Wednesday, 13 July 2016

निर्माण


सर्वदूर पसरलेल्या वैराण वाळवंटात जरी आपण एकटे उभे राहिलो तरी आपल्याला जीवसृष्टी दिसेल. एखादातरी जीव दिसेल. मग तो कॅक्टस असो वा वाळवंटातला सरडा. नशीबाने कधीकधी ऊंट. काही नाही तर त्या वाळूच्या घड्या कोणी आंथरल्या असतील असा प्रश्न तरी पडेल. दिवसा सूर्य दिसेल. रात्री चंद्र चांदणे. वारा सुटेल, वाळूचे भोवरे गोल गोल फिरत इकडून तिकडे जातील. त्यामागे कोणाचा हात असावा हा प्रश्न पडेल.

दूरवर काठ न दिसणाऱ्या विशाल समुद्रात एकटे उभे असलो तरीही तेच होईल. त्या लाटा कुठून येतात? त्या कुठे जातात? विशाल आकाशाची ती निळी टोपली समुद्राला मिळते त्या पलिकडे काय आहे? हे पाण्यामधे सुळसुळ करत इकडून तिकडे जाणारे जीव नेमके कोणी व कुठे तयार करून समुद्रात सोडले? जितक्या लाटा तितके प्रश्न?

सर्वदूर पसरलेल्या जंगलात एकटे उभे राहिलो तर मग विचारायलाच नको. अफाट अचाट जीवसृष्टी प्रश्नसृष्टीला जन्म देईल. किती हे जीव? किती ही वनस्पती? हे अद्भुत जग कोणी निर्माण केले हा कधी पिच्छा न सोडणारा प्रश्न पुन्हा भेडसावेल. मी कसा आलो, मी कसा झालो, 'मी'पण म्हणजे काय हे मूळ प्रश्न तर मनात घोंघावतच राहील.

निर्मिती आहे म्हणजे निर्माता किंवा निर्मात्री असलीच पाहिजे हा तसे पाहिले तर सहज निष्कर्ष आहे. पण कोण तो? तो पुढे कां येत नाही? 'हे मी केले' असे तो कां म्हणत नाही? तो श्रेय कां घेत नाही? कोणीतरी आहे, पण तो प्रकट होत नाही. कोण असावा तो? तो दर्शन कां देत नाही? तो असा बोक्कामुच्चु कां आहे?

निर्मिती इतकी विविध व विशाल की 'येऱ्यागबाळ्याचे काम नोहे'. जो कोणी बोक्कामुच्चु असेल तो आगळा वेगळा, कल्पनातीत असला पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे असेच कोणीही बावचळलेला मानव म्हणेल. तोच निनाव्या बोक्कामुच्चु 'देव' म्हणून ओळखल्या जातो. निर्मात्यालाही नाव असलेच पाहिजे. तो काही आपण होऊन ते सांगणार नाही. म्हणून reference साठी त्या Anonला, म्हणजे Anonymousला काहीतरी नाव देणे भागच असते. तोच तो देव. इंग्रजीत God. अगदी भारत आणि India. नावे दोन. पण मूळ व्यक्ती तीच. बोक्कामुच्चु. निर्गुण. निराकार. कधीही स्वतः पुढे न येणारी. पण सर्व कळसुत्री बाहुल्यांना नाचवणारी. उपरवाला. उपरवाली म्हणा वाटल्यास फेमिनिस्ट असाल तर.

राजेश खन्नाच्या (आनंद मधल्या) नश्वर देहातून प्राण निघून गेल्यावर अमिताभ बच्चन (बाबू मोशाय) मन घट्ट करून त्याच्याजवळ येतो. तो गेला हे त्याला कळत असते. पण वळत नसते. तो आपल्या ट्रेडमार्क आवाजात म्हणतो; 'बाते करो मुझसे'. आणि अचानक आनंदचा आवाज येतो आणि आपण पण दचकतो.

'बाबुमोशाऽऽय, जिंदगी और मौत, उपरवाले के हात है जहाँपन्हा । उसे ना तो आप बदल सकते है, ना मैं । हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ है जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों में बंधी हैं । कब, कौन, कैसे उठेगा यह कोई नही बता सकता । हा हा हा।

