाय चालायला शिकवतो, धावायला शिकवतो. तोच मग पुढे जाऊन Usain Bolt होतो. दहापेक्षा कमी सेकंदात १०० मिटर धावतो व जगज्जेता होतो.

अशी वैयक्तिक प्रगती इतरही प्राण्यात दिसते. पण सृष्टीमध्ये ८४ लक्ष योनींंमध्ये खरा वेगाचा ध्यास फक्त एकाच जीवाला, मानवाला. तेवढ्यासाठी तो वानराचा नर झाला. पुढचे दोन पाय उचलून मागच्या दोनावर उभा झाला व चतुष्पादाचा द्विपाद झाला. तेवढ्यासाठी तो घोड्यावर बसला, तेवढ्यासाठी त्याने चाकाचा शोध लावला. सायकल आली, स्कूटर आली, मोटर आली, विमान आले, अवकाशयान आले.

पण मानवाचा निर्माता देव? त्याचे काय? त्याचे असे नाही. देवांना गतीचे बंधन नाही. 'मारुततुल्य वेगं' म्हणजे वाऱ्याशी तुलना करता येईल असा वेग असणारा मारुती, म्हणजे हनुमान आपण दर शनिवारी, व साडेसाती असेल तर रोज स्मरतोच. वाऱ्याचा वेग फारच फार तर किती? मोठे चक्रीवादळ आले तरी तासाला दीडशे, दोनशे किलोमिटर एवढाच. उसेन बोल्टचा वेग दहा सेकंदाला १०० मिटर धरला तरी तो फारच फार तर एका तासाला ३६ कि.मी. जाईल. त्या मानाने श्रीरामदूत नक्कीच ५-६ पट ज्यास्त वेगवान. पण देवांनी मानवापेक्षा फक्त ५-६ पटच सरस असावे हे काही आपल्याला पटत नाही बुवा.

एखादी व्यक्ती किंवा एखादा प्रकल्प अगदीच हळूहळू पुढे जात असेल तर 'अगदीच मुंगीच्या पावलानी पुढे जातो' अशी आपण टिंगल करतो. बिचारी मुंगी. पण तिच्या शरीराच्या मानाने ती तशी चपळच नाही का? वेगवेगळ्या प्राण्यांचा वेग मोजण्याची एक फार छान वैज्ञानिक पद्धत आहे. ताशी किती कि. मी. किंवा सेकंदाला किती मिटर मोजण्याएवजी कापलेले अंतर त्या त्या प्राण्याच्या देहाच्या लांबीनुसार मोजणे अधिक योग्य आहे. प्राण्याची लांबी किंवा उंची समजा क्ष असेल तर एका सेकंदात तो असे किती क्ष पुढे जातो हे जर पाहिले तर प्राण्यात अधिक चपळ कोण हे ठरवता येईल. उदाहरणार्थ, समजा उसेन बोल्ट १० सेकंदात १०० मिटर धावत असेल, म्हणजे एका सेकंदात १० मिटर धावत असेल व त्याची उंची सहा फूट किंवा अंदाजे २ मिटर असेल तर एका सेकंदात तो ५ body lengths धावतो असे म्हणता येईल. म्हणजेच मानवाचा वेग ५ body lengths per second म्हणायला हरकत नाही. मग आता असाच मुंगीचा वेग पहा. म्हणजे आता मुंगी आणा, तिची लांबी मोजा, मग तिला सरळ रेषेत ठराविक अंतर धावायला लावा, stop watch घेऊन मग तिला तसे करायला किती वेळ लागतो ते पहा, मग काळ काम वेग गणित मांडून तिचा वेग काढा. सांगितली कोणी एवढी कटकट? तेवढच काम आहे का आपल्याला?

पण आपण कशाला करायचं? वेडे वैज्ञानिक आहेत ना असले धंदे करायला. काम ना धंदा, हरी गोविंदा. आता हेच पहा ना.

https://m.youtube.com/watch?v=ATE-L_wh4yw

एक फूट, म्हणजे १२ इंच, म्हणजे ३०० मिलींमिटर धावपट्टी पार करायला मुंगीला साधारण ४ सेकंद लागले. म्हणजे ती एका सेकंदाला ३ इंच, म्हणजे ७५ मिलिमिटर धावली. साखरेला लागणारी ती मुंगी साधारण दोन मिलीमिटर लांबीची. म्हणजे एका सेकंदात मुंगी ३७-३८ body lengths धावते. आपण फारच फार तर ५-६ बाॅडी लेंग्थ्स धावू. आपण म्हणजे आपण नाही बरे! आपण म्हणजे उसेन बोल्ट. म्हणजे ती 'साखरेचा रवा' खाणारी मुंगी आपल्यापेक्षा चपळ, आपल्यापेक्षा वेगवान. ती जर देहाने आपल्या एवढी असती तर सहज १५० कि.मी. तासाला चालली असती. म्हणजे वाऱ्याच्या वेगानी. म्हणजेच आपल्या वातात्मज रामदूतासारखीच ती वेगवान.

पण मग बाकीचे प्राणी? त्यावरही हे रिकामटेकडे वैज्ञानिक प्रयोग करतात की काय? सांगायला लाज वाटते, पण खरेच करतात. सर्वात तेज एक लहानसा कीडा आपल्या शरीराच्या ३२० पट अंतर एका सेकंदात पार करतो. म्हणजे उसेन बोल्टपेक्षा ५० पट अधिक वेगवान. मारा इथे टिचकी आणि वाचा.

http://voices.nationalgeographic.com/2014/04/30/fastest-animals-science-mites-record/

तर हे असे आहे. कुठल्याही दृष्टीने विचार केला तरी आपण फारच स्लो प्राणी आहोत. काय करावे? ठेविले अनंते तैसेची रहावे.

पण त्या अनंताचे मात्र तसे नाही. त्याचा वेग असीम. त्याच्यापाशी विमान आठवण मागे नेईल तेव्हापासून होते हे आपण जाणताच. ध्रुवबाळ, बाळ कसला, ध्रुवमहाराज, विमानानेच तर वर गेले. सत्ययुगातली गोष्ट. पुराणांवर विश्वास ठेवावा तर आजपासून लाखो करोडो वर्षे पूर्वीची. त्रेतायुगातही रावणापाशी विमान होते. आपलाच सावत्र भाऊ कुबेर याचे ते विमान त्याने कपटाने मिळविले होते हे तर आपण जाणतोच. चोट्टा कुठला!  त्या कपटी रावणाचा वध करून, निस्पृहपणे सोन्याची लंका बिभीषणाच्या सुपूर्द करून श्रीराम सहकुटुंब सहपरिवार त्याच विमानात बसूनच तर अयोध्येला आले होते. त्या विमानाचे वर्णन सर्व पुराणात आहे.

संस्कृतात विमान शब्दाचा अर्थ भवन, राजवाडा असाही आहे. अर्थात् आकाशाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारे वाहन असाही अर्थ आहेच. वाल्मिकी रामायणात रावणाच्या पुष्पक विमानाचे सविस्तर वर्णन आहे.

ततो ददर्शोच्छ्रितमेघरूपं
मनोहरं काञ्चनचारुरूपम्
रक्षोधिपस्यात्मबलानुरूपं
गृहोत्तमं ह्यप्रतिरूपरूपम्

हनुमानाला दिसलेल्या रावणाच्या विमानाचे हे वर्णन आहे. रावणाच्या शक्तीला अनुरूप असे हे उत्तम व अनुपम विमान मेघांप्रमाणे उंच व सुवर्णासारखे सुंदर कांतीचे असलेले होते.

महीतले स्वर्गमिव प्रकीर्णं
श्रिया ज्वलन्तं बहुरत्‍नकीर्णम् ।
नानातरूणां कुसुमावकीर्णं
गिरेरिवाग्रं रजसाऽवकीर्णम्

तेजोमय सुवर्णकांतीचे हे रत्नजडित विमान नाना तऱ्हेच्या फुलांनी व त्यांच्या परागांनी आच्छादित पर्वतशिखरासारखे शोभिवंत दिसत होते.

