५
वाग्देवी
युगे आली, युगे गेली, पण एक गोष्ट बदलली नाही. कावळ्याला काऽऽव काऽऽव सोडून नवीन काही उच्चारता आले नाही. Vocal cords वापरून आवाज त्याला काढता येतो, पण त्या आवाजांचे शब्द झाले नाहीत. तसेच चिमणीचे, मांजरीचे, कुत्र्याचे, गाईचे, म्हशीचे. आवाज करता येतो, पण म्हणून भाषा आहे असे नाही. आवाज काय, सायकलच्या घंटीचा येतो, चमचा पडला तर येतो, caller tune चा येतो, कप फुटला तर येतो, घोरण्याचा येतो. ही आवाजांची दुनिया आहे. Ding-Dong, Pooh-Pooh, Bow-Wow, Ta-Ta, La-La, Yo-he-Yo, असंख्य आवाज येतच असतात. पण तो फारच फार तर noise, कल्ला, गोंगाट म्हणता येईल. अर्थवाहक शब्द नव्हे.
पण आपले तसे नाही. आपला आवाज नुसता आवाज नाही. आपल्या कण्ठ्य, दंत्य, ओष्ठ्य आवाजांना, उच्चारांना ठराविक अर्थ आहे. खरे म्हणजे आपण काही जन्मत:च भाषा घेऊन येत नाही. रडणे सोडून आपल्याही नरड्यातून दुसरा आवाज निघत नाही. पण नंतर मम्मम् म्हणता येते, बब्बा म्हणता येते आणि आपण बोलू लागतो. कारण आपल्या कानावर वेगवेगळे आवाज येतात. भोवतालच्या मोठ्यांच्या बोलण्याचे आवाज येतात. त्या आवाजांची आपण त्या त्या वेळच्या परिस्थितीशी सांगड घालतो आणि तोच आवाज त्याच परिस्थितीत वरचेवर ऐकला की त्याला एक अर्थ चिकटतो. तो शब्द होतो. असे अनेक शब्द संगळत गेले की भाषा समजू लागते. बोलता येऊ लागते. आपणही शब्दांना शब्द जोडून नवे शब्द तयार करू शकतो. एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात आणि एकाच शब्दाला अनेक अर्थ असू शकतात हे कळायला लागते. क म्हणजेही तोच आणि चाणूरान्ध्रनिषूदनही तोच हे कळू लागते. कारण दोन्हीही विष्णूचीच नावे. पाहता पाहता त्या एकाच व्यक्तीला आणखी ९९८ नावे आहेत हे कळते. खूपच कुशाग्र बुद्धी असेल तर विष्णुसहस्रनाम मुखोद्गतही होते. त्याचे मग कौतुकही होते. सहस्र नामे एकट्या विष्णूला आहेत तर भाषेचा आवाका किती अवाढव्य असला पाहिजे हे कळू लागते. हे सारेच इतके सहजासहजी होते की आपण या अद्भुत प्रक्रियेकडे फारसे लक्ष देत नाही. We take it for granted. पण भाषा हे जगातले सर्वात मोठे आश्चर्य आहे.
कावळा जर काव काव शिवाय त्याच्या आईवडिलांकडून, आप्तेष्टांकडून, नातेवाईकांकडून, मित्रमंडळीकडून काही दुसरे जन्मभर ऐकतच नाही तर तो दुसरे काही शिकणार कसे? पण एखादे कावळ्याचे अनाथ पिल्लू दत्तक घेतले व त्याला आपण आपलाच बंडू समजून लहानाचे मोठे केले तर त्याला आपली भाषा येईल का? तो मराठी बोलायला शिकेल का? किंवा कावळा सोडा, एखादा चिंपांझी आणला व त्याला माणसातच लहानाचे मोठे केले तर त्याला भाषा येईल का? चिंपांझी तर जवळ जवळ आपल्या सारखाच. नाकी डोळी नीटस. हा कावळा, हा चिंपांझी भाषा शिकेल की नाही देवच जाणे.
आपण ऐकतो म्हणून भाषा शिकतो हे तरी खरे आहे का? खरे म्हणजे नाही. जन्मत:च मूल मूक बधिर असले तरी ते भाषा शिकतेच शिकते. ऐकता बोलता आले नाही तरी वाचायला लिहायला शिकतेच शिकते. शिकवायची पद्धत बदलते एवढेच.
मोठेपणी आपण मातृभाषा सोडून इतरही भाषा शिकतो. पण मूल लहानपणीच समजा हारवले व भिन्न भाषिकांमध्ये मोठे झाले तर तेही त्यांची भाषा शिकते. कोणीच डोक्यात आपल्या मातृभाषेचा SIM घेऊन जन्माला येत नाही. भाषा ही जन्मदत्त नाही. ती born skill नसून acquired skill आहे. पण acquisition शक्य आहे कारण भाषा आहे. जन्मत:च आपल्याजवळ नसली तरी ती सभोवताल असते. म्हणजेच आपल्याला भाषा येते कारण भाषा असते. भाषा आहे म्हणून ती आपण शिकतो. मग ती कुठलीही भाषा असो.
भाषा आहे म्हणून आपण बोलायला शिकतो. आपण बोलतो म्हणून आपली मुले भाषा शिकतात. अंडे आहे म्हणून कोंबडी निघते. कोंबडी आहे म्हणून अंडी देते. ही शृंखला सुरू राहते. पण मग अगदी सुरुवातीला भाषा कशी आली? मानव भाषा कशी शिकला? भाषेचा जन्म कसा झाला? Chicken first or egg first सारखाच हा गहन प्रश्न आहे.
मानव तर इतर प्राण्यांसारखाच चतुष्पाद प्राणी होता. भ्यँभ्यँ करीत होता. त्या भ्यँभ्यँची भाषा कशी झाली? कोण तो बोक्कामुच्चु ज्याने भाषा निर्माण केली व आदिमानवाला किंवा आद्यादिमानवाला, किंवा आद्याद्यादिमानवाला, किंवा आद्याद्याद्याद्या...द्याद्यादि
असा पुकारा केला तर तो समोर येईल का? नाही. नक्कीच येणार नाही. तोच तर प्राॅब्लेम आहे या बोक्कामुच्चूंचा. करून सवरून वेगळे. पण कधीही आपण होऊन समोर येणार नाहीत. कधीही 'हो, मीच तो' किंवा 'तो मी नव्हेच' असे म्हणणार नाहीत. हे बोक्कामुच्चु म्हणजे अगदी बोक्कामुच्चु असतात.