आपल्यालाही असे वाटते की हेच खरे. तो बोक्कामुच्चू ऊपरवालाच सूत्रधार आहे हे पुन्हा आपल्याला पटते. तो आवाज कानात घुमतच राहतो. केव्हा सिनेमा संपला हेही कळत नाही. गर्दीबरोबर आपणही चित्रपटगृहाच्या बाहेर येतो. आपला देवावरचा विश्वास अधिक दृढ होतो. काही जण तर हा संवाद देवाच्या अस्तित्वाचा निर्विवाद पुरावाच आहे असे मानतात. नंतर कधीतरी सिनेमा डोक्यातून उतरला, आनंदच्या मृत्यूचा मनावरचा भावनिक पगडा जरा कमी झाला की पुन्हा कळते की अरे, हा तर सिनेमातल्या नाटकातला एक डायलाॅग होता. खरा बोक्कामुच्चु म्हणजे देव किंवा उपरवालाच आहे याचा दाखला नव्हता. मग आपले जन्ममरण ज्याच्या हाती तो बोक्कामुच्चु नक्की आहे तरी कोण? तो देवच आहे हा एक hypotheses. पण दुसराही काही hypotheses असू शकतो का? सत्य दुसरे काही असू शकते का?

क्रिकेटची मॅच पाहतांना पण आपले असेच होते. क्रिकेट म्हटले की आपण कोणा ना कोणाचे खूप फॅन असतो. आधी सचिन, तो रिटायरला की विराट. हे म्हणजे आपले देव. प्रत्यक्षात दिसणारे देव. आॅटोग्राफ देणारे देव. हेही सारे देव शतक झाले की पॅव्हिलियनकडे तर पाहतातच, पण नंतर आकाशाकडे नजर टाकून त्या ऊपरवाल्याचे, त्यांच्या देवाचे आभार मानतात. आपणही ते पाहून भावुक होतो. आपला देव सुद्धा देवाला मानतो. म्हणजे तोच उपरवाला कर्ता आणि करविता आहे हे आपल्याला पटते. काही जण तर क्रिकेटरसुद्धा शतक झाले की वर पाहून देवाला धन्यवाद देतात हा देव असल्याचा पुरावा सांगतात.  आपल्यालाही पटते. पण पुन्हा भावनेचा पूर ओसरला की सर्व करून सवरून कधीही त्याचा उल्लेख न करणारा बोक्कामुच्चु आपला देवच आहे की दुसरा कोणी, दुसरे काही आहे हा प्रश्न डोके वर करतो. आपले मन आणि बुद्धी हे वेगवेगळे आहेत हे जाणवते व बोक्कामुच्चु कोण हा प्रश्न नव्याने उत्तर मागतो. पण सहजासहजी दुसरे काही उत्तर माहीत नसल्यामुळे आपण तो देवच आहे असे मानून पुन्हा तात्पुरती तडजोड करतो.

कधी एकांतात उगाचच जुन्या गाण्याचे सूर मनात रेंगाळतात.

हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन
के जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन
दिशायें देखो रंगभरी, चमक रही उमंगभरी
ये किस ने फूल फूल पे किया सिंगार है
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार
ये कौन चित्रकार है …
ये कौऽऽऽऽन चित्रकार है
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार

हे गाणे पुन्हा 'कोण हा बोक्कामुच्चु' हाच प्रश्न ठासून विचारते. पण उत्तर?

उत्तर एखाद्या सिनेमात किंवा कीर्तनात मिळेल असे वाटत नाही. त्याची वाट बुद्धिद्वारातून जाते. अनेक त्या द्वारातून गेले, जात आहेत व जात राहतील. त्यांना जे बोक्कामुच्चूचे ज्ञान झाले ते विस्मयकारी आहे. महत्त्प्रयासाने कित्येक गोष्टी करणारा बोक्कामुच्चु कोण हे आतापर्यंत कळले आहे. पण जे कळले त्याहूनही जे अजूनही गूढ आहे, अनाकलनीय आहे, ते कितीतरी पटीने ज्यास्त आहे. पण तेही उलगडेल. शोधा म्हणजे सापडेल हा मानवमंत्र आहे.

एक साधे उदाहरणच घ्यायचे झाले तर चंद्रग्रहणाचे आणि सूर्यग्रहणाचे. अगदी सुरुवातीच्या काळात तर हे फारच भीतिदायक असले पाहिजे. सूर्य नेहमीसारखाच उगवतो काय आणि पाहता पाहता त्यावर एकीकडून काजळी चढून ती पसरत पसरत पूर्ण सूर्यालाच काळे करते काय. संध्याकाळ अजूनही दूर आहे असे वाटत असतांनाच अचानक अांधार पडतो काय, तारे दिसतात काय, पक्षी अवेळी घरट्याकडे व मानव गुहेकडे परततो काय. आणि अचानक उजाडायला बराच अवकाश आहे असे वाटत असतांना सूर्य पुन्हा डोकीवरच उगवतो काय. स्वप्न की सत्य? हे काय झाले? कोणी केले? कोण तो बोक्कामुच्चु?