नारीप्रवेकैरिव दीप्यमानं
तडिद्‌भिरम्भोधरमर्च्यमानम् ।
हंसप्रवेकैरिव वाह्यमानं
श्रिया युतं खे सुकृतां विमानम्

यथा नगाग्रं बहुधातुचित्रं
यथा नभश्च ग्रहचन्द्रचित्रम् ।
ददर्श युक्तीकृतचारुमेघ
चित्रं विमानं बहुरत्‍नचित्रम्

वगैरे वगैरे. आपण सारे संस्कृत जाणतोच, त्यामुळे शब्दश: अर्थ सांगावा न लगे.

विमानाचे उड्डाण करण्याचे व parking चे स्थान, म्हणजे विमानतळ कसे होते तेही वर्णन आहे.

मही कृता पर्वतराजिपूर्णा
शैलाः कृता वृक्षवितानपूर्णाः ।
वृक्षाः कृताः पुष्पवितानपूर्णाः
पुष्पं कृतं केसरपत्रपूर्णम् ॥ ९ ॥

विमानतळही सोने आणि रत्न वापरून केलेल्या कृत्रिम पर्वतमालांनी सजवले होते. वृक्ष, फुले यांचेही वर्णन आहे.

कृतानि वेश्मानि च पाण्डुराणि
तथा सुपुष्पाण्यपि पुष्कराणि ।
पुनश्च पद्मानि सकेसराणि
वनानि चित्राणि सरोवराणि ॥ १० ॥

विमानात श्वेत भुवने, सुंदर फुलांनी सुशोभित पुष्करिणी होत्या. केसरयुक्त कमळे, तसेच अद्वितीय वने आणि सरोवरे त्यात होती.

पुष्पाह्वयं नाम विराजमानं
रत्‍नप्रभाभिश्च विघूर्णमानम् ।
वेश्मोत्तमानामपि चोच्चमानं
महाकपिस्तत्र महाविमानम्

असे ते पुष्पक विमान पाहून हनुमंत आऽऽ वासून बघत राहिलेत यात नवल ते काय? आणखीही वर्णन आहे. पुष्पक विमान जितके प्रवासी त्यात येतील तितके आपोआप मोठे होत असे. Housefull असा प्रकार त्यात नाही. कोणीही या, कितीही या, हे विमान adjust करू शकत असे. क्या बात है. विश्वकर्माच्या तंत्रज्ञानाला तोड नाही. अजूनही अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण बोईंग, एअरबसच्या क्षुल्लक विमानांनी प्रवास करणारे आपण ते ऐकून जळून खाक होऊ म्हणून आवरते घेणे भाग आहे. वाचायचेच असेल तर वाचा बुवा. जळून पापड होईल तुमचा. आपल्याला काय!

http://satsangdhara.net/vara/k5s007.htm

पण रावणाजवळ एकच विमान होते का? नाही. अनेक होती. चक्क १२० विमानांचा ताफा होता व लंकेतच ६ विमानतळे होती. त्यांची नावे सुद्धा आहेत. नकाशे आहेत. पूर्ण recorded history बरें. तुम्ही काय विश्वास ठेवाल म्हणा!

https://bharathgyanblog.wordpress.com/2012/10/31/237/

तसे म्हटले तर chartered विमानांची प्रथा सुद्धा सत्ययुगापासून आहे. ध्रुवमहाराजही विमानात बसूनच वैकुंठाला गेले होते. आता विमान निघणार एवढ्यात त्यांनी आई सुनीता शिवाय मी येणार नाही असा हट्ट धरला. तेव्हा त्यांना थोड्या वेळापूर्वीच त्यांच्या आईला घेऊन take off करून आकाशात आधीच पुढे गेलेले दुसरे विमान दाखविण्यात आले तेव्हा कुठे ते विमानात बसायला तयार झाले. पुराणातच असे सांगितले आहे. Air travel देवांसाठी अगदी काॅमन होता. मनुपुत्र मानव मात्र तेव्हाही सेकंदाला २-३ body lengths वेगानेच पायीपायी जात असे. काय हे!

जितके भव्य विमानाचे वर्णन, तितकेच गोड विमानप्रवासाचे वर्णन. पेवंदी संस्कृतपेक्षा आपल्या गावरानी भाषेत वाचाल तर तोंड पण गोड होईल.

सीता रघुपति मिलन बहोरी
सुरन्ह कीन्ह अस्तुति कर जोरी
पुन्हि पुष्पक चढि कपित समेता
अवध चले प्रभु कृपा निकेता

संस्कृतपेक्षा तर नक्कीच सोपे आहे. नाही का? रामचरितमानस वाचाल तर लंका ते अयोध्या प्रवास, मार्गात पुष्पक विमान कोठे कोठे उतरले, विमानातून जातांना रामाने सीतेला काय काय दाखविले, सारे सारे आहे. लंकेला येताना रामाचा जो मार्ग होता तोच त्याने विमानाने जाताना पण घेतला. भारद्वाज ऋषींच्या आश्रमापाशी विमान उतरवून, त्यांचा आशिर्वाद घेऊनच सीतापती राम सहकुटुंब, सहपरिवार अयोध्येला पोहोचले. शंकेला काही कारण नसावे.

भारद्वाज ऋषी म्हणजे सप्तर्षीतलेच एक बरे. त्यांच्याच नावाने वैमानिक शास्त्र म्हणून एक ग्रंथ आहे. त्यांनीच लिहिलेल्या 'समग्र' नामक महाग्रंथातलाच तो एक भाग आहे असे म्हणतात. समग्र म्हणजे ज्ञानाचा encyclopaedia म्हणायला हरकत नाही. वैमानिक शास्त्र ग्रंथात विमानाचा पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्यांनी सांगितलेला आहे. हे ज्ञान त्यांचे नसून त्यांच्याही पूर्वीपासूनच उपलब्ध होते असे ते म्हणतात असेही पुस्तकात आहे. हे प्राचीन ज्ञान विसाव्या शतकात तत्कालीन मद्रास प्रांतातील (आताचा तामिलनाडू) कोणी सुब्बराय शास्त्री नावाच्या जेंटलमनला वीसाव्या शतकात सापडले व त्यांनी ते लिहून काढले. त्यांना ते सापडले कसे हा प्रश्न आहे म्हणा. पण असे फाजिल प्रश्न आपण कां विचारावे? त्यांचेच हस्तलिखित वापरून ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी विसाव्या शतकात १९५८ मधे बृहद विमानशास्त्र हा ग्रंथ छापला. नंतर मूळ वैमानिक शास्त्र हा ग्रंथ जोसेर (Josyer) नामक एका इंग्रजी गृहस्थांनी इंग्रजीत भाषांतरीत करून १९७३ साली प्रसिद्ध केला. खरे नाही ना वाटत? पण ही पुस्तके आहेत. संस्कृत येत असेल तर वाचू शकता आपण. नाहीतर सोप्पे पडेल असे इंग्रजी भाषांतर आहेच की (http://upload.vedpuran.net/Uploads/121113the_vimanika_shastra.pdf). नाहीतर टिचकीमार व्हिडिओ आहेच आहे.

https://m.youtube.com/watch?v=K71W1vGZ1ME

संस्कृतमधले आहे म्हणजे खरे असलेच पाहिजे. नाही का? इंग्रजीत पण आहे म्हणजे authentic. नाही का? पण नाही. काही चार्वाकांना ते पटत नाही. ते या सर्व माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहतात. त्यावर लेख लिहितात. वैज्ञानिक दृष्टीने पाहता असे पारा (Mercury) भरलेले विमान उडणेच शक्य नाही असे म्हणतात. आपल्याच देशातल्या बंगलोरच्या Indian Institute of Science मधील अेरोनाॅटिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील पाच वैज्ञानिकांनी संशोधन केले व लेख लिहिला. हा लेख लिहिणारे कोणी निनावी नाहीत. त्यांना नावे आहेत. प्राध्यापक मुकुंद, देशपांडे, नागेंद्र, प्रभू आणि गोविंदराजू. देशपांडे सोडले तर चांगले देवाची नावे असलेले हे शास्त्रज्ञ हो! हे वैज्ञानिक हा संस्कृत ग्रंथ प्राचीन साहित्य नसून आता आता लिहिलेला असावा व प्राचीन म्हणून खपवला असावा असे म्हणतात. त्यातले संस्कृत आधुनिक असून प्राचीन काळी प्रचलित असलेल्या संस्कृतशी मेळ खात नाही असे म्हणतात. काय म्हणावे आता! कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ! आणखी काय? जळलं मेलं लक्षण! दळिद्री मेले! जन्मदरिद्री!