प्रत्येक गोष्टीत कोण तो बोक्कामुच्चु हे शोधण्यातच मानव जातीच्या हजारो पिढ्या खपतात. असे संशोधनच ज्ञानरथाला पुढे घेऊन जातात. भाषेमुळे मानव प्रगती करतो यात आता कुणालाही संशय नाही. भाषा नसती तर आपणही इतर प्राण्यांसारखेच असतो. भाषेविना विचार नाही. भाषेविना मानव फारसा पुढे जाऊ शकला नसता. त्यामुळे मुळात भाषा कशी आली हे समजण्यात त्याला नक्कीच स्वारस्य होते व आहे. कशी आली भाषा? कोणी दिली भाषा? कोण तो बोक्कामुच्चु?
नेहमीप्रमाणे हा बोक्कामुच्चु देवच आहे, किंवा देवीच आहे इथूनच सुरुवात होते. देवच तो बोक्कामुच्चु असे प्राचीन ग्रंथ सांगतात. ते मग अमुक धर्माचे असोत वा तमुक धर्माचे, अमुक देशाचे वा तमुक देशाचे. आपल्याकरिता आपला देव आपल्या भाषेचा जनक. त्यांच्याकरिता त्यांचा देव. पण शेवटी देवच. He is the usual suspect. देवानेच भाषा निर्माण केली. कमीतकमी, मूळ भाषा, देवभाषा, म्हणजे संस्कृत तरी त्यानेच निर्माण केली. भाषेचा पहिला कंद त्यानेच आपल्या लाडक्या मानवाला दिला. तो देतांना देव 'घेई कंद, मकरंद' असे गाणे घोळवून घोळवून म्हणाला असेल असे उगाचच वाटते. असो.
तो जुना scene, ते देवाचे मानवाला स्टेजवर बोलावून भाषादान देणे आपण आता पाहू शकत नाही. फक्त कल्पना करू शकतो. हे कसे झाले असेल, ते कोणी केले असेल, ह्या सर्व 'कल्पना करा' सदरातल्या गोष्टी. ही कल्पनाच मानव सतत करीत असतो व नवे नवे सिद्धांत मांडून ते परखून पाहत असतो. Null hypothesis मांडणे व तो तर्क करून सत्य वा असत्य सिद्ध करणे हाच त्याच्या संशोधनाचा मार्ग असतो. 'देवानी केले' हा null hypothesis हा जवळजवळ नेहमीच सुरुवातीचा default guess, म्हणजे मानक असतो. असे असले की तो सिद्ध करण्याची बऱ्याच विद्वानांना गरज वाटत नाही. It is obviously true असे त्यांचे भाविक मन त्यांना सांगते. ते मग श्रद्धापूर्वक हात जोडतात व पुढे जातात. पुढच्यालाही ते तेच सांगत सुटतात. पाहता पाहता हा null hypotheses पुराव्याशिवायच सिद्ध झाला असे मानणाऱ्यांची संख्या वाढते. असे लोक मग बहुमतात येतात. बहुमताचा आतंकवाद मग मनात किंतु परंतु असणाऱ्या उरलेल्या लोकांनाही 'हो, देवच तो' असे म्हणायला प्रवृत्त करतो. आणि पाहता पाहता भाषा ही देवदत्त आहे अशी धारणा रूढ होते.
काहीही का असेना. कुणीही का देवो ना, पण भाषा म्हणजे अगदी भाषाच असते हं! तिचे महत्त्व कोणी नाकारत नाही. नाकारूही नये. तुकाराम महाराजांचा हा अभंग तर भाषेनेच भाषेचे गुण गातो.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ।
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन ।
शब्द वाटे धन जनलोका ।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देचि गौरव पूजा करु ।।
भाषाभिमान, त्यातल्या त्यात मातृभाषाभिमान ही माणसाची फार नाजुक नस असते. जरा दबली की आत्यंतिक वेदना देते. म्हणूनही भाषेचा जन्म, भाषेची उत्पत्ती जाणून घ्यायचीही त्याला प्राचीन काळापासूनच ओढ आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये म्हणूनच मानवाला भाषा कशी मिळाली, कुणी व कशी दिली यावर विपुल भाष्य आहे.
आपल्या पौराणिक ग्रंथांत तर भाषेविषयी बऱ्याच कथा आहेत. काही एकच वर्णन असणे तसेही आपल्याकरिता कठिणच आहे. अगदी वेद, उपनिषद सोडून दिले, सोप्या पुराणातच भाषेच्या उत्पत्तीवर काही वा़चले तरी अनेक गोष्टी सापडतील. अठरा महापुराणे, अठरा उपपुराणे उगाचच का आहेत? पुराणे म्हणजे वेदातले ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून 'सोप्पे' करून कथारूपात सांगितले आहे असे म्हणतात. आजच्याच संदर्भात सांगायचे म्हणजे 'Ved for Dummies' असेच पुराणांचे वर्णन करावे लागेल.
ब्रह्मदेवाने चार मुखांनी चार वेद मानवांकरिता प्रसवले यात काही संशय नाही. ते संस्कृतमधे आहेत हेही आपण जाणतोच. ते वेद मानवी संस्कृतीकरिता इतके महत्त्वाचे की समाजकंटकांकडून ते चोरीला जाण्याची दाट शक्यता. जुना काळ. जुना काय, अतिप्राचीन काळ. बॅकअप वगैरे घेऊन ठेवण्याची सोय नाही. ब्रह्मदेवाच्या डोक्यातच ते चारही वेद साठवलेले. शेवटी व्हायचे ते झालेच. ब्रह्मदेव झोपला असतांना त्याच्या नाकातून डोक्यात शिरून हयग्रीव नावाच्या दैत्याने ते वेद चोरलेच. आणि थेट क्षीरसागराच्या तळाशी एका कोपऱ्यात लपून बसला. ब्रह्मदेवाला काही खबर नाही कारण तो दोन मन्वंतराच्या मधल्या संधिकाळात थकून भागून गाढ ढाराढूर झोपलेला. सहावे मन्वंतर संपलेले. सध्याच्या मनूचे, म्हणजे वैवस्वताचे मन्वंतर सुरू व्हायला थोडाच अवकाश.