हजारो वर्षांचा ग्रहणाबद्दलचा मानवाचा अनुभव पुरातन गोष्टींमधे, संदर्भांमध्ये आढळतो. भारत असो, चीन असो, आफ्रिका वा ग्रीस असो. ग्रहणाविषयी भीति एकसारखीच. चीनमध्ये ड्रॅगन चंद्रासूर्याला गिळतो, तर ग्रीसमधे आकाशातले दोन कोल्हे. त्यांना चक्क नाव पण आहे, स्क्योल आणि हेटी. दोघेही अवकाशात फिरत असतात. स्क्योलला सूर्याला खायचे असते, तर हेटीला चंद्राला. मोक्का साधून चंद्र किंवा सूर्य सापडला की ते त्याला गिळतात. आपल्याकडे राहू त्यांना गिळू पाहतो, तर आफ्रिकेत सूर्यच थकून भागून विझतो. चीनमधे घाबरलेले लोक येईल ती गोष्ट, ढोल, मडकी, भांडीकुंडी हाती घेऊन ती बडवतात, ओरडतात आणि त्या ड्रॅगनपासून सूर्याची वा चंद्राची सुटका करतात. तर कुठे कुठे लोक जळते तीर आकाशात सोडतात व सूर्य पुन्हा 'पेटवतात'. चीनमधे आताआतापर्यंत (एकोणवीसाव्या शतकापर्यंत) चंद्राला ग्रहण लागलेले पाहून त्यांच्या नाविकदलाने आकाशात तोफा डागल्याचा पुरावा आहे. नवलाची गोष्ट म्हणजे हे उपाय हमखास लागू पडतात व तासा दोन तासात आलेले हे आसमानी संकट दूर होते. ग्रहण कां लागते याचे देशपरत्वे जे वेगवेगळे कारण सांगितले जायचे त्यावर त्या त्या लोकांचा विश्वास दृढ व्हायला हे यश पुरे असायचे.

एका मजेदार समजुतीप्रमाणे तर सूर्य आणि चंद्र हे नवराबायको आहेत. बिचारे ताऱ्यांनी बजबज भरलेल्या, एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या त्या आकाशातल्या चाळीत राहतात. वर्ष दीड वर्ष जेंव्हा उभयतांना एकांताची संधी मिळत नाही तेव्हा नाईलाजाने ते अधून मधून पळून जातात.  करतील काय? त्यालाच आपण ग्रहण म्हणतो. आपण संभावित असल्यामुळे मग ग्रहणकाळी आकाशाकडे पाहतही नाही.

आणखी एक समजूत अशीच होती. त्याप्रमाणेही सूर्य चंद्र नवराबायकोच होते.  पण ग्रहण त्यांच्या आपसातल्या भांडणामुळे होत असे. कधी नवरा बायकोला कच्चं खायचा, कधी बायको नवऱ्याला. हे जरा पटेल असं वाटतं, नाही का?

अतिप्राचीन काळी ग्रहणाबद्दल काय समजूत होती हे प्राचीन काव्यात, नाटकात, शिलालेखातही सापडते. तो एक संशोधनाचा विषयच आहे. Homer's Odyssey मधे 'The Sun has perished out of heaven, and an evil mist has overspread the world' असा उल्लेख आहे असे नुकतेच संशोधकांनी शोधून काढले. आपले जसे वेद, तसेच ग्रीक लोकांना ही तीन हजार वर्ष जुनी ओडिसी. वेदांप्रमाणेच साधारण तीन हजार वर्षांपूर्वीचे त्यांचे महाकाव्य. होमर म्हणजे त्यांचे व्यासच.

जवळजवळ २७०० वर्षांपूर्वीची आर्चिलोकस (Archilochus) नामक ग्रीक सैनिक कवीची एक अपूर्ण कविता वाचली की आजही त्या भीतीची कल्पना येऊ शकते.

Nothing there is beyond hope,
Nothing that can be sworn impossible,
Nothing wonderful, since Zeus,
Father of the Olympians,
Made night from midday,
Hiding the light of the shining Sun,
And sore fear came upon men.

Zeus कोण? द्झ्यूस किंवा त्झिऊस उच्चार असलेला हा ग्रीक लोकांचा ब्रह्मदेव. त्यांचा सुप्रीम गाॅड. वातावरण आणि आकाशाचा देव. मात्र त्याला एकच तोंड.

आणखी एका ऐतिहासिक घटनेत क्झेरेक्स नावाचा राजा सैन्य घेऊन लढाईकरिता कूच करतो, पण ...

.... At the moment of departure, the Sun suddenly quitted his seat in the heavens, and disappeared, though there were no clouds in sight, but the sky was clear and serene. .....