पण या नवीन-प्राचीन ग्रंथाने खरेच जगभर खळबळ माजवली. जगभरचे वैज्ञानिक भारतात प्राचीन काळी विमाने व विमानशास्त्र होते का यावर अभ्यासपूर्ण मते द्यायला लागले. त्यातील बऱ्याच कल्पना विचार करायला लावतील, पटतील अशा आहेत असे काही जण म्हणतात. पण एकंदरीत हा सर्व प्रकार बोगस आहे असे बहुतांश वैज्ञानिकांचे मत आहे. खरे खोटे कोण जाणे. पण ग्रंथलेखकाचे कौतुक करावे लागेल. मस्त!

काहीही असले तरी आमच्या देशात पूर्वीपासूनच विमाने होती असे भाविक मानतातच. मानोत पण. पण भाविकही आज ज्या विमानांनी प्रवास करतात ती मात्र भारद्वाजांच्या टेक्नाॅलाॅजीवर आधारीत नाहीत. पुष्पक विमानासमोर आपल्या विमानांना विमान म्हणतानाही लाज वाटावी इतके आजचे विमान क्षुल्लक. खेळण्यातल्या विमानांसारखे. बाव्हला-बाव्हलीच्या (की भावला-भावली, की बाहुला-बाहुली?) लग्नाइतकेच लटके. किंवा लहानपणी मुले घर घर खेळतात तसे. पुष्पक पाहून चकित होणाऱ्या हनुमानाला आजचे विमान दिसले तर तो आऽऽ वासून नाही, ईऽऽ वासून पाहील. तुच्छ! गलिच्छ! खरे म्हणजे आपल्या आजच्या विमानांना विमान म्हणूच नये. तसे केले तर तो पुष्पक, त्रिपुर, शकुन, रुक्म इत्यादि वैदिक विमानांचा अपमान होईल. आपले मानवी विमान म्हणजे फारच फार तर उडनखटोला. 'आज मी उडनखटोल्याने दिल्लीला जात आहे. उडनखटोल्याने गेले की वेळ वाचतो हो' असे म्हणावे आपण बापड्यांनी. कशी वाटली idea?

वाऱ्यासारखेच मन फार स्वैर असते. भावला भावलीच्या लग्नावरून भुलाबाईच्या गाण्यांची आठवण झाली. देवीचे नवरात्र बसले की घरोघरी हे सुरू होत असत. कुठे कुठे त्याला भोंडल्याची गाणी पण म्हणतात. त्यातल्या एका गाण्यात असलेली माहेरच्या वैद्याची व सासरच्या वैद्याची तुलना खूप मस्त आहे. आपला देश, आपली संस्कृती म्हणजे माहेर व पाश्चात्य देश, पाश्चात्य संस्कृती म्हणजे सासर मानले तर या गाण्यात असलेला जाज्वल्य देशाभिमान, स्वसंस्कृतीचा गर्व स्पष्ट जाणवेल. माहेरचा वैद्य म्हणजे पुष्पक विमान व सासरचा वैद्य म्हणजे आजकालचे बोइंग किंवा एअरबसचे विमान असे रूपक लक्षात घेतले तर या भुलाबाईच्या गाण्यात खूप मजा येईल. आपले ते सोने, दुसऱ्याचे ते शेण. आपला तो सोनू, दुसऱ्याचं ते कार्ट. कुठे 'आमचे' दैवी पुष्पक विमान आणि कुठे 'तुमच्या' राईट बंधूंनी शोध लावलेला मानवी उडनखटोला.

आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटकातुटका
डोक्याला पागोटं फाटकंतुटकं
हातात काठी जळकं लाकूड
कपाळाला टीळा शेणाचा
तोंडात विडा पादरा कीडा
कसा बाई दिसतो भिकाऱ्यावाणी
बाई भिकाऱ्यावाणी

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटं भरजरी
हातात काठी चंदनाची
कपाळाला टीळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
कसा बाई दिसतो राजावाणी
बाई राजावाणी

अगदी असाच, किंवा याहीपेक्षा प्रखर अभिमान आपल्याला आपल्या पुष्पक विमानाचा, वेदकालीन aeronautical science चा आहे. सत्ययुगात, त्रेतायुगातच काय, आता आता कलियुगात संत तुकारामांना सदेह स्वर्गात न्यायला ते पुष्पक विमान आले होते. हो किनई? हो नं!

पण शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारद्वाजांच्या त्या विमानशास्त्राचा काही उल्लेख नाही. विमानाचा शोध लावणारे बोक्कामुच्चु भारद्वाज ऋषी आणि ते कारखान्यात तयार करणारी बोक्कामुच्चु विश्वकर्मांची कंपनी यांचा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पाठ्यक्रमात कुठेही नामोल्लेख नाही. मानवी मनात पूर्वापार व्यापलेले विमान प्रत्यक्षात उतरविण्याचे श्रेय राईट बंधूंना जाते असे शाळेत आपल्या गळी उतरवतात. जमीन आणि पाण्यावर प्रवास करू शकणाऱ्या मानवाला, स्वत:चा पायांचा वेग फारच फार तर ३५ किमी तासाला असूनही चाकाचा शोध लावून स्वत:चा वेग वाढवणाऱ्या मानवाला पक्षांसारखे उडायचा नेहमीच ध्यास होता. आणि कधीतरी आपण उडूच अशी जिद्द होती. जिद्द तेथे यश!

पक्षी उडती आकाशी अन् पतंगही जाई
वादळ येता जमिनीचा पाला पाचोळाही
जमिनीवरती, समुद्रावरी जरी तुझा संचार
आकाशाचे दार न उघडे, मनी कष्ट रे फार

पक्षांचा तुज हेवा वाटे, तुला कां न पंख
सर्व साध्य, पण उडता ये ना, असह्य हा डंख
एके दिवशी नभात घेईन उंच उंच झेप
तुझी अस्मिता जणू फुंकते पाञ्चजन्य शंख

निरीक्षण सदा पक्षांच्या पंखांचे तू करिशी
तसेच घडवून, स्वतःस लावून, धावत तू जाशी
पडशी, उठशी, पुनः धावशी, हार न तुज मान्य
बुद्धी, युक्ती, चिकाटी तुझी, धन्य धन्य धन्य!

गरम हवेचे फुगे बांधुनी तू आता उडशी
पंखांना तू पंखे लावून नभी झेप घेशी
पंखहीन तू प्राणी, लावून बुद्धीचे पंख
जमीन, जल आणि आकाशाचा स्वामी होशी

सीमा नाही नभास, कळले नभी झेप घेता
अंतहीन आकाशाचा तुज ध्यास लागला अता
चंद्र रोजचा आकाशी तुज देई आव्हान
खगोलात उडणारा पक्षी तूच, नसे अन्य

मानवचंद्र कवितेतील हे शब्द. वाचा पूर्ण कविता वाटल्यास.

http://balved.blogspot.in/2015/09/blog-post_6.html?m=1

आधी गरम हवेचे फुगे हाती घेऊन आकाशात भ्रमण करणे जमले आणि मानवाचा आनंद अक्षरश: गगनात मावेनासा झाला. पण फुग्याची गती व दिशा बरीचशी हवेवर अवलंबून होती. स्वचलित स्वनियंत्रित (powered and controlled) विमान मानवाला हवे होते. गती व दिशा यावर विजय मिळवायचा अथक प्रयत्न वैज्ञानिकांचा सुरूच होता. शेवटी राईट बंधूंना यश आले आणि मानव वैमानिक झाला. पहिले मानवी विमान अस्तित्वात आले.

क्षुल्लक राईट बंधूंचा थोडासा उल्लेख येथे करणे वावगे होणार नाही. राईट म्हणजे Right की Write? Write down the right answer. काय ही भाषा? आंग्ल म्हणजे काय चांग्ल, नी काय वांग्ल? असो. भाषेची टिंगल नको.