सारी चिंता क्षीरसागरातच शेषावर पहुडलेल्या विष्णूला. नवे मन्वंतर सुरू होणार. वैवस्वत मनू takeover करण्यासाठी अगदी तयार. सर्वत्र प्रलयाचे साम्राज्य. पण वेदांशिवाय नवीन मन्वंतरात जाण्यात अर्थ तरी तो काय? ब्राह्मण, गाय, तुळस, थोडे धान्यांकुर पुढच्या मन्वंतरात कसेबसे नावेत घालून नेले तर प्रलय ओसरल्यावर नवी सृष्टी तर निर्माण होईल. पण तिचा काय उपयोग? वेदांशिवाय नवी ब्राह्मण प्रजा करणार तरी काय? शेवटी विष्णूला मत्स्यावतार घेऊन, क्षीरसागराच्या तळाशी जाऊन, हयग्रीवाला पराजित करून वेद पुन्हा वर आणावे लागले व नावेत ठेवावे लागले. ब्राह्मण, गाय, तुळस, धान्यांकुर व वेदाने भरलेली नाव मग विष्णूच्या मत्स्यरूपाने भवसागर पार करून नेली व नवे मन्वंतर सुरू झाले. विश्वावर आलेले आधान टळले. आजही ही कथा भागवत सप्ताहात ऐकतांना अंगावर रोंगटे येतात. रोंगटे येतात कारण अंग आहे. अंग आहे कारण आपण आहोत. आपण आहोत कारण वैवस्वत आहे. वैवस्वत आहे कारण सातवे मन्वंतर आहे. सातवे मन्वंतर आहे कारण नाव भवसागर पार करून वेद घेऊन आली आहे. वेद आहेत कारण ..... वेद आहेत कारण ..... वेद आहेत कारण ...
वेद आहेत कारण ब्रह्मदेव आहे. त्यानेच ते प्रसवले होते. ही गोष्ट इथे थोडक्यात सांगावी लागली कारण आपला मूळ विषय दुसरा आहे. सविस्तर गोष्टीसाठी लिंक अशी आहे.
http://goshtasangu.blogspot.
तर, वेद आहेत म्हणून आपली संस्कृती आहे. चार वेद ब्रह्मदेवाच्या चार तोंडातून निघाले. ते ब्रह्मदत्त आहेत. ब्रह्ममुखस्राव्य आहेत. मान्य. पण वेद निघायला भाषा हवी. म्हणजेच भाषा वेदपूर्व असायला हवी. ती कोणी दिली? तो बोक्कामुच्चु आपल्याला हवा आहे.
पण तो नाही. खरे म्हणजे ती आहे. ती बोक्कामुच्चु वाक् नावाची देवी होती. ती स्वत: ब्रह्मनिर्मितच होती. तिने भाषा निर्माण केली. किंवा तीच भाषेचे मूर्तस्वरूप. तीच वाणी, किंवा तीच वाणीची देवता. तीच वाग्देवी. तीच वागीश्वरी. तीच वाक्या. तीच सरस्वती. ॐ सरस्वत्यै नम:
सरस्वती हीच बोक्कामुच्चु. विद्या, वाणी, कला, भाषा यांची तीच अधिष्ठात्री देवी. वसंत पंचमीचा तिचा जन्म. म्हणून लहान मुलांना शब्दज्ञान द्यायचा शुभारंभ माघ शुक्ल पंचमीला, वसंत पंचमीला करावा असे म्हणतात.
ज्ञान, विद्या, कला यांच्याकरिता गणपती, शारदा यांसारख्या स्पेशल देवता असणारी आपली बहुधा एकमेव संस्कृती असावी. किती सुंदर कल्पना! आस्तिक असो वा नास्तिक. त्या दोन मूर्ती पाहून मनोमन ज्ञानाविषयी आपली आस्था पुन्हा दृढ होते. कमीतकमी व्हायला तरी हवी. त्यांचीच पूजा करायची व ज्ञानाकडे पाठ फिरवून अंधविश्वास, अज्ञान यांना कवटाळायचे हा व्यभिचार नव्हे का? असो.
सरस्वती ही त्या दृष्टीने ब्रह्मदेवाची मुलगी. भाषा, वाणी ही त्याची पुत्री. पण भाषेवर त्याचे प्रेम जडले. त्याशिवाय का वेदनिर्मिती होणार? ही साहित्यनिर्मिती करण्याकरिता ब्रह्माला भाषाप्रभू व्हावे लागले. भाषास्वामी व्हावे लागले. भाषेचा, वाणीचा स्वामी होणे हे वेदनिर्मितीकरिता आवश्यक होते. म्हणून सरस्वती प्रजापतीची सहचारिणी होती असाही प्राचीन साहित्यात उल्लेख आढळतो. शब्दश: अर्थ घ्यायचा की पौराणिक कथांमधील रूपकांना रूपक मानून अर्थ तेवढा टिपायचा याची निवड वाचणाऱ्यांना करावयाची आहे. असो. पण सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी की पत्नी असा प्रश्न आध्यात्माच्या परीक्षेत आला तर choice मधे तो सोडून देणेच योग्य ठरेल. असो.
भाषा आपल्याला जशी देवदत्त, तशीच इतरांनाही. वेगवेगळ्या देवांच्या लेकरांना त्या काळी हे माहीत नव्हते की इतरही देव आहेत आणि त्यांनाही लेकरे आहेत. त्यांना हे माहीत नव्हते की एकच सृष्टी वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांकरिता त्यांच्या त्यांच्या देवांनी निर्माण केलेली आहे. त्यांना याचीही जाणीव नव्हती की त्यांना भाषाही त्यांच्या त्यांच्या देवांनीच दिली. पण जसा जसा काळ पुढे गेला, माणसाला चाके फुटली, पंख फुटले, तसे तसे जगात इतरही अनेक भाषा आहेत हे निदर्शनास आले. अभ्यास करणाऱ्यांच्या लक्षात आले की प्रत्येक धर्मात अनेक भाषा कां आहेत त्याचेही कारण विवरणपूर्वक सांगण्यात आले आहे.
आपलेच सांगायचे झाले तर जगात अनेक भाषा, अनेक संस्कृती कां आहेत त्याची एक मजेदार गोष्ट आहे. पृथ्वीच्या मध्यभागी, म्हणजे जंबुद्वीपाच्या सुपीक जमिनीत एक वृक्ष आपण होऊनच वाढायला लागला. कल्पवृक्ष म्हणा, ज्ञानवृक्ष म्हणा, विश्ववृक्ष म्हणा. या वृक्षाखाली बसून काहीही मागितले की ते प्राप्त होत असे. पाहता पाहता वृक्ष ढगांपेक्षाही उंच गेला. आता वृक्षाने स्वत:च ठरविले की तो अधिकच उंच वाढेल व स्वर्गाला टेकेल. तो इतका उंच व विशाल होईल की त्याची छाया सर्वांनाच मिळेल व सर्व मानवजात त्या वृक्षाखालीच आनंदाने राहील.