महाभारतात जसे 'हा सूर्य, हा जयद्रथ' कथेत खग्रास सूर्यग्रहणाचा कृष्णाने उपयोग केला म्हणतात तसेच इतरही युद्धकथांमधेही अचानक सूर्यग्रहण होऊन युद्धाची दिशाच बदलली, कधी  जिंकणारा जिंकता जिंकता हारला, कधी घाबरून दोन्ही बाजूंनी तह केला. अशा अनेक गोष्टी आहेत व आता त्या त्या गोष्टीतला ग्रहणाचा नक्की दिवस व वेळ मानवाने गणिताने शोधून काढली आहे. ग्रहण म्हणजे नियमित शिस्तशीर निसर्गाचे अचानक पाय घसरून पडणे. अंताची चाहूल.

वेगवेगळे धर्म, संस्कृती, चालीरीती असल्या तरी ग्रहणाबद्दलची आंतरिक भीती जगभर विखुरली होती. अज्ञान आणि ज्ञान सीमाबद्ध राहत नाही असेच म्हणायला हवे. दोघेही हवेसारखे आहेत. दोघेही आपण होऊन सर्वदूर पसरतात. विचार करता करता उगाचच हे स्वर हवेवर तरंगत येतात:

पंछी नदियाँ पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिए हैं
सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां होके
.
.
.
सब कहते ये लहर लहर जहां भी जाए
इसको ना कोई टोके
.
.
पंछी नदियाँ पवन के झोंके

पण 'हे पाश्चिमात्य ज्ञान', 'हे पूर्वेकडचे ज्ञानाक्रमण', 'करा आपले संस्कृतिरक्षण' असे आवाज ऐकू येतातच. काही जण तर ज्ञानापासून स्वत: वंचित राहण्याकरिता व इतरांनाही ठेवण्याकरिता जन्म खर्ची घालतात. अज्ञान कवटाळून बसतात. असो. तेही ग्रहणच. सुटेल केव्हातरी.

ग्रहण घडवणारा बोक्कामुच्चु कोण, ड्रॅगन वा कोल्हा वा राहू, हे जरी नक्की माहिती नसले तरी ग्रहण अनिष्टकारी आहे यावर जुन्या काळीही एकमत होते. खग्रास सूर्य ग्रहण तर विचारूच नका. तत्कालीन राजाकरिता तर ते खूपच खराब मानले जाई. त्यामुळे राजदरबारात पुढच्या येणाऱ्या ग्रहणाचे भाकीत आधीच करण्याच्या कामगिरीवर एक दोन विद्वान पोसले असायचे. अभ्यास करून ते बिचारे काही ठोकताळे बसवायचे. मंबो जंबो करायचे. अंदाज करायचे. त्यांच्या अंदाजाव्यतिरिक्त जर का ग्रहण झालेच, अंदाज खोटा ठरलाच तर मग त्यांची खैरच नाही. देहांत शासनच.

पण मानव हा नेहमीच डोकेबाज. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो अशी चुकीची समजूत असली तरी सूर्यग्रहण साधारण १८ महिने व ११ दिवसांनी होते हे त्याने शोधून काढले. पण ते नक्की कुठे होईल हे सांगणे त्या काळात त्याला जमले नाही. पण हजारो वर्षांपूर्वीचे हे गणित बरेचसे बरोबर होते. Saros cycle म्हणून ओळखला जाणारा हा ठोकताळा कसा त्याने जमवला हे तोच जाणे. चंद्र, सूर्य यांचे रोजचे आकाशातले फिरायला जाणे पाहून त्याला कळले की सूर्यग्रहण झाले की त्यानंतर ६५८५ दिवसांनी दुसरे ग्रहण येते. Hats off to you, man!

आणखी एका बाबतीत आज सर्वांचे एकमत आहे. या धर्मा-धर्मात असलेल्या पौराणिक कथांमध्ये आपली राहू केतूची गोष्ट सर्वांत क्रिएटिव्ह असल्याबद्दल जगात वाद नाही. ज्या खूबीने सर्व दुवे आपल्या पुराणात जोडण्यात आले आहेत ते लाजवाब! त्याला तोड नाही. आपल्या पुराणकथांना ते श्रेय कोणीही नाकारू शकत नाही.