तर हे राईट बंधू म्हणजे विल्बर (Wilber) आणि आॅरविल (Orville) Wright बंधू. विल्बर म्हणजे आॅरविलाग्रज, आॅरविलचा मोठा भाऊ. फार मोठा नाही. तीन चार वर्षं मोठा. यांच्या इतके प्रसिद्ध बंधुद्वय नाही. रामलक्ष्मण, रावणकुंभकर्ण आहेत म्हणा. पण कलियुगात तरी यांच्यासारखे हेच. लहानपणीच त्यांच्या पिताश्रींनी दिलेले एक खेळणे दोघांचे खूप आवडते. ते म्हणजे खेळण्यातले उडणारे, हेलिकाॅप्टरसारखे दिसणारे एक विमान. थोडे मोठे झाल्यावर दोघे सायकलचे दुकान चालवीत. पंक्चर काढणे, हवा भरून देणे, पडलेली चेन चढवून देणे, overhauling (मराठीत ओव्हरआॅयलिंग बरें) करून देणे वगैरे वगैरे. पण मनात नेहमी powered, controlled उडणारे यंत्र करायचा ध्यास. डोळ्यासमोर आकाशात उडणारे पक्षी. दोघेही बंधू अव्वल दर्जाचे मेकॅनिक. काय ब्रह्मदेवाने त्यांच्या भाळी लिहिले होते ते तोच जाणे. पण १९०३ मधे दोघांनी स्वत: तयार केलेले विमान उडवून दाखविले. बलून नाही, विमान. वाहतुकीच्या साधनात त्या एका शोधाने अभूतपूर्व बदल घडवून आणला. माणूस पक्षी झाला. द्विज द्विज झाला. मानवाला अक्षरश: पंख फुटले.

पहिले विमान आकाशात उडले तेव्हा १८६७ मधे जन्मलेला विल्बर जेमतेम ३५ वर्षांचा होता. १८७१ मधे जन्मलेला विल्बरानुज आॅरविल फक्त ३२ वर्षांचा होता. विल्बरच्या भाळी एवढे यश लिहिणाऱ्या ब्रह्मदेवाने त्याच्या ललाटी आयुष्य मात्र फारसे लिहिले नव्हते. १९१२ मधेच तो निजधामास गेला. जेमतेम ४५ वर्षांचा होता. तेथे गेल्यावर पुष्पक, त्रिपुर, शकुन, रुक्म वगैरे स्वर्गीय विमानांच्या ताफ्याचा in-charge झाला असे म्हणतात. पण नक्की माहीत नाही बरें. तिकडली बित्तंबातमी असणाऱ्यांना विचारा. तेच अधिकारी लोक काय ते सांगू शकतील. पण ते लोक कुठे सापडतील? GPS चा जमाना आहे. त्यांचे अक्षांश रेखांश (Latitude Longitude) दिले की झाले.

Latitude : 20.7059345
Longitude : 77.0219019

शोधा म्हणजे सापडेल. एखादी अॅप (App) शोधावी लागेल नक्की ठिकाण कळायला. पण असो. आॅरविलला मात्र बरेच आयुष्य लाभले. पण शेवटी तोही १९४८ला गचकलाच.

ते पहिले मानवी विमान एक ठिणगी होती. वणवा पेटायला पुरेशी. आता तर काय? मानवी विमाने आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जातात. Supersonic Jets प्रत्यक्षात असतात, उडतात. लोकांना इकडून तिकडे वाहून नेतात. आवाजाचा वेग सेकंदाला साधारण ३०० मीटर. म्हणजे मिनिटाला १८ किमी. म्हणजे तासाला १०८० किमी. त्याहूनही वेगाने जाणारी विमाने, म्हणजेच सुपरसाॅनिक विमाने असतात. धावपट्टी सुटली की वेग वाढवता वाढवता अशा विमानांनी आवाजाचा वेग घेतला की sonic boom होतो. गडगडाट होऊन हवेत इतके शक्तिशाली कंपन होते की खाली घरांच्या खिडक्यांचे काच फुटू शकतात. मारुततुल्य वेगाचेच अफाट कौतुक असणारा मानव आता ध्वनितुल्य वेगाने प्रवास करू शकतो.

पण तो वेग तरी त्याचे समाधान करू शकला का? नाही. हा मानव, हा कीडा कधीच समाधानी नव्हता, नाही व नसेल. विमानांवर संशोधन करणारा मानव aeronautical engineering वरून aerospace engineering कडे वळला. पृथ्वी सोडून अवकाशात, भूगोलातून खगोलात जायला लागला. चंद्रावर पोहोचला. मंगळ ग्रहावर त्याने अवकाशयान पाठवले. त्या यानाचा वेग ताशी लाख किलोमिटरच्या आसपास होता. बृहस्पतीपर्यंत जाणारा शोधग्रह, म्हणजे Juno नावाचा Jupitor probe ताशी २६५००० किमी वेगाने गेला व त्यातच विलीन झाला. अगदी ३-४ महिन्यापूर्वी. तो गेला पण गिनीज (Guineas) जागतिक विक्रमांच्या पुस्तकात शिरला. आता तर ताशी ४००००० किमी पर्यंत वेग घेऊ शकणारे अवकाशयान दृष्टीच्या टप्प्यात येत आहे. एकदम नवे तंत्रज्ञान (https://m.youtube.com/watch?v=NjWsSlTMIYU).  तासाला ४ लाख किलोमिटर म्हणजे सेकंदाला १०० किलोमिटरपेक्षा अधिक. म्हणजे १००००० मिटर. म्हणजे सहाफुटी मनुपुत्राकरिता ५०००० body lengths. उसेन बोल्ट ५ बाॅडी लेंग्थ्स धावतो तर आॅलिंपिक गोल्ड मेडल विजेता होतो. नास्तिक शिरोमणी चार्वाक २ बाॅडी लेंग्थ धावायचा म्हणे सेकंदाला. आपला एक अंदाज म्हणून सांगतो. पण त्याच्या, व नंतर आलेल्या अनेक चार्वाकांच्या विचारशक्तीचा वेग दांडगा. पुष्पक विमानाने घालून दिलेला आदर्श डोक्यात भिनलेला. आकाशात उडणारी घार सतत नजरेसमोर. मग काय विचारता? आवाजाचा वेग मानवाने कधीच ओलांडला. पुढे प्रकाशाच्या वेगाने, प्रकाशतुल्य वेगाने मानव धावू लागला तर नवल ते काय?

पण हे वेगाचे आव्हान मानवापुढे ठेवणारा, वेगवान होण्याला प्रवृत्त करणारा, मनासारखा चपळ, वाऱ्यासारखा वेगवान, जितेंद्रिय, ज्ञानी, बुद्धिमान, पवनसुत, वानरश्रेष्ठ, श्रीरामदूत विसरून कसे चालेल? कोण विसरेल?

मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये

_____________________

Tuesday, 11 October 2016


जीवन


म्हणजे पाणी बरें! पाण्यालाच हा पर्यायवाची शब्द. पण त्यातच तर पाण्याचे सारे मर्म दडलेले. पाण्याशिवाय जीवन, पाण्याशिवाय जीव, जीवसृष्टी अशक्य. पृथ्वी सोडून विश्वात आणखी कोठे जीव आहे का, असू शकतो का याचा शोध घेणे म्हणूनच तर 'तेथे पाणी आहे काय' याचा शोध होतो. पाणी नसेल तर जीवन नक्कीच नाही. पण पाणी असेल तर मात्र जीव आहेच असे नाही, पण असू शकतो. पाणी असेल तरच मग इतर जीवोपयोगी घटकांचा शोध सुरू होतो. Amino acids आहेत का, किंवा ते उत्पन्न होण्यासाठी आवश्यक अशी परिस्थिती व घटक आहेत का याचा शोध सुरू होतो. पाणी असणे ही जीवसृष्टीकरिता necessary condition आहे, sufficient condition नाही. पाणी नसेल तर तुमचा देव सुद्धा जीवनिर्मिती करू शकणार नाही. त्यालाही आधी पाण्याची निर्मिती करावी लागेल. ते करण्यासाठीच एखादा देव आधी निर्माण करावा लागेल. नंतर मग जीव बीव. म्हणूनच पाणी पाहून हात जोडावे. हात जोडून म्हणावे, ह्याला जीवन ऐसे नाव!