थेट आपल्या स्वर्गाला जंबुद्वीपावरील वृक्ष पोहोचलेला पाहून ब्रह्मदेवाला राग आला. कोणालाही येईल. वृक्षाचा हा गर्व ब्रह्माजीला सहन झाला नाही. त्याने मग त्या वृक्षाच्या फांद्या रागारागाने तोडून पृथ्वीवर चौफेर फेकून दिल्या. त्या जिथे जिथे पडल्या तिथे तिथे फांद्यांचे मोठमोठे वटवृक्ष झाले. वेगवेगळ्या जमाती पृथ्वीवर वेगवेगळ्या भूखंडांवर विखुरल्या गेल्या व वेगवेगळ्या भाषा बोलू लागल्या. पण मुळात ती सारी आपल्या ब्रह्मदेवाचीच लेकरे. छान!
भाषा जर देवनिर्मित आहे तर मग जगात अनेक भाषा कां असा प्रश्न काही खवचट चार्वाक विचारीत असत. त्याचे सडेतोड, पिच्छासोड उत्तर या पौराणिक कथेत आहे. आता घ्या म्हणावे. असो.
ईसाई लोक पण, म्हणावी तर वेगळी, म्हणावी तर बरीचशी मिळती जुळती गोष्ट सांगतात. बायबलात ती गोष्ट आहे. एका प्रलयानंतर फक्त काही लोकच जिवंत राहिले. त्यांच्या नंतरच्या पिढ्या शिनार नावाच्या टापूवर वाढल्या. सर्व एकच भाषा बोलत असत. त्यांच्या God ने त्यांना दिलेली भाषा. त्या शिनारवासी लोकांना एकदा काय सुचले कोणास ठाऊक. पण त्यांनी उंचच उंच मिनार बांधायला सुरुवात केली. तो इतका उंच बांधायचा की तो heaven पर्यंत पोहोचायला हवा. आणि तसेच झाले. मिनार जवळ जवळ स्वर्गाला टेकू लागला. God ला आला राग. त्याने ठरवले की असे काही करायचे की संगनमताने हा मिनार बांधणाऱ्या या सर्वांना एकमेकाशी communication करताच येणार नाही. God ने त्यांची भाषाच रातोरात वेगवेगळी करून टाकली व त्यांना भाषेनुसार जगभर वेगवेगळ्या खंडात विखरून टाकले. हे ही छान.
त्यांच्या धर्मग्रंथात ही कथा आहे, म्हणजे सत्य असलीच पाहिजे. Genesis मध्ये असलेली ही Tower of Babel ची कथा वाचायला छान आहे. वाचायला हरकत तरी काय आहे? आपण त्या God चे नसलो तरी कदाचित थोडे तरी पुण्य मिळेल.
And they said, let us build us a city and a tower, whose top may reach unto heaven; and let us make us a name, lest we be scattered abroad upon the face of the whole earth. And the Lord came down to see the city and the tower, which the children of men built. And the Lord said, Behold, the people is one, and they have all one language; and this they begin to do: and now nothing will be restrained from them, which they have imagined to do. Let us go down, and there confound their language, that they may not understand one another’s speech. So the Lord scattered them abroad from thence upon the face of all the earth: and they left off to build the city. Therefore is the name of it called Babel; because the Lord did there confound the language of all the earth: and from thence did the Lord scatter them abroad upon the face of all the earth (Genesis 11:4-9).
आधी सर्व लोक एकत्रच राहत होते व त्यांची भाषाही एकच होती. पण मग काही कारणाने त्या त्या देवाला राग आला व त्याने शिक्षा म्हणून त्यांना जगात वेगवेगळ्या ठिकाणी पसरवून त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या करून टाकल्या असा अनेक प्राचीन कथांचा मसुदा आहे.
काही कथा जरा वेगळ्या आहेत. भाषा अनेक असण्यात दुष्प्रवृत्त व्यक्तींचा, दैत्यांचा म्हणा वाटल्यास, हात आहे असे या गोष्टी सांगतात.
ग्रीसमध्येही अशीच एक कथा आहे. Zeus, त्यांचा ब्रह्मदेव, खूप खूश होता की सारे लोक त्याने प्रदान केलेली एकच भाषा बोलतात. पण Hermes नावाच्या दुष्टप्रवृत्ती जादुगाराने चकमा देऊन मुद्दामून लोकांच्या जीभेवर वेगवेगळ्या भाषा भरल्या व त्यांच्यातील संवादात बाधा निर्माण केली. देवनिर्मित सुरळीत चालणारी सृष्टी काही दुष्प्रवृत्तीच्या लोकांना पाहवत नाही व ते असे काहीतरी कृत्य करून कलहाची पेरणी करतात. मानवा मानवात फूट पाडतात. काय करावे?
आॅस्ट्रेलियाच्या जनजातींमध्येही भाषेबद्दल व बहुभाषेबद्दल लोककथा आहे. या गोष्टी प्रमाणे भाषा अजून आली नव्हती. प्राचीन काळी लोक शेकोट्या पेटवून त्याच्या भोवती घोळक्या घोळक्याने बसत. वारुरी नावाची एक चेटकीण हातात काठी घेऊन शेकोट्या विझवत विझवत जात असे. पण तिला काही म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. म्हणणे शक्य नव्हते कारण भाषाच नव्हती. एके दिवशी वारुरी मेली. तिचा विशाल देह जमिनीवर पडलेला पाहून लोक खुष झाले. लोकांचा एक घोळका आला व त्यांनी तिचे तोंड खायला सुरुवात केली. तसे करताच त्यांना अर्थपूर्ण असे शब्द उच्चारता आले. तीच त्यांची भाषा झाली. दुसरा घोळका आला व त्यांनी तिचे पोट फाडून आतडे खायला सुरुवात केली. लगेच ते सर्व एका वेगळ्याच भाषेत एकमेकाशी बोलू लागले. आणखी एका घोळक्याने वारुरीचे उरलेले शरीर खाल्ले व ते आणखी एक वेगळीच भाषा बोलू लागले. भाषेची उत्पत्ती व विविधता या दोन्हींना अशा तऱ्हेने वारुरी नावाची चेटकीण कारण आहे. छान!