आपल्याच लोकांचे सांगायचे झाले तर पुराणाप्रमाणे सूर्य आणि चंद्रग्रहण करणारा बोक्कामुच्चु राहू ग्रह आहे व तोच आकाशातल्या दोघांना अधूनमधून गिळतो, पण ते त्याच्या फुटक्या घशातून बाहेर पडतात. हे इतके सुसूत्र पद्धतीने समजावून सांगण्यात आले तेव्हा कुठे या आकाशीच्या अनाकलनीय घटनेचे गूढ आपल्याला कळले. कमीतकमी बहुतांश मानवांना तरी समजले व उमजले. पण काही मंदबुद्धी, मठ्ठमती चार्वाकांना ते तेव्हाही विचित्र वाटले. अनंत वर्षांच्या निरीक्षणानंतर व संशोधनानंतर त्यांना कळले की पृथ्वी काय, चंद्र काय, सूर्य काय नी ग्रहण काय?

पृथ्वी ही केंद्रभागी व सूर्य, चंद्र, तारे व ग्रह तिच्याभोवती पिंगा घालतात असे आपल्या पुराणात ठासून सांगितले आहे. तरी पण आजपासून जवळजवळ तीन हजार वर्षांपूर्वी आपल्याच याज्ञवल्क्य ऋषीने आपल्या 'शतपथ ब्राह्मण' ग्रंथात स्वत:चे विपरीत मत मांडले. सूर्यच केंद्रबिंदू व बाकी साऱ्यांना त्याने धाग्याने स्वत:भोवती बांधून ठेवले आहे असे त्याने सुचविले. एकाच खुंटाला टांगून ठेवावे तसे. खरे म्हणजे, याज्ञवल्क्याला  'त्याने' न म्हणता आदराने 'त्यांनी' म्हणायला हवे. अनेक इंग्रजी संदर्भ ग्रंथांमधे शतपथ ब्राह्मण मधील त्या ऋचेचा अर्थ असा दिला आहे.

The Sun strings these worlds – the Earth, the planets, the atmosphere – to himself on a thread.

पृथ्वी गोल आहे आणि सूर्याभोवती फिरते हे याज्ञवल्क्य ऋषींना बाकी जगापेक्षा कित्येक शतके आधीच माहिती होते याचा हा पुरावा आहे. पण तेव्हा ते मत आपल्यापैकीच कोणाच्या गळी उतरले नाही, उतरले तरी पचले नाही. तत्कालीन सत्तेने ते मत दाबून टाकले असावे. नंतर जवळजवळ ६ शतकानंतर ग्रीक वैज्ञानिक अॅरिस्टारकस (Aristarchus) ने सूर्यकेंद्रित माॅडेल सुचविले म्हणतात. पण तसे मानायला कोणी तयार होईना. नंतरचे दोन हजार वर्ष प्लेटो (Plato), अॅरिस्टाॅटल (Aristotle), टोलेमी (Ptolemy, P silent) यांचे पृथ्वीकेंद्रित माॅडेल अबाधित राहिले. आपल्या पुराणात आहे तसेच. नंतर तब्बल पाचशे वर्षांनी, म्हणजे सोळाव्या शतकात कोपरनिकसनेही सूर्य हाच केंद्रबिंदू असे सुचवून पाश्चिमात्य देशातही तोवर रूढ असलेल्या पृथ्वीकेंद्रीत आकाशाच्या धारणेला शह देऊ पाहिला. पण सत्ताधीश व धर्मगुरूंच्या जाचाला घाबरून त्याने अगदी मरणासन्न अवस्था येईपर्यंत ते मत उघड उघड मांडण्याचे धैर्य दाखविले नाही. सतराव्या शतकात दुर्बिणीच्या साह्याने केलेल्या संशोधनाने गॅलिलिओने सूर्यच केंद्रभागी असे जवळजवळ सिद्ध केले. पण त्याच्यावरही धर्मद्रोहाचा आरोप ठेवून, छळ करून त्याच्याकरवीच त्या मताचे खंडन करून घेण्यात आले. नंतर आणखी काही काळ गेल्यावर मात्र न्यूटनने व इतरांनी गॅलिलिओच्या निरीक्षणाला दुजोरा दिला व पृथ्वी शेवटी इतर ग्रहांबरोबर सूर्याभोवती फिरू लागली. पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी प्रामाणिकपणे या सिद्धांताचे श्रेय कोपरनिकसला दिले व सूर्यमालेचे आज जे चित्र आपण मान्य करतो ते कोपरनिकन माॅडेल म्हणूनच ओळखल्या जाते. टोलेमी माॅडेल शेवटी धराशायी झाले.

पण आपले याज्ञवल्क्य गुरुजी? त्यांनी त्याही आधी अडीच हजाराहून ज्यास्त वर्षांपूर्वीच सूर्यमालेचे माॅडेल तसेच काहीसे असावे हे जे मत मांडले होते ते काळाआड गेले. आपणच ते गाडून टाकले व भागवत वाचण्यातच धन्यता मानली. आपण पुराणिकच राहिलो. पुराणातच राहिलो. असो. विचार केला तर मन विषण्ण होते. पण मन असेल तर ना?