लहान मुलांना काहीतरी प्रश्न विचारून, बरोबर उत्तर दिले की शाब्बास म्हणून त्यांच्याशी सहज गट्टी जमवता येते. असेच एकदा एका शाळकरी मुलाला 'बाळ, तू रोज गाईचे दूध पितोस की म्हशीचे?' विचारले तर तो हासायलाच लागला. प्रश्नकर्ता अगदीच बुद्दू असा भाव चेहऱ्यावर झळकावीत तो उत्तरला 'छे, आम्ही नाही असे कोणा गाई म्हशीचे दूध पीत. मी तर डेअरीचे दूध पितो.'. घ्या आता. बसा बोंबलत. शहाणपणा दाखवायला सांगितले कुणी? खाशी जिरली. बरे असो. आज तसेच एखाद्या लहान मुलीला विचारले की पाणी कुठून येते, तर ती नळातून किंवा अॅक्वागार्डमधून म्हणेल. अगदी नक्की. काळच तसा आला आहे. सर्व ईश्वरनिर्मित आहे हे साधे सत्य आजच्या पिढीला माहीत नाही. 'कलियुग गं बाई, कलियुग!' म्हणावे व सोडून द्यावे झाले.

पण पाणी खरेच कुठून येते? नदीतून? की तलावातून? की ओढ्यातून? की ट्यूबवेलमधून? की समुद्रातून? की ढगातून? की स्वर्गातून?

आज शाळाशाळातून जलचक्र, म्हणजे water cycle शिकवितात म्हणून लहान मुलेही वरील एकही उत्तर बरोबर नाही म्हणतील व आपल्याला उत्साहाने नदी कशी सागराला मिळते, समुद्राच्या पाण्याची वाफ कशी होते, वाफ हलकी असल्यामुळे वर कशी जाते व थंड होऊन तिचा ढग कसा होतो, ढग डोंगराला अडून पाऊस कसा पडतो, पावसाचे पाणी वाहून नदीत कसे जाते, नदी वाहत वाहत कशी सागराला मिळते, हे साद्यंत वर्णन करून सांगतील. आपणही 'असे आहे का? अरेच्चा! मला माहीतच नव्हते, हुशार हो तुम्ही!' म्हणून त्यांचे कौतुक करू व मनातल्या मनात थोडे आणखी म्हातारे होऊ. हे विज्ञानाचे फॅड आल्यापासून जीवन कसे रुक्ष होऊन गेले आहे. आपला काळ किती सुंदर होता! हेच जलचक्र जरा वेगळ्याच संदर्भात मांडणारी ती शाळेत अभ्यासिलेली कविता किती सुंदर होती! तो काळसुद्धा पाण्यासारखाच वाहून गेला. पण पाऊस होऊन परत का येणार?

जीवन त्यांना कळले हो…
'मी'पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तिथे मिळाले हो
चराचराचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधूसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनि जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!

कोण बरे कवी? काय बरे नाव? बालकवी की काय? की भा. रा. तांबे? पण नाही. बा. भ. बोरकर की काय? हं, तेच ते. त्यांना कोण विसरेल? त्यांच्या 'तेथे कर माझे जुळती' ला कोण कसे विसरू शकेल? व्वा!

दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती,
तेथे कर माझे जुळती

क्या बात है! तोंडाला पाणी सुटते. पण गदिमांची जलचक्र नावाची कविताही काही कमी नाही बरें.

नदी सागरा मिळते
पुन्हा येईना बाहेर
जग म्हणते कसे गं,
नाही नदीला माहेर

काय सांगावे बापानो
तुम्ही आंधळ्यांचे चेले
नदी माहेराला जातेे
म्हणूनच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर
तरी आठवतो तिला
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन
नदी उडोनीया जाते
पंख वाऱ्याचे घेऊन

होउन पुन्हा लेकरू
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा

'सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर'. आता काय म्हणावे? बोलती बंद अशा ह्या कविता. त्या आठवल्या की आपले मन नदीसारखे वाहत जाते व स्मृतिसागराला जाऊन मिळते. असे झाले की मूळ विषय बाजूलाच राहतो. मूळ प्रश्न होता 'पाणी कुठून आले?'.

कोण कुठून आले, काय कसे झाले, हे कोणी केले, असे व तत्सम प्रश्न माणसाला तो माणूस झाल्यापासूनच भेडसावत असतात. प्रत्येक गोष्टीमागचा कर्ता करविता बोक्कामुच्चु त्याला शोधायचा असतो. पाण्याला कारणीभूत बोक्कामुच्चु कोण, पाऊस कोण पाडतो हे तर अत्यंत मूलभूत प्रश्न असावेत. कारण पाण्यामुळे जसे जीवन, तसेच पाण्याअभावी मृत्यु हे मानवाला अनुभवाने कळायला फार कठिण नसावे. पाऊस पाणी देतो हेही तो सुरुवातीपासूनच पाहतो. पाऊस आला नाही तर दुष्काळ! दुष्काळ म्हणजे जणू काळ. यमराज. पण म्हणून काही खूप पाऊस येऊन चालेल का? पूर म्हणजे ही यमराजच. चित भी मेरी, पट भी मेरी. मोठा पूर म्हणजे तर प्रलय. सर्वनाश. आज जर दुष्काळ इतके भयावह वाटतात, पूर अनेक बळी घेतात, तर पूर्वी काय होत असावे? पाण्यासाठी बिचारा मानव नदीकाठी वसत असे. आणि त्याच नदीला पूर आला की बळी जात असे. अशा ह्या जीवनदाई व जीवननेई पावसाचे मूळ काय, कोण तो वर्षा करणारा 'वार्षिक' हा अक्षरश: जीवन-मरणाचा प्रश्न. कोण तो बोक्कामुच्चु?

विज्ञान, तत्वज्ञान फारसे प्रगल्भ नसलेला प्राचीन काळ. पण पृथ्वीभोवती सूर्य फिरत नसून सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह फिरत असावे असे सूर्यमालेचे चित्र आपले याज्ञवल्क्य ऋषी मांडते झाले. इतर जागतिक शास्त्रज्ञांच्या तब्बल ५००-६०० वर्षे आधी. आज त्यांना त्याचे श्रेय मिळो न मिळो, पण विज्ञानाला जो वैचारिक कणा लागतो तो आपल्या पूर्वजांनी प्रदान केला यात संशय नाही. तसेच तत्त्वज्ञानाचे. उद्दालिकाचे तत्वज्ञान अति प्राचीन. आज आपण इतरांना नावे घेऊन श्रेय देतो, पण तत्वज्ञानाच्या इतिहासाचे अभ्यासक उद्दालक नाव उच्चारल्याशिवाय राहत नाहीत.

पुन्हा विषयांतर झाले असे वाटते. आपण पावसावर विचार करीत होतो. उद्दालक कुठून आले मधेच? ठीक आहे. चला मूळ मुद्द्याकडे.

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

पाऊस म्हटला की ही कविता आठवते. साधी सोपी कविता. पण एक नित्याची शोकांतिका. नांगरून, वखरून, पेरणी करून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला. पावसाच्या मान मान मिंता करीत, व्याकुळ होऊन त्याला 'ये रे ये रे पावसा' म्हणत. सारा अडीअडका पणाला लावलेला. सारे पैसे खर्चून पेरण्या केलेल्या. सारा पैसाच जणू पावसावर लावलेला. पाऊस आला तर पीक येणार. नाहीतर नुसता अंधार. पाऊस आला देखील. अंकुर फुटले, रोपटे वाढले, कणसे चांगली गुबगुबीत आली. पण आता कापणी होणार एवढ्यात पाऊस आला मोठ्ठा. पुरात सारे पीक उभ्याचे आडवे झाले. सारे कष्ट वाया गेले. सारा पैसा झाला खोटा.

जीव पिळवटणारी शोकांतिका. नाही समजली तर बाष्कळ nursery rhyme, बालकविता.

पावसावर मानवाचे जीवन पूर्णपणे अवलंबून होते, आहे व राहील. आज कमीत कमी काही सरकारी योजना, मोबदला, मदत तरी मिळते. पूर्वी काय? राजा असो वा रंक. अवर्षेची वा अतिवर्षेची झळ सर्वांनाच लागत असणार. दैवी कोप. आणखी काय! पर्जन्यदेव कोपले की कोपले. देवराज इंद्र कोपला की कोपला. सतत देव देव करणाऱ्या ऋषीमुनींनाही मग सूट नाही. आपल्या धौम्य ऋषींचेच घ्या की. काय तो पाऊस!