अनेक कथा. कधी आकाशातल्या पक्षांनी भाषा दिली. कुठे एकच देव वेगवेगळ्या पुत्रांना वेगवेगळी भाषा देतो. कुठे दुष्काळानंतर अगदी मेटाकुटीस आलेले तिघे अचानकच रागारागाने काहीतरी वेगळेच बडबडायला सुरुवात करतात व तीन दिशांनी निघून जातात. त्यांच्याच पिढ्या मग जगात वेगवेगळ्या ठिकाणी वसतात व वेगवेगळी भाषा बोलतात.
भाषेची उत्पत्ती व विविधता यावर जितक्या भाषा तितक्या गोष्टी. वर फक्त सँपल दिले. पण एकंदरीत देवच बोक्कामुच्चु असून त्यानेच आपल्याला प्रेमाने भाषेचे दान दिले, त्यानेच रागाने एकच नाही तर अनेक भाषा निर्माण केल्या. तीच भाषा त्याच भाषेवर हे व असे भाष्य करावयास व वाचकांना वाचावयास कामी आली. उद्धवा, अजब तुझे सरकार रे बाबा! असो.
So far, so good. पण त्यांना हे आवडले नाही. त्यांना म्हणजे चार्वाकांना. त्यांचे विनाकारण नाव घेऊ नये म्हणतात. त्यांना माज चढतो. Harry Potter ह्या जगप्रसिद्ध पौराणिक सत्यकथेत डंबलडोर ह्या देवगण असलेल्या व व्होल्डेमार्ट ह्या राक्षसगण असलेल्या दोन महान जादुगारांमध्ये नेहमी शह-प्रतिशह सुरू असतात. त्यात हा राक्षसगणी व्होल्डेमार्ट इतका जहाल की त्याचे नावही कोणीही कोठेही उच्चारले की त्याला ते लगेच कळते. त्यामुळे त्याचा उल्लेख नेहमी नामविरहित करायचा असा अलिखित नियम डंबलडोरच्या भक्तांचा असतो. ते नेहमी 'त्या'चा (म्हणजे व्होल्डेमार्टचा) उल्लेखच 'one who ought not be named' असाच करतात. कधी कधी असे वाटते की आपणही चार्वाक नावाचा उल्लेखही करू नये व त्याला किंवा तत्सम लोकांनाही नुसते 'तो' किंवा 'ते' म्हणावे. अनुल्लेख हीच त्यांची शिक्षा. कशी वाटली idea?
तर 'त्यांना' भाषेचा हा उगम काही पटत नाही. 'त्यांना' या सर्व भाकडकथा वाटतात. आणि 'ते' भाषामूळ शोधण्यासाठी सतत संशोधन करीत असतात. पण हे संशोधन कठिणच नाही तर अशक्य आहे. अगदी डाॅन सारखे. डाॅन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकीन है ।
संशोधन कठिण असण्याचे कारण मात्र सबळ आहे. भाषा तोंडी आणि लिखित रूपात प्रकटते. शब्दांना उच्चार असतात आणि आकारही. उच्चार फार आधी आले हे स्वाभाविक आहे. बोलीभाषा आधी आली. अक्षरांना आकार त्या मानाने फार नंतर आला. अगदी लहान मूल बोलते आधी, लिहिते बरेच नंतर, तसेच. लिखित रूपात भाषा फार नंतर आली असावी यावर एकमत आहे. पुराणातलाच दाखला द्यायचा तर ब्रह्मदेवाने चार वेद आपल्या चार तोंडातून प्रसवले. आसमंतात ते आवाजरूपाने भरले. म्हणजे तेव्हा भाषेला लेखी रूप यायचे होते. पण फार नंतर व्यासांनी महाभारत प्रसवतांना चक्क लेखणिक एंप्लाॅय करून त्याला डिक्टेशन दिले. तोच तो बुद्धिदाता गणपती. चार्वाकांचे मुख्य संशोधन भाषा आवाज स्वरूपात कशी व कधी आली असावी याचा वेध घेण्याकरिता आहे. लिखित स्वरूपात ती कधी आली हे संशोधन तसे सोपे आहे कारण उत्खननात शीलालेख वगैरे सापडतात. पण मोहेंजो दारोच्या उत्खननात त्या काळचे कोंडलेले आवाज सापडतील का? भिंतीला असलेले कान सापडतील एक वेळ, पण त्या कानात शिरलेले आवाज काळाच्या पोटात गडपच नाही, तर नष्ट झाले. ध्वनिलहरी पार विरून गेल्या.
आपला आवाज, आपली भाषा हा आपल्या प्रगतीचा एक मोठा हिस्सा आहे. एक वेळ जीवनिर्मिती कशी झाली व केव्हा झाली हे कळू शकते कारण त्याचे अवशेष शोधले तर काही रूपात सापडतील. डायनाॅसर होते हा शोध तसाच तर लागला. त्याही आधी जीव होते हे दगडांमध्ये अॅमिनो अॅसिड्स किंवा त्यांचे घटक सापडले यावरून सिद्ध झाले. म्हणूनच वैज्ञानिकांना आपले पूर्वज, Homosapiens, मनुष्यसदृश जीव जवळजवळ दोन अडीच लाख वर्षांपूर्वी होते हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता आले. ते आता आपण आहोत इतके प्रगल्भ नसतील, पण होते. पण ते बोलत होते का हे सांगणे कठिण आहे. कारण आवाज fossilize होत नाही. आवाज आपला मागमूस सोडत नाही. उष्णता आपला मागमूस सोडते. लाकडाचा दगडी कोळसा होतो. प्रकाश सुद्धा आपला ठसा सोडतो. हिरोशिमाच्या आण्विक स्फोटाचे वेळी पडलेला प्रकाश इतका काही प्रखर होता की त्यामुळे पडलेल्या सावल्या तिथल्या वास्तूंवर कायम कोरल्या गेल्या. पण आवाज? एकदा गेला की गेला. आणि त्यामुळेच भाषेचा उगम कधी झाला हे शोधणे जवळ जवळ नामुमकिन. 'त्यांना' (म्हणजे चार्वाकांना) सुद्धा हात टेकावे लागतील असा हा संशोधनाचा विषय.