एकदा कोण कोणाभोवती फिरते हे कळल्यावरही चंद्र व सूर्यग्रहण कसे होते व त्याचा अंदाज कसा लावता येईल हे कळायला बराच काळ पालटावा लागला.  एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वैज्ञानिक ग्रहण प्रेडिक्ट करू लागले. आज तर येणाऱ्या व येऊन गेलेल्या साऱ्या ग्रहणांचे गणित मांडण्यात येऊ शकते. ग्रहण बरोब्बर ठरलेल्या वेळी सुरू होते व ठरलेल्या वेळी सुटते.

चंद्र पृथ्वीच्या व सूर्याच्या मध्ये आला की सूर्याचा काही भाग किंवा पूर्ण सूर्यच आपल्याला दिसेनासा होतो. त्याला कोणी गिळले वगैरे नसते. फक्त आपल्याला दिसण्यात अडथळा निर्माण झालेला असतो. तो दूर झाला की ग्रहण सुटते हे मानवाला कळले. सूर्यग्रहण घडविणारा बोक्कामुच्चु राहू नसून चंद्र आहे हे कळले व भविष्यात येणाऱ्या सर्व सूर्यग्रहणांचा काळ वेळ मानव ठामपणे सांगू शकला.

तसेच चंद्रग्रहणाचे. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. आपली, म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. म्हणून चंद्रावर एकीकडून काळोखी येते व पसरते. सावली निघून गेली की ग्रहण सुटते. चंद्राला सुद्धा राहू गिळत बिळत नाही. उगीचच त्याच्यावर पुराणे आळ घेत होती. चंद्रग्रहणामागचा बोक्कामुच्चु राहू नसून आपणच आहो हे जगाला कळले. जुनी समजूत पार खोटी ठरली. जुने ज्ञान पुसले गेले. राहूला ग्रहाचा दर्जा ब्रह्मदेवाने दिला अशी विश्वसनीय माहिती पुराणात होती. त्यामुळे ग्रहण करणारा खरे म्हणजे साक्षात ब्रह्मदेव. त्यामुळे अविश्वास कोण व कसा व्यक्त करणार? मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? पण ज्ञानाला लागलेले ग्रहणही कालांतराने सुटतेच. सुटलेही.

आतातर राहू ग्रह वगैरे काही नाहीच हे माहीत झाले आहे. मग ती समुद्रमंथनाची गोष्ट? ते राहूचे चोरून अमृत पिणे? ते सूर्य चंद्राचे विष्णूकडे त्याची चुगली करणे? ते विष्णूचे सुदर्शन चक्राने राहूचा शिरच्छेद करणे? ते ब्रह्मदेवाचे मग राहूला ग्रहाचा दर्जा देऊन आकाशात पाठवणे? ते आकाशात त्याने सूर्यचंद्राला बदल्याच्या भावनेने वारंवार गिळणे?

ते सारे पुराणज्ञान पुराणातली वांगीच ठरले. पण मग पुराणातले बाकीचे ज्ञान? ते कशावरून खरे?

ज्ञानाचा कधी अवमान करू नये म्हणतात. तेंव्हा ते ज्ञान होते. आता ते पुसून त्याची जागा नव्याने घेतली. मानवाचा हा सत्याग्रह हाच फक्त सत्य व शाश्वत आहे. घटना त्याच आहेत. फक्त त्या त्या घटनेचे, त्या त्या वस्तुस्थितीचे श्रेय योग्य त्या बोक्कामुच्चूला देणे, 'मी माझे मत काही केल्या बदलू देणार नाही, मी त्यावरच ठाम राहीन' असा अट्टाहास न करणे एवढेच आपल्या हाती आहे. बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्थेत हे कार्य अहर्निश सुरू आहे. बऱ्याच जुन्या धारणा समूळ बदलत आहेत. पण स्थिरवादी, पोपटपंची करणारे, पिंजऱ्यातले शुक त्यामुळे अहर्निश झुरतात त्याला कोण काय करणार? काळ त्यांच्याकरिता न थांबला, न कधी थांबेल.

दोनशे तीनशे वर्षांपूर्वी सूर्यमालेच्या ज्ञानावरच जे ग्रहण होते ते सुटले. 'दे दान, सुटे गिरान' म्हणत पुराणिक निघालेही असतील भीक मागत. सूर्यग्रहणाला कारणीभूत बोक्कामुच्चु चंद्र व चंद्रग्रहणाला कारणीभूत बोक्कामुच्चु पृथ्वी आहे हे आता सर्वमान्य आहे. उगाचच आपण ब्रह्मदेवावर आळ घेत होतो.