महाभारतकालीन ही गोष्ट आताआतापर्यंत घराघरात सांगण्यात ऐकण्यात येत असे. आजकालही कदाचित एकट दुकट घरी सांगत ऐकत असतील. आजकाल जसे JEE, म्हणजे Joint Entrance Examination देऊन IIT, म्हणजे Indian Institute of Technology मधे जायला सारे धडपडत असतात, व प्रवेश मिळाला की कृतकृत्य होतात तसेच तेव्हा पूर्व हिमालयातील ब्रह्मावर्तस्थित धौम्य ऋषींच्या आश्रमाचे होते. धौम्य ऋषींनी आपल्या पाल्याला (म्हणजे झाडपाल्याला नाही, आपण पालन पोषण केलेल्या आपल्या पाल्याला, म्हणजे मुलाला) शिष्य म्हणून स्वीकारले की आईबाप धन्य होत. मौंज करून, भिक्षावळ घालून सातव्या वर्षी बाळ ऋषींच्या आश्रमात टाकले की झाले. वेदविद्यापारंगत होऊनच तो सात आठ वर्षांनी परत घरी येत असे.

एका वेळची गोष्ट. धौम्य ऋषींनी जरा ज्यास्तच शिष्य घेतले होते. मुलींनी आश्रमात जाण्याचा तो काळ नव्हता. सारी मुलेच मुले. श्रीराम, किशोर, प्रमोद, शरद, विश्राम, विनोद, सुधीर, प्रदीप, आरुणी, अशोक ... अनेक नावे. खरे म्हणजे ही त्या काळची प्रचलित नावे. नंतर जुनी झाली. चलनातून गेली. पण पुन्हा काही काळाने फॅशनेबल झाली. पुन्हा फिरून येते तीच फॅशन. असो.

धौम्य ऋषी सारेच शिकवायचे. वेद, उपनिषद, शस्त्रविद्या, शेतकाम, पशुपालन सारे सारे. सारेच शिष्य काही सारखे प्रतिभावान नव्हते. प्रत्येकाची aptitude वेगळी, capability भिन्न, capacity अलग. प्रमोद सर्वात हुशार, पण आरुणी जेमतेमच. बाकी सारे अधेमधे कुठेतरी. पण गुरू आणि गुरुपत्नीला मात्र सारेच शिष्य सारखेच प्रिय. जणू त्यांची मुलेच. विद्याध्ययन आटोपले की धौम्य साऱ्याच शिष्यांना ज्याची त्याची योग्यता, कौशल्य, नैपुण्य पाहून नवे नाव द्यायचे. तीच त्यांची पदवी. तोच दीक्षांत समारंभ. आजच्या सारखे गाजावाजा करून convocation वगैरे प्रकार नव्हता. हे पुनर्नामकरण मात्र फार आवश्यक. पाण्याला त्याचे गुणधर्म व महत्त्व पाहून जीवन नाव दिल्यासारखे. नावावरून मग जगाला त्या व्यक्तीच्या गुणांची पारख होत असे. येताना जरी शिष्य प्रमोद व अरुण नाव घेऊन आले तरी जाताना अनुक्रमे सर्वज्ञानी व ठोंब्या नाव घेऊन जायचे. असो.

आश्रम पूर्णपणे स्वयंपूर्ण होता. आश्रमाला लागूनच शेती होती. सर्व धान्ये, फळे, भाज्या तेथेच होत. उदरभरणाला लागणारे काहीही बाहेरून आणावे लागत नसे. शेताला लागूनच एक ओढा वाहत असे. उन्हाळ्यात जेमतेम नालीसारखा, तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखा. नदीतूनच शेतीला पाणी देता यावे म्हणून पाट काढले होते. नदीचे पाणी शेतात घुसू नये म्हणून शेतीकडच्या भागाला नदीला दगड मातीचा बांध घातला होता. तो फुटला तर मात्र पावसाळ्यात काही खरे नव्हते. आश्रम उंचावर असल्यामुळे वाचला असता, पण शेत मात्र पूर्ण जलमग्न झाले असते.

भाद्रपदातल्या पितृपक्षात एकदा खूप पाऊस आला. थांबण्याचे नाव घेईना. संध्याकाळ झाली, अंधार पडला तसे पावसाने अधिकच रौद्र रूप धारण केले. रात्र होता होता तर पाऊस चेकाळलाच. धौम्य ऋषी आश्रमातच फेऱ्या मारायला लागले. नदीचा काठ खचला तर सारे शेत बुडून जाईल हे त्यांना माहीत होते. त्यांनी, त्यांच्या पत्नीने व शिष्यांनी प्रेमाने लावलेले भाज्यांचे वाफे, तांदळाचे शेत होत्याचे नव्हते होईल यांची त्यांना भीती वाटली. शेवटी त्यांनी आरुणीला बोलावले व त्याला म्हणाले की नदीच्या काठाकाठाने जाऊन बघ कुठे पाण्याच्या ओघाने बांध खचायला आला आहे की काय. तसे असेल तर दगड मातीचे भरण टाकून तात्पुरते तरी पाणी थोपवून धर. सकाळ झाली की आपण सारेच मग डागडुजी करू. पाऊसही तोपर्यंत थांबेल.

गुरूची आज्ञा. नाही म्हणायचा प्रश्नच नाही. अभ्यासात तशी फारशी गती नसली तरी आरुणीला अशी कामे फार आवडत. लगेच फावडे घेऊन तो निघालाच व पाहता पाहता अंधारात गडप झाला. पाऊस संततधार सुरूच होता. धौम्य ऋषींच्या फेऱ्याही. आता तर त्यांना शेताबरोबर शिष्याचीही चिंता.

अंधारात चाचपडत चाचपडत आरुणी बांधाच्या काठाकाठाने जात होता. घोंगडी डोक्यावरून घेतले होते पण त्याचा काही उपयोग नव्हता. पाऊस इतका होता की आरुणी पूर्ण ओलाचिंब झाला होता. जाता जाता जेथे जेथे त्याला वाटले की पाणी बांधावरून किंवा बांध फोडून वाहील तेथे तेथे तो फावड्याने दगड माती टाकून फावड्याने व पायाने दाबून देत असे. धुम्मस आणला असता तर बरे झाले असते असे त्याला वाटले. आश्रमाच्या आंगणात तो बरेचदा धुम्मस करीत असे. पण तो किती जड असतो हे आठवून त्याला तशाही परिस्थितीत हसू आले. पुढे जाता जाता एका ठिकाणी त्याला पाणी बांध चिरतांना दिसले. आरुणीने लगेच कंबर कसून दगडमातीचे भरण टाकायला सुरुवात केली. पण पाण्याचा जोर इतका की एक फावडे माती टाकावी तर दोन फावडे वाहून जात असे. पाहता पाहता वीतभर दरार हातभर झाली. एखादा मोठा दगड तिथे रुजवला तर पाणी थांबले असते. पण तो एकट्याने कसा उचलायचा? आश्रमही दूर राहिला होता. हाका करून काही होणार नव्हते. आता तर हातभर दरार अधिकच मोठी झाली. क्षणभर विचार करून आरुणी स्वतःच तेथे जाऊन आडवा झाला. त्याने आपल्या अंगानेच पाणी अडविले. शरीराचाच बांध केला. पाणी अडले देखील.

प्रहर, दोन प्रहर तसेच गेले असावेत. पाऊसही आता बराच कमी झाला होता. पण नदीच्या पाण्याला जोर होताच.  आरुणीला उठणे शक्य नव्हते. पाणी शेतात घुसले असते. पाणी ओसरेपर्यंत तसेच आडवे होऊन पडून राहणे भाग होते. बोट बोट पाणी ओसरत होते पण नदीला तशी फारशी घाई नव्हती.

इकडे पाऊस थांबला, पहाट झाली तरी आरुणी परतला नाही म्हणून धौम्य ऋषींना खूप चिंता वाटत होती. मनात भलते सलते विचार येऊ लागले. शेवटी प्रात:संध्या वगैरे न करताच सारी शिष्य सेना घेऊन ते निघाले.

आरुणी कुठे दिसेना. शेतात पाणी साठले होते. पण पीक तग धरून होते. फारशी नासाडी झाली नव्हती. पाणी ओसरले, ऊन पडले की पुन्हा रोपे मान वर करणार होती. आणि पाणी ओसरतही होते.