मजेची गोष्ट अशी की 'त्यांना' 'हात टेका' असा वरून आदेश आला. असे संशोधनाच्या इतिहासात हे बहुधा एकमेव उदाहरण आहे की ज्यात संशोधनातून जे काही निघाले ते इतके भुसभुशीत व अविश्वसनीय होते की त्या विषयावरील संशोधनावरच, चर्चेवरच बंदी आली.
पण तोवर जे संशोधन झाले त्यात भाषेच्या उत्पत्तीच्या सहा theories, hypotheses, सिद्धांत पुढे आले होते. त्यांची नावे सुद्धा मजेशीर आहेत. नावांवरूनच संशोधक सुद्धा स्वत:च्याच निष्कर्षाला किती कमी लेखत असावेत हे लक्षात येते. पण खरे म्हणजे तसे नाही. भाषेची उत्पत्ती हा संशोधनाकरिता खूप कठिण विषय आहे. त्या दृष्टीने या सिद्धांतांकडे पाहायला हवे.
पहिला सिद्धांत Ding-Dong theory म्हणून प्रसिद्ध आहे. शब्द कसे तयार झाले असावेत याबद्दल हा कयास आहे. onomatopoeia हे शब्दनिर्मितीचे कारण आहे असे ही theory सांगते. ओनोमॅटोपिया असा उच्चार असणारा हा शब्द. मराठीत याचा अर्थ ध्वनिअनुकरणात्मक असा देता येईल. शब्द त्या त्या गोष्टीच्या आवाजावरून आले असे ही theory सांगते. काव काव करतो म्हणून कावळा. घण घण वाजते म्हणून घंटा. घर्र घर्र आवाज येतो म्हणून घोरणे, वगैरे वगैरे. शोधले तर ओनोमॅटोपिया हे बऱ्याच शब्दांचे मूळ आहे हे लक्षात येईल. ढगांचा गडगडाट, टाळ्यांचा कडकडाट, पंखांचा फडफडाट, जात्याची घरघर हेही त्याच श्रेणीतले शब्द. पण कित्येक गोष्टींना आवाज नाही. पर्वत शब्द कसा आला? पर्वत काही पर्र पर्र आवाज करीत नाही. त्यामुळे शब्द, व म्हणून भाषा निर्माणाची Ding-Dong theory फारशी पुढे गेली नाही.
भाषा निर्मितीच्या Pooh-Pooh सिद्धांताप्रमाणे शब्द वेदना व इतर emotions मुळे निघणाऱ्या सहज आवाजांवरून तयार झाले. जसे हा हा हा पासून हासणे. तसेच हुंदके, हुंकार. शिंकणे, गुरकावणे वगैरे. आधीच्या सिद्धांताप्रमाणेच, याही सिद्धांताने काही टक्के शब्दांचे मूळ कळू शकते पण सर्व शब्दांचे नाही.
Bow-Wow सिद्धांताप्रमाणे मानवी भाषेतले शब्द प्राण्यांच्या आवाजाची नक्कल केल्यामुळे निर्माण झाले. घोड्याचे खिंकाळणे, गाईचे हंबरणे, सिंहाची गर्जना (गर्रजना) वगैरे उदाहरणे देता येतील. पण एकूणच ह्या सिद्धांताला फारशी मान्यता नाही.
Ta-Ta सिद्धांताप्रमाणे शरीराची व खास करून हाताची विशिष्ट हालचाल करून आदिमानव संवाद करीत. त्या हालचालींना, त्या gestures ना पूरक आवाजच पुढे जाऊन शब्द झाले. डार्विनचा या सिद्धांतावर बऱ्यापैकी विश्वास होता असे म्हणतात. एखादी गोष्ट पटली तर मान हालवून आपण दुजोरा देतो. पूजेत वगैरे असलो की हातवारे करून आपण बरेच कारभार करतो. मानेनेच होकार देतो, मानेनेच नकार. मान हालवतो म्हणून मान्यता शब्द आला असावा असे हा सिद्धांत सुचवतो. इंग्रजी, ग्रीक भाषात या सिद्धांताला पोषक असे बरेच शब्द आहेत. मराठीत मात्र शोधावेच लागतील.
La-La सिद्धांताप्रमाणे शब्द खेळकर मूडमध्ये, प्रेम प्रकटीकरणात वगैरे वगैरे निघणाऱ्या पूरक आवाजांनी घेतलेले रूप आहे. हासणे हा शब्द सुचतो. फुरके मारणेही कदाचित याच श्रेणीत येईल. पण हा सिद्धांतही काही आपल्याला फार पुढे नेत नाही.
Yo-he-Yo सिद्धांताप्रमाणे समुहात, मिळून कष्ट करतांना जी लय निर्माण होते त्याला पूरक आवाजांपासून पुढे शब्द झाले. मजुरांना काही अवजड गोष्ट ओढतांना बघा. ते लयीत एक विशिष्ट आवाज करतात. ठीक आहे चार्वाक साहेब. तुम्ही म्हणता, आम्ही ऐकतो.
खरे म्हणजे एकही सिद्धांत काही समाधानकारक वाटत नाही. म्हणून १८६६ मध्या स्थापन झालेल्या पॅरिस लिंग्विस्टिक सोसायटीने आपल्या घटनेतच सदस्यांनी भाषेच्या उत्पत्तीवर संशोधन करू नये, बोलू नये असा चक्क
नियम टाकला. तसे केले नसते तर पिंग-पाँग, किंग-काँग, खाट-खूट, ठाम-ठूस, ठैंया-ठूस, असे नवे सिद्धांत आले असते. असो.
नंतर जवळ जवळ १०० वर्षे भाषेच्या उत्पत्तीवर फारसे लेख वगैरे आले नाहीत असे म्हणतात. त्यानंतर मात्र पुन्हा त्या विषयाने डोके वर काढले. आता तर जवळजवळ सगळ्या विश्वविद्यालयात भाषेच्या उत्पत्तीवर गहन संशोधन सुरू असते. भाषा ही देवदत्त आहे असे आता अर्थातच कोणी मानत नाही. पण भाषा ही मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीशी निगडित आहे असे डार्विनियन मत आहे. भाषा ही संवादासाठी (for communication) निर्माण झाली नसून विचारासाठी निर्माण झाली असा एकंदरीत सूर आहे. भाषा शिकण्याची कला ही मानवप्राण्यात जन्मजात असते व विचार करायला ती अत्यंत आवश्यक असते. भाषेशिवाय विचार नाही व विचारांशिवाय भाषा नाही असे साधारण मत आहे.