बोक्कामुच्चु कोण हे कळले तरी ग्रहणांचे महत्त्व कमी झाले नाही. उलट वाढलेच. २९ मे, १९१९ सालचे खग्रास सूर्यग्रहण तर वैज्ञानिक दृष्टीने फार महत्त्वाचे मानले जाते. या ग्रहणाचा वैज्ञानिक Eddington ने जो अभ्यास केला त्यावरून प्रकाशसुद्धा सरळ रेषेत न जाता गुरुत्त्वाकर्षणाने वळतो हा Einsteinचा कयास खरा ठरला. Theory of Relativity चे, सापेक्षता सिद्धांताचे प्रमाण ग्रहणाने दिले. थोडे इंटरनेटवर शोधले तर एडिंग्टनने सूर्यग्रहणाचे वेळी आकाशात दिवसा दिसणाऱ्या ताऱ्यांचे अध्ययन करून हा निष्कर्ष कसा काढला ते कळेल. या प्रयोगासाठी सूर्य आकाशात असतांना त्याच्याच दिशेने असणारे तारे दुर्बिणीने दिसायला हवे होते. तसे फक्त खग्रास सूर्यग्रहण असेल तरच होणार होते. १९१९च्या सूर्यग्रहणाने ते साधले. म्हणून नंतर एक वर्षाने आइन्स्टाईनला नोबेल पारितोषिक मिळाले.

https://m.youtube.com/watch?v=IVHQH4UPIFs

शोधाचा आनंद शोध लावणाराच जाणे. एडिंग्टनचा आनंद गगनात मावत नसावा त्यावेळेस. त्याची (की त्याच्यावरची?) एक कविता:

Oh leave the Wise our measures to collate
One thing at least is certain, LIGHT has WEIGHT
One thing is certain, and the rest debate -
Light-rays, when near the Sun, DO NOT GO STRAIGHT.

ग्रहण हे संकट न राहता आता तर वैज्ञानिकांना एक पर्वणी वाटते. खगोलज्ञ भूक तहान विसरून संशोधनात मग्न होतात. बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्थेने ग्रहणविषयक संशोधन करून जे ज्ञान उपलब्ध केले ते म्हणजे अज्ञानाविरुद्धचे महायुद्धच. Eclipse in mythology, research on eclipse वगैरे थ्रेड देऊन जरा सर्च केला तर पुढे येणाऱ्या ज्या कथालिंक्स आहेत त्या विस्मयकारी आहेत. ग्रहणस्य कथा रम्या!

१८ आॅगस्ट, १८६८ चे खग्रास सूर्यग्रहणही वैज्ञानिकांकरिता सुग्रास ठरले. ऐन सूर्यग्रहणाच्या वेळी जो काही प्रकाश आला असेल त्याचा स्पेक्ट्रम अभ्यासिता हीलियम वायूचा शोध लागला. नंतरच मग सूर्य कसा ऊर्जा तयार करतो व तो एक अणुभट्टी कसा आहे ते कळले. त्याच्या ऊर्जेमागचा बोक्कामुच्चु उदजन वायू व आण्विक प्रक्रियेने त्याचे हीलियममध्ये होणारे परिवर्तन आहे हे कळले. पूर्ण विश्व जवळजवळ ७४ टक्के उदजन वायू व २४ टक्के हीलियमने व्याप्त आहे हा शोध तिथेच उगम पावला.

ग्रहणाच्या अभ्यासाचा मानवी प्रगतीत फार मोठा वाटा आहे. ग्रहण अनिष्टकारी नाही हे आता माहीत आहे. खग्रास ग्रहण तर उघड्या डोळ्याने मुद्दाम पाहणारे वैज्ञानिक आहेत. पण अजूनही ग्रहणात वेगळे बसणे, गरोदर स्त्रीला व बाळंतिणीला घरात डांबून ठेवणे, देव पाण्यात बुडवून ठेवणे हे प्रकार होतातच. पुरोहित दक्षिणा उकळतातच. मेंदूच ज्यांनी पाकात बुडवून मुरब्बा करायला ठेवला आहे त्यांना कोण काय करणार?

ग्रहणाचे कोडे उलगडले आणि एकट दुकट का होईना, पण लोक पुराणकथांवर प्रश्नचिन्ह उठवू लागले. ही प्रश्न विचारणारी जमात हळूहळू वाढत गेली व सतत वाढत आहे. आज जगात १५-१६ टक्के लोक तसे आहेत. तेवढे तरी पुराणकथांना भाकडकथा समजतात. अशा लोकांना नास्तिकही म्हणतात. २०४० पर्यंत जगातल्या अशा नास्तिकांची संख्या ५० टक्क्यावर जाईल असा अंदाज आहे. ज्ञान विज्ञानाचा हा ओघ कोण थांबवू शकेल? मानवप्रगतीचा रथ मग अधिकच वेगाने चालू लागेल असे म्हणतात.