पण आरुणी कुठे दिसत नव्हता. शेवटी धौम्य व शिष्य थोड्या थोड्या अंतरावर जाऊन त्याला हाका मारायला लागले. कुठूनतरी तोंडाला पट्टी लावून मुसक्या बांधल्यावर जसे कोणी गुदमरून 'हूँ हूँ' आवाज काढेल तसा आवाज आला. धौम्य आवाजाच्या दिशेने धावले. पाहतात तर काय आरुणी एखाद्या लांब चिखलाने माखलेल्या शीळेसारखा बांधाचाच भाग बनून आडवा पडलेला त्यांना दिसला. तोंड उघडणेही त्याला शक्य नव्हते. धौम्य काय झाले असेल ते समजले. सर्व शिष्यांना त्यांनी तयार होऊन हाती दगड माती घेऊन उभे राहण्यास सांगितले. आरुणी उठल्याबरोबर उघडे पडणारे बांधाचे खिंडार लगोलग बुजवा असे त्यांना समजावून त्यांनी आरुणीला हात देऊन उठवले व घट्ट उराशी कवटाळले. सद्गदीत होऊन ते म्हणाले 'खरा शिष्य आरुणी, उद्दालक आरुणी'.

हाच तो उद्दालक. अडीच हजार वर्षांपूर्वी झालेले हेच ते उद्दालक ऋषी. बृहदारण्यक व छांदोग्य उपनिषदात ज्यांचे तत्त्वज्ञान आहे तेच उद्दालक ऋषी. आद्य तत्त्वज्ञानी म्हणून ज्यांची ओळख तेच उद्दालक ऋषी. अन्न, जल, अग्नी हे तीन मूळ तत्त्व आहेत असे प्रतिपादणारे उद्दालक ऋषी. डोळ्यांनाही दिसणार नाही असे असंख्य अणू एकत्र येऊनच आपल्याला दिसेल अशी मोठ्या आकाराची कुठलीही वस्तू तयार होते असे सुचविणारे उद्दालक ऋषी. Indian Atomism, भारतीय अणुवादाचे प्रवर्तक उद्दालक ऋषी. पाश्चात्य जगात कुणी थेल्सला (Thales) तर कुणी अॅरिस्टाॅटलला तर कुणी काँफ्यूशियसला आद्य तत्त्वज्ञानाचा जनक मानतात. आपण मात्र अभिमानाने उद्दालक आरुणीला कां मानू नये?

शिवा नः सन्तु वार्षिकीः, अर्थात् पावसाचे पाणी आम्हाला सुख देवो अशी प्रार्थना करणारे उद्दालक ऋषी. ते दु:खही देऊ शकते हे अनुभवाने समजलेले उद्दालक ऋषी. धौम्यांच्या एका वराने क्षणात सर्वज्ञानी झालेले उद्दालक ऋषी. विद्वत्ता आणि ज्ञान यातला फरक समजणारे व ते आपला पुत्र श्वेतकेतु याला समजावून सांगणारे उद्दालक ऋषी. आपल्या उद्दालक नावानेच पाण्याशी निगडित असणारे उद्दालक ऋषी.

आरुणीची ही गोष्ट शालेय पुस्तकात पुराणातून आली होती. आता नसते. आता आश्रमही नसतात, धौम्यही नसतात, आरुणीही नसतात. कोचिंग क्लासेसचा हा जमाना.

शिष्यावर प्रसन्न होऊन धौम्य ऋषींनी उद्दालकाला सर्वज्ञानी व तत्त्वज्ञानी बनविले असे म्हणतात. आरुणीची गोष्ट सांगण्याचे कारण पाण्याच्या जीवदाई व जीवघेई गुणांचे त्यात वर्णन आहे. आपला जीव गेला तरी चालेल पण पाण्याची विनाशक छाया आश्रमावर पडू नये म्हणून सर्वस्वाचे बलिदान करायला तयार असणाऱ्या शिष्याचे त्यात वर्णन आहे. नव्हत्याचे होते करणारे व होत्याचे नव्हते करू शकणारे तत्त्व म्हणजे पाणी, जल, जीवन, उद, उदक. बोलोऽऽ श्री उद्दालक आरुणी की जय.

देवासारखीच पाण्याची भीती व देवासारखाच पाण्यावर विश्वास मनामनात होता. कधी पावेल, कधी कोपेल हे बड्याबड्यांना सांगता येऊ नये असा पाऊस एक देव होता. पाऊस 'तो' होता. वरून, आकाशातून, म्हणजेच स्वर्गातून येणारा म्हणून तो स्वर्गीय होता. इतका महत्त्वाचा देव की तो नक्कीच देवांचा राजा होता. सारेच कसे जुळून आले. म्हणून पाऊस इंद्रदेव होता. पुराणातल्या कथा त्याचे proof देत होत्या. पूजा केली नाही म्हणून गोकुळवासी गवळ्यांवर नाही का तो कोपला होता? त्यानेच सर्वनाशी पाऊस पाडला म्हणून बालकृष्णाने नाही का गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून सर्वांचे रक्षण केले होते? त्या घटनेचा उल्लेख पुराणातच नाही तर आजच्या भुक्कड कवितांमधेही असतोच की नाही? (http://balved.blogspot.in/2015/10/blog-post_17.html?m=1)

गोल गोल लाल लाल
मधे फुगलेला गाल
पिटुकल्या डबीमधे
असे टिकली
फुलझड्या, भुईनळे
अनार, आकाशबाण
लडी, बाँब गर्दीमधे
बघा रुसली

गोबरे गोबरे गाल
ठुमक ठुमक चाल
बुटकी आनंदी बघा
हिरमुसली
छोट्या छोट्या हातामधे
टिकलीला घेऊन ती
तिची समजूत आता
काढू लागली

आपण दोघी लहान
दिसायला छान छान
माझी आवडती तू गं
कां तू रुसली?
लहान जरी आपण
काम आपले महान
सांगते तुला मी आता
गोष्ट आपली

वरुणास राग येता
यमुनेस पूर येता
साऱ्या गावामधे कोण
पुढे आला?
गावामधे किती थोर
तरी लहानसे पोर
फक्त एक बाल कृष्ण
पुढे धजला

दहा दहा बोटांमधे
गोवर्धन उचलण्या
फक्त छोटी करांगळी
कामी आली
लहानशा मुलाने गं
लहानशा बोटाने गं
जगामधे लहानांची
कीर्ती केली

दिवाळीच्या फराळात
िचवड्याच्या कढईत
मिठाची चिमूट बघ
किती मोलाची
श्रीखंडाच्या वाडग्यात
कोजागिरीच्या दुधात
रंग स्वादाची चिमूट
केशराची

माझी आई बघ आली
जरीचा शालू नेसली
सोन्याचे दागिने घाली
आज दिवाळी
काय बरे कमी आहे?
काहीतरी उणे आहे
काहीतरी घाईमधे
ती विसरली

आनंदी डोके खाजवी
नाही नेहमीची आई
आज ही कां अशी मज
दिसे वेगळी
आई पुनः आई दिसे
दिवाळीची लक्ष्मी भासे
लाल टिकली लावता
कोऱ्या कपाळी

टिकलीचा राग गेला
बालचंद्र उगवला
त्याला ओवाळण्याची हो
वेळ झाली
दगडावर ठेवूनीया
वर दगड मारता
छोटूशी टिकली आता
फट्ट फुटली

किती म्हणून किती पुरावे द्यावे? पण तुम्ही काय मानाल म्हणा! जाऊ द्या. पावसाच्या कथा आपल्या पुराणातच नाहीत तर जगभरातील mythology पावसाच्या गोष्टींनी भरलेली आहे. सर्वत्र पाऊस देणारी शक्ती supernatural आहे असाच पुरातन काळापासून समज आहे. विश्वास ठेवा वा न ठेवा.

वैज्ञानिकांनाही कथा आवडतात. अफाट कल्पनाशक्तीचे त्यांनाही भरपूर कौतुक असते. पण प्रत्येक गोष्टीमागे देव असतो हा दैवी सिद्धांत त्यांच्या प्रकृतीला पटत नाही. म्हणून मग देव नाही तर कोण आहे याचा शोध ते सतत घेत असतात. पाऊस पाडणारा बोक्कामुच्चु कोण हे ते शोधूनच काढतात. दुष्काळ पाडणे, पूर आणणे, संहार करणे अशा गंभीर आरोपातून ते इंद्रदेवांना बाइज्जत बरी करतात. जलचक्र शोधून काढतात व ते सर्वांच्या गळी उतरवतातच उतरवतात.