भाषेची प्रगती ही डार्विनच्या उत्क्रांतीवादासारखीच असते असे एक मत आहे. सध्याच्या काळात नोम चोम्सकीचे (Noam Chomsky) भाषोत्पत्तीवरचे संशोधन गाजत आहे. भाषेचा जन्म विचारांसाठी झाला, communication साठी नाही असे त्याचे मत आहे. मूक बधीर मुलाला सुद्धा काही न शिकविले तरी तो विचार करायला व ते व्यक्त करायला स्वत:ची काहीतरी भाषा निर्माण करतो असे म्हणतात. पण चिंपांझीला मानवांमध्ये मोठे केले तरी तो भाषा शिकणार नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. भाषा निर्मितीला व आत्मसात करायला जी बुद्धी हवी ती फक्त मानवापाशीच आहे. भाषानिर्माण होण्याचे कारण बुद्धी हेच आहे. ओसाड बेटावर लहान मुले सोडून दिली तरी ते भाषेला जन्म देतील असा सर्व संशोधनाचा इशारा आहे.
हे झाले बोलायच्या भाषेचे. लेखी भाषा अर्थातच फार फार नंतर आली. ते संशोधन त्या मानाने सोपे कारण लिखिताचे अवशेष सापडतात. लिहिलेल्या चिक्कण मातीच्या मडक्यांचे, पाट्यांचे (clay tablets) हजारो अवशेष मेसोपोटेमियाच्या एका मोठ्या शहराच्या उत्खननात सापडले. अक्षरश: हजारो अवशेष. ६००० अवशेष, ४०००० लिहिलेल्या ओळी जमिनीने उदरात घेतलेल्या त्या जुन्या विकसित शहराच्या उत्खननात सापडले. संशोधकांना खजिनाच मिळाला. शहर ज्याला म्हणता येईल अशी जगातली पहिली वहिली वसाहत त्याला मानतात. त्या नगराचे नाव उरुक (Uruk). साधारण २०० एकरात वसलेले आद्य 'शहर'. मडक्यांवर, मातीच्या पाट्यांवर, लाकडांवर लिहिलेली शहराचा राजा (priest king) आणि त्याचे १२० अधिकारी यांची नावे मिळाली. कोणी मेंढ्यांचा प्रमुख, कोणी पाण्याचा, कोणी नांगर प्रमुख, कोणी पुजारी. पद्धतशीर कामाचे वाटप. जुनी भाषा. जुनी लिपी. ती decode करणे महाकठिण. पण decode झाली. लिपी म्हणजे बरीचशी चित्रमय, Pictographical. आजही चीन, जापान धरून अनेत पौर्वात्य देशात अशीच pictograph युक्त लिपी वापरात आहे. म्हणून मराठीत ५२ व इंग्रजीत २६ अक्षरे असली तरी या भाषांत हजारो असतात. ही भाषा मजेदार असते. त्या छोट्या छोट्या चित्रांवरून शब्दांचा, वाक्यांचा व अर्थाचा बोध होतो. बरेचदा चित्राचे निर्देशक शब्द किंवा अक्षराशी फक्त ध्वनीसाम्य असे. अगदी प्रिमिटिव्ह लिपी. IIT Kanpur ला ४५-५० वर्षांपूर्वी त्यांचा स्वत:चा close circuit TV (CCTV) होता. त्यांचे स्वत:चे एक चॅनल होते ज्यावर रविवारी संध्याकाळी त्यांच्या परिसरावर आधारित एक तास कार्यक्रम असायचा. IIT चे नाव कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक डोळा (eye म्हणजे I), आणखी एक डोळा (दुसरा I) व चहाचा कप (Tea म्हणजे T) असे दाखवायचे. चित्रभाषेचे एक उदाहरण म्हणून येथे हे सांगितले. उरुक नगराची भाषा तशीच काहीशी. जवळच्या सुझियाना (Susiana) नगराच्या उत्खननात सापडलेले अवशेषही तीच कहाणी सांगतात. लाकडावर कोरलेलेही लेख येथे सापडले.
हे सर्व घरी बसून वाचायचे असेल, लेखी भाषेची गंगोत्री बघायची असेल तर मारा टिचकी.
http://www.metmuseum.org/toah/
हे पाटी, मडक्यावरचे वा लाकडावरचे लेख साधारण पाच ते साडे पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत. त्यानंतर तब्बल तीन हजार वर्षांनंतर अमेरिका खंडात लेखी भाषेचा असाच जन्म झाला. उत्खननात तेथेही दोन अडीच हजार वर्ष जुने लेखी भाषेचे पुरावे मिळाले. ती निर्मिती स्वतंत्रपणे झाली व तिचा मेसोपोटेमियाच्या लेखी भाषेशी काहीही संबंध नाही यावर पुरातत्त्व संशोधकांचे एकमत आहे. म्हणजे लिहिण्याची सुरुवात दोन वेगवेगळ्या भूखंडावर, दोन वेगवेगळ्या कालखंडात स्वतंत्रपणे झाली.
एकंदरीत काय की लेखी भाषा तशी खूप प्राचीन नाही. ओल्या मातीच्या पाटीवर, मडक्यावर टोकदार काडीने अक्षरे उमटवून नंतर ते भाजून पक्के केले जाई. सुरुवातीला pictographical व नंतर आजच्यासारखी साधी मूळाक्षरे आली. वाग्देवी सरस्वतीने आपल्याला ५० मुळाक्षरे दिली असा पुराणात उल्लेख आहे. पटेल त्याने घ्यावा. पण अत्यंत किचकट संशोधनात मिळालेल्या पुराव्यांवरून जे दिसते ते मात्र असे.
हे जर खरे असेल (आणि आहेही, कारण वस्तुसंग्रहालयात उत्खननातल्या ह्या मातीच्या पाट्या, कोरलेली लाकडे जपून ठेवण्यात आली आहेत.) तर व्यासनिर्मित महाभारताचे वय काय असा प्रश्न मनात येतो. व्यास सांगतात व गणराज लिहितात हे चित्र तर आपल्या ओल्या कच्च्या मडक्यावर लहानपणीच कोरले गेले आहे. आता वयोमानाप्रमाणे आपले मडके पक्केही झाले आहे. बोटाने वाजवून पाहिले तर छान आवाजही येतो व ते शाबूत आहे असे कळते. क्रॅक वगैरे नाही. टिचकलेले नाही. असो. विज्ञानावर विश्वास असेल तर महाभारत पाच हजार किंवा त्याहूनही कमी वर्षांपूर्वी वगैरे लिहिण्यात आले असावे. पाच हजार वर्षांपूर्वी जर द्वापारयुग होते तर कलियुग तर आता आता सुरू झाले. व पाहता पाहता संपेल.