अगदी बुलेट ट्रेन! थांबवा जमेल तर. लावा सारे पुण्य पणाला. होऊ द्या मंत्रोच्चार. करा गजर हरीनामाचा.

ठलविट् ठलविट् ठलविट् ........

न्यानविद् न्यानविद् न्यानविद् .......

१४-७-२०१६
____________________


बोक्कामुच्चु


काही व्यक्ती इतिहास घडवतात पण त्याची पद्धतशीर नोंद होत नाही. कारण ते इतिहास घडवत असतांना 'आम्ही घडवतो, घडवतो' असा घोष करायला विसरतात. बरे, त्यांना काही विचारावे तर ते काहीही बोलत नाहीत. काही सांगावे तर ऐकतात की नाही ते नक्की सांगता येत नाही. तास अन् तास त्यांच्यासमोर हात जोडून त्यांच्या विनवण्या केल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित न हास्यात बदलते न रागात. ते तसेचे तसेच राहते. म्हणू नये, पण नाकावरची माशी उडत नाही असे त्यांचे बाह्यदर्शनी व्यक्तिमत्त्व. मग कोण आणि कशी त्यांची दखल घेणार? असेच एक व्यक्तिमत्व होते श्री बोक्कामुच्चु. आजही त्यांचा जन्म कधी झाला, त्यांची जन्मदात्री कोण, जन्मदाता कोण, ते जन्मल्यावर रडले की त्यांना पाहून बाकी लोक रडले, त्यांचा टाळू टणक होता की लपलप करत होता, टाळूवर तिळाचे तेल लावले की खोबऱ्याचे, त्यांना शांत लागली की नाही, ते पालथे कधी पडले, त्यांना पहिला दात कधी आला, त्याचा त्यांना कशाप्रकारे त्रास झाला, दुपटे किती रंगाचे होते, किती दुपटे होते, इत्यादी इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर फारशी विश्वसनीय माहिती नाही. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 'बोक्कामुच्चु जन्म व जीवन संशोधन संस्था' स्थापन करण्यात आली. आज या संस्थेच्या जगभर शाखा आहेत. संस्था अधून मधून आपले संशोधन प्रबंध सादर करीत असते. जागतिक, खरे म्हणजे वैश्विक, इतिहासावर व त्याच्या घडणीवर श्री बोक्कामुच्चु यांची जी अमीट छाप पडली होती, आहे व राहणार आहे तिचा एक एक पदर आता उलगडायला लागला आहे. आणि एका अतुलनीय व्यक्तिमत्त्वाशी आपली थोडीफार का होईना, ओळख होते आहे. बोक्कामुच्चु यांचे चरित्र सामान्यापर्यंत पोहोचवायचे महान कार्य बरेच जण करीत आहेत. आपणही असेच काही जाडजूड क्लिष्ट दीर्घप्रबंध सोप्या भाषेत हलके फुलके लघुनिबंध म्हणून येथे सादर करणार आहोत. बोक्कामुच्चूंची ओळख जोवर आपल्याला होत नाही तोवर आपलीच ओळख आपल्यालाच झाली नाही असे म्हणावे लागेल. तशी ओळख व्हावी म्हणून हा प्रयास.

आगामी १४ जुलैला आपण ही निबंधमालिका सुरू करणार आहोत. तो दिवस आहेच तसा नवीन कार्य हाती घेण्याला शुभ. या प्रकल्पाची घोषणा आपण आज, म्हणजे ७ जुलैला करीत आहोत कारण आजचा दिवसही काही असा तसा नाही. हे दोन दिवस म्हणजे दोन सुशिक्षित स्वशिक्षित स्वपराक्रमी स्वयंपूर्ण व्यक्तींचे जन्मदिवस. दोन सुमुहूर्तावर पाय रोवून उभा झालेला हा प्रकल्प तडीस जाईल असे वाटते.

बोक्कामुच्चु हे इतके अवर्णनीय प्रकरण आहे की हजारो निबंध लिहिले तरी ते मुठीत येणार नाही. ते खरोखरच निर्गुण निराकार आहेत असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. पण म्हणून काय झाले? जितके समजतील, जितके उमजतील तितके आपण त्यांना जाणून घेऊ या.

बोक्कामुच्चु होउनि गेले चरित्र त्यांचे पहा जरा ।
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा ।।

७-७-२०१६
_____________________


स्मरणिका

बालवेद

सदाशिव साहित्य