आतातर विज्ञान इतके प्रगत झाले आहे की पाऊस येणार की नाही येणार, आला तर केव्हा येणार, कुठे येणार, किती येणार याचा बऱ्यापैकी अंदाज बांधल्या जाऊ शकतो. धौम्य ऋषींना आता पाऊस येणार हे आधीच कळू शकते व ते आवश्यक ती काळजी घेऊ शकतात. आरुणीला आता काळ्या रात्री देहाचा अडसर करून नदीला थोपवावे लागत नाही. तरी पण शेवटी निसर्ग आहे. अधून मधून आपल्याला नमवणारच. त्याच्यापुढे मानव म्हणजे दरिया में खसखस. त्याचा काय टिकाव लागणार?

पावसाशी मानवी जीवन इतके निगडित आहे की पावसावर खूप संशोधन झाले, होत आहे व होत राहणार. El Nino, Al Nina याचा पावसावर कसा फरक पडतो हे विज्ञान आता सांगते. प्रशांत महासागराच्या (pacific ocean) विषुववृत्तीय पट्ट्यावर वाहणारे व्यापारी वारे (trade winds) महासागराच्या पृष्ठभागावर गरम व थंड पाण्याचे थर दर काही वर्षांनी कसे निर्माण करतात आणि त्यामुळे चातुर्मासातला आपल्याकडचा मोसमी पाऊसच कमी ज्यास्त होत नाही तर साऱ्या जगाचे हवामानच पिसाळते हे कळायला लागले. नास्तिकपणा बोकाळला खरे, पण पावसाचे, व एकंदरीतच हवामानाचे चंचल मन मानवाला कळायला लागले. पूर येण्या आधीच पुराची सूचना मिळायला लागली. जीव व वित्त हानी थोडीफार कमी करता आली. आता आता तर जागतिक हवामानातील बदल, climate change हे आपल्या अस्तित्त्वावरच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे करू पाहत आहे. हा प्रश्नही आपणच निर्माण केला आहे व त्याचे उत्तरही आपल्यालाच शोधायचे आहे. आपल्याला भेडसावणाऱ्या ह्या प्रश्नावर जागतिक पातळीवर विचारविमर्श सुरू आहे. काहीतरी तोडगा निघेल. नाहीतर प्रलय अटळ आहे. 'वाचव रे देवा!' असे म्हणून किंवा विष्णुसहस्रनामाच्या जपाने हा प्रश्न सुटणार नाही.

पण काहीही झाले तरी, विज्ञान कितीही प्रगत झाले तरी पाऊस योग्य प्रमाणात पाडणे, न पाडणे, हवा तेथे पाडणे हे मानवाला जमले नाही, जमणार नाही. थोड्याफार प्रमाणात ढगांमध्ये जाऊन मीठ किंवा अन्य क्षार टाकून कृत्रिम पाऊस पाडता आला आहे. तरी पण अफाट प्रमाणावर दरवर्षी होणारी ही पाण्याची उलाढाल आजही मानवाला अचंबित करते, व करीत राहणार. जलचक्राला, विज्ञाननिष्ठ बोक्कामुच्चूला तो आदराने व भीतीने मनोमन नमन करीतच राहणार. आपल्यासारखे कथाप्रेमी El Nino व Al Nina यूट्यूबवर पाहणारच पाहणार.

https://m.youtube.com/watch?v=WPA-KpldDVc

जुन्या कपोलकल्पित कल्पना कितीही सुंदर असल्या तरी आता शाळकरी मुलेही त्या मानत नाहीत. पण कल्पनाविलास म्हणून त्या नक्कीच वाचनीय आहेत. त्या पुराणकथा, लोककथा जरूर वाचाव्या. Mythological tales about rain किंवा folk tales of rain अशी string देऊन सर्च केले तर पावसाच्या गोष्टींचा, पावसाबद्दल पुराणकालीन समजुतींचा खजिना गावेल. पहा करून वेळ असेल तर. एक भजन कमी करा वाटल्यास.

आकाशात काळ्याकुट्ट विशाल आकाराच्या मदमत्त हत्तींचा कळप केवळ खेळ म्हणून स्वर्गातील पाणी सोंडेत भरून जमिनीवर टाकतात. त्यालाच आपण पाऊस पडणे म्हणतो. पण त्यांना केव्हा थांबावे हे कळत नाही. लहान मुलाला जसे 'आता पुरे, आता बालाची झोपीची वेळ झाली नं' असे म्हटले तरी त्याला खेळ थांबवावेसे वाटत नाही तसेच. शेवटी मग प्रलय होऊ नये म्हणून शुभ्र ऐरावतावर बसून इंद्रदेवांना यावे लागते, विद्युल्लता सोडून काळ्या हत्तींना तितर बितर करावे लागते. तेव्हा कोठे पाऊस थांबतो. काळे हत्ती जातात. निळे आकाश दिसू लागते. जपून पाहाल तर त्यामागे इंद्राचा तो शुभ्र हत्तीही आपल्याला दिसतो. काय ते सुंदर दृश्य! भाविकांना, आस्तिकांना तर ऐरावतावर आरूढ खुद्द इंद्रही दिसतो. श्रद्धेने काही जण हात पण जोडतात. नास्तिकांना, चार्वाकांना, चांडाळांना इंद्र सोडा, साधा त्याचा ऐरावत पण दिसत नाही. त्यांना फक्त काळे ढग ओसरतांना दिसतात व निळ्या आकाशात उंचावर पांढरे आवर्ती ढग दिसतात. त्यांना दृष्टीच नसते. हत्तींना ढग समजतात. हा हंत!

आतातर समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन, ती वर जाऊन, थंड होऊन, पुन्हा द्रवीभूत (condense) होऊनच ढग होतात एवढेच नाही, तर झाडांची पाने, गवताचे पाते हेही पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात वातावरणात पाठवतात व ढग तयार होतात हे कळले आहे. जमिनीतले पाणी वृक्षाची मुळे, गवताची मुळे ओढून घेतात व आपल्या पानांद्वारे पुन्हा वातावरणात बाष्परूपात पाठवतात. पानेच वातावरणातील कर्ब-द्वी-प्राणिद (carbon dioxide) शोषून प्राणवायू वातावरणात सोडतात हे आपण सारेच जाणतो, मानतो. पण एका कर्ब-द्वी-प्राणिदाचा रेणू (molecule) शोषतांना ८-१० पाण्याचे रेणू वृक्ष वातावरणात पाठवतो हे फारसे शालेय पुस्तकात सुद्धा सांगत नाहीत. वृक्ष सुद्धा ढगनिर्मिती करतात, वृक्ष सुद्धा पाऊस पाडतात, वृक्ष सुद्धा जलचक्रात सहभागी होतात. म्हणून तर वृक्ष वाचवा, वृक्षारोपण करा सांगतात. म्हणून तर Rain Forest, वर्षारण्य हा प्रकार असतो. वर्षारण्यात वृक्ष स्वत:च ढगांचा कारखाना चालवतात व त्या ढगांकडून स्वत:वरच पाऊस पाडून घेतात. हे त्यांचे स्वत:पुरते जलचक्र अद्भुत आहे.

साऱ्या गोष्टींचा बोक्कामुच्चू देवच आहे असे न मानणाऱ्यांच्या सतत वाढणाऱ्या जमातीमुळे, बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्थेमुळे, कितीतरी गोष्टींमागचा खरा बोक्कामुच्चु मानवाला कळला. वृक्ष पाणी कसे ओढतात, साधारण १०० मिटरपेक्षा उंच वृक्ष कां नसतात यामागचे अदेव विज्ञान (godless science) इतके सुंदर आहे की 'सुंदर विज्ञान, उभे बुद्धीवरी' अशी आरती ओठातून सहज यावी. पहा येते का?

http://www.science4all.org/article/the-amazing-physics-of-water-in-trees/

ईडा पीडा टळो
दसऱ्याच्या दिवशी अज्ञानाचा रावण जळो

विजयादशमी
२०१६
_____________________