या सर्व संशोधनाने महाभारताचे महत्त्व मात्र कमी होत नाही. या सर्व काही अगदीच मनगढंत कथा नसून त्या त्या काळच्या सामाजिक संस्कृतीचे, व कदाचित तत्कालीन घडामोडींचे त्यात लालित्यपूर्ण दर्शन असू शकते यावर फारसे दुमत नाही. काहीही असले, कोणीही लिहिले असले तरी महाभारताचे कथानक अनन्य हे का कोणी नाकारू शकतो? असो. पण कथेत जे वाचले ते अगदी सत्यच आहे अशी जर समजूत असेल तर मग आपले मडके टिचकले तर नाही हे टिचकी मारून तपासायला हवे बरे.
हे सारे संशोधन इतके गहन आहे की भाषोत्पत्तीवरचे लेख तर दहादा वाचले तरी पूर्ण समजत नाहीत इतके क्लिष्ट आहे. आपल्या तरी मडक्यात ते फारसे शिरत नाही बुवा. असे वाटते की सरस्वतीनेच भाषा निर्माण केली असती तर किती बरे झाले असते. शारदोत्सव केला की झाले.
भाषेची उत्पत्ती प्रथम कुठे झाली यावरही बरेच संशोधन आहे. जगभरातील वेगवेगळ्या भाषांमध्ये मूळ आवाज किंवा उच्चार (phonemes, फोनिम्स्) किती ते भाषातज्ज्ञांनी मोजले. ते आफ्रिकेतील भाषात सर्वात ज्यास्त आहेत व जसे जसे आफ्रिकेपासून दूर दूर जाऊ तसे तेथील भाषांत phonemes कमी होत जातात. फिनलंडच्या भाषेत ते सर्वात कमी. त्यावरून भाषेचा जन्म आफ्रिकेत झाला असावा असे कळते. तिथेच आजच्या मानवाशी बराचसा मिळता जुळता आदिमानवही सर्वात आधी झाला असाही संशोधनाचा निष्कर्ष आहे. भाषा दीड लाख ते अडीच लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावी असाही संशोधनाचा निष्कर्ष आहे. आपल्याशी मिळताजुळता, बराचसा आपल्याइतकाच परिपूर्ण मानवही साधारण तितकाच प्राचीन आहे. भाषा ही मानवाची सुरुवातीपासूनच सांगाती आहे यावरही आता एकमत आहे. भाषा ही मानवाचे अंगच आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
काहीही का असेना. सरस्वतीने दिली असो, की वारुरीने. आज आपल्याजवळ भाषा आहे हे खरे आहे. आणि तिचे असणे हे किती महत्त्वाचे आहे हेही आपल्याला माहीत आहे. तोंडी व लेखी भाषेच्या उत्पत्तीवर जे संशोधन झाले व होत आहे ते त्या त्या विषयांच्या तज्ज्ञांनाच समजण्यासारखे आहे. पण आपण सामान्यांना थोडेफार वाचून जे काही कळते तेही अभिमानाने ऊर भरून टाकते. जिची आरती करावी अशी भाषा ही गोष्ट आहे. अशी एक आरती आहेही ऐकण्यात (http://udyalagnaaahe.
असे शास्त्र भाषा, असे शस्त्र भाषा
असे जात भाषा, असे गोत्र भाषा
असे प्रेम भाषा, असे वैर भाषा
असे संस्कृतीची गणाधीश भाषा
असे देव भाषा, असे धर्म भाषा
असे शक्ति भाषा, असे युक्ति भाषा
असे व्याघ्र भाषा, असे गाय भाषा
असे माय भाषा, अशी मायभाषा
भाषेचे दान मानवाला खरेच कोणी दिले नाही. ते विचारशस्त्र त्यानेच निर्मिले व त्यानेच ते पाजळले. मानवाच्या प्रगतीत त्याच्या भाषेचा सिंहाचा वाटा आहे. भाषेचा निर्माता मानवच आहे. तोच बोक्कामुच्चु आहे. त्याचे कौतुक त्यानेच नाही तर कोणी करावे. कौतुक करायलाही भाषा हवी. आणि ती फक्त त्याच्याजवळच आहे. 'मानवचंद्र' कवितेतील (http://balved.blogspot.in/
दिवसभरी शेतात कष्टुनी शेतकरी थकला
दगड घेउनी डोक्याखाली शेतावर झोपला
रांगोळीचे थेंब पाहुनी डोळे बंद करी
कान ना कधी झोपी जाती, जागे रात्रभरी
सुरू होतसे संगीताचा जलसा रानात
रातकिड्यांची तंबोऱ्यावर पूर्ण रात्र साथ
बेडुक गाई सृष्टिवंदना घसा साफ करुनी
कला मांडती प्राणी सारे एक एक करुनी
अरण्यातली सिंहगर्जना, हत्तींचा चीत्कार
कोल्ह्यांचे ते भकास रूदन, सापांचा फूत्कार
कुकूच्चकूचा गजर करीतसे सूर्याचे आव्हान
समुहगान पक्षांचे होता पूर्वरंग बेभान
आवाजांचे विविध विश्व हे प्राणीजगत असे
अर्थ काय आवाजांना त्या, प्रश्न तुला हा असे
युगे उलटली, मांजर करते म्याँव म्याँव फक्त
नव नव उच्चारांची शेती तूच करी फक्त
आवाजांना अर्थ दिला तू, शब्दांना शक्ती
भाषेला तू जन्म दिला रे, तू केली क्रांती
बोळा निघता पाणी जैसे प्रवाहास मुक्त
विचारधारा तुझी वाहते जगात स्वच्छंद
अग्नीचा तू स्वामी झाला, तू प्राणी भिन्न
अन्न स्वतःचे स्वतः पिकवितो, दुजा नसे अन्य
भाषेचे तू शस्त्र मिळविले, विचार तू करतो
सृष्टीमध्ये एकमेव तू जो प्रगती करतो
चतुष्पाद-उत्क्रांत द्विपादी, पाया राऊळीचा
पंतमहाभूतज्ञान होतसे वास्तू प्रगतीचा
विचार, भाषाज्ञान जणू हो कळस देऊळीचा
पुजारी रे तू गाभाऱ्यातील ज्ञानदेवतेचा
_____